मराठी साहित्याला आज अरुणाताईंसारख्या १०० साहित्यिकांची गरज : प्रा. क्षितीज पाटुकले

    13-Jan-2019
Total Views | 41

 


 
 
 

प्रा. शरचचंद्र टोंगो व्यासपीठ

 

यवतमाळ (विजय कुलकर्णी) : ज्यांच्या पुस्तकांचा खप १० लाखांचाही टप्पा ओलांडतो अशा चेतन भगत, अमिशसारखे लेखक मराठी सिनेसृष्टीत का निर्माण होऊ शकत नाही, असा थेट सवाल उपस्थित करत मराठी साहित्याला आज अरुणाताईंसारख्या १०० साहित्यिकांची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. क्षितीज पाटुकले यांनी केले. ते ९२ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात आयोजित नवतंत्रज्ञानाधारित साहित्याच्या नव्या वाटा या विषयावर उपस्थितांशी संवाद साधत होते. डॉ. जयंत कुलकर्णी आणि मोहिनी मोडक यांनीही परिसंवादात बहुमोल मार्गदर्शन केले.

 

यावेळी बोलताना प्रा. पाटुकले यांनी तंत्रज्ञानामुळे पुस्तकाच्या निर्मितीपासून ते अगदी वितरणापर्यंत झालेल्या बदलांचे स्वागत केले आणि तंत्रज्ञानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे बोलून दाखविले. ते म्हणाले की, आजचे बालक, तरुणपिढी दैनंदिन आयुष्यात ई-माध्यमांचा सर्रास वापर करताना दिसतात. यामध्ये वाचनाचाही समावेश असून किंडलमध्ये तब्बल एक लाख पुस्तकं सेव्ह करता येतात. ही तंत्रज्ञानामुळे झालेली मोठी क्रांती असून तंत्रज्ञानाने वेगवेगळे वाद आणि सीमा नष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.

 

लेखक आणि तंत्रज्ञानाच्या परस्पर संबंधांवर प्रकाश टाकताना प्रा. पाटुकले म्हणाले की, तंत्रज्ञान हे एक उत्तम शस्त्र आहे. लेखकाने या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला पाहिजे. आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केवळ १०० पुस्तकांच्या प्रतींचीदेखील लेखकाला छपाई करणे शक्य आहे. पण, या सगळ्यासाठी लेखकाने सर्वप्रथम आपल्या पुस्तकाकडे अपत्यासारखे पाहणे गरजेचे आहे. म्हणूनच लेखकाने पुस्तकाचे लेखनही करावे आणि आता अमेझॉन, बुकगंगा सारख्या ऑनलाईन माध्यमांमुळे लेखकही थेट पुस्तक विक्री करु शकतात. एवढेच नाही तर आपल्या वाचकांशी संवाद साधण्यासाठी तंत्रज्ञानाची ही नवमाध्यमे ही लेखक-वाचकांसाठी एक वरदानच असल्याचे त्यांनी सांगितले.

 

नवमाध्यमांबद्दल बोलताना ते म्हणाले की, मुख्य प्रवाहातील माध्यमांची दहशत ही सामाजिक माध्यमांनी उलथवून टाकली. व्हॉट्सअप हे म्हणूनच आता कॉमन मॅन्स चॅनेल आहे. कारण, आज प्रत्येकाला न घाबरता व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भारतासह जगभरातील एकूण १५ कोटी मराठी वाचकांपर्यंत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहोचणे शक्य असल्याचा दूरदृष्टीपूर्वक सल्लाही लेखकांना यावेळी प्रा. पाटुकले यांनी दिला. डॉ. जयंत कुलकर्णी आणि मोहिनी मोडक यांनीही या विषयावर विवेचन केले. विवेक कवठेकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121