‘भारताचा पुरातत्त्व इतिहास’ या पाच खंडात प्रकाशित झालेल्या संशोधन ग्रंथात डॉ. रा. गो. भांडारकरांनी प्राचीन भारतीय इतिहासाची पुनर्मांडणी केली होती. प्राचीन इतिहासाच्या कुठल्याही संदर्भासाठी आज हे पाचही खंड प्रमाण मानले जातात. श्रीगणेशाच्या मूर्तींचे प्रथम उल्लेखनीय अस्तित्व सहाव्या शतकात गुप्तकालीन राजवटीतच प्रथम उपलब्ध झाले, असा स्पष्ट उल्लेख डॉ. भांडारकरांच्या या ग्रंथात केलेला आहे. ते पुढे लिहितात - “मात्र या आधीच्या काळातील श्रीगणेशाच्या फक्त दोन मूर्तींचा संदर्भ घेणे अत्यावश्यक आहे. योगायोगाने या दोन्ही मूर्ती सध्या अफगाणिस्तानातील काबूल या शहराजवळच्या दोन ठिकाणी उपलब्धआहेत.” यातील पहिली संगमरवरी मूर्ती (चित्र क्र.1) चौथ्या शतकातील असून (शंकर धार) ‘सकर धार’ या ठिकाणी सापडली आणि नंतर ती काबूल शहराजवळच्या उत्तरेला ‘शोर बाझार’ या ठिकाणी आणली गेली. याच ठिकाणी सूर्यदेवता आणि शिवाच्या मूर्तीसुद्धासापडल्या होत्या. द्विभुज शरीरमुद्रेतील या मूर्तीची छाती भव्य असून श्रीगणेशाच्या प्रतिमेत नेहमी दिसणाऱ्या मोठ्या पोटाचा आकार या मूर्तीत त्या मानाने कमी आहे. मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली आहे. ही मूर्ती खास करून तत्कालीन गांधार प्रदेशातील(आजचा अफगाणिस्तान) मूर्तिकारांच्या शैलीशी मिळती जुळती आहे. गुप्तकालीन साम्राज्याचा विस्तार, चौथ्या शतकात गांधार प्रदेशात हळूहळू सुरू झाला होता तरी तो मर्यादितच होता.
चित्र क्र. १
संगमरवरी श्रीगणेश मूर्ती, चौथे शतक, फोटो सौजन्य :- archaeological Survey of India.
खिस्तपूर्व चौथ्या, तिसऱ्या आणि दुसऱ्या शतकांत चंद्रगुप्त मौर्य या राजाच्या मौर्य साम्राज्याचा विस्तार गांधार प्रदेशातील(आजचा अफगाणिस्तान) गार्देझ या प्रदेशापर्यंत झाला होता. अलीकडच्या काळातील तालिबानी अतिरेक्यांच्या आत्मघातकी हल्ल्यांसाठी हा गार्देझ प्रदेश प्रसिद्धीच्या झोतात आला. याच गार्देझमध्ये डॉ. भांडारकरांनी उल्लेख केलेली श्रीगणेशाचीपाचव्या शतकातील मूर्ती (चित्र क्र.2) सापडली होती. काबूल शहरातील पीर रतन नाथ दर्गा या हिंदू नागरिकांच्या वस्तीत असलेल्या मंदिरात नंतरच्या काळात ही मूर्ती स्थापन केलेली आहे. आजही या मूर्तीची नियमित पूजा-उपासना केली जाते. मूर्तीवरील कोरलेल्या उल्लेखाप्रमाणे, शाही राजा खिंगाल या क्षत्रीय हिंदू राजाने या महाविनायक गणेशमूर्तीची स्थापना कार्देझमध्ये केली होती. पाचव्या शतकात याच क्षत्रीय हिंदू शाही राजा खिंगाल याची सत्ता या गार्देझमध्ये होती, हे नाणेशास्त्राच्या अभ्यासातून निश्चित झाले आहे. ही मूर्ती द्विभुज शरीरमुद्रेत आहे. सोंड उजवीकडे वळलेली असून डाव्याखांद्यावर यज्ञोपवित म्हणजेच जानवे धारण केले आहे. मोठे पोट असलेली ही मूर्ती लंबोदर महाविनायकाची आहे. प्राचीन काळातील श्रीगणेशाच्या मूर्तींची दूरच्या अन्य प्रदेशातील उपस्थिती, हिंदू-जैन-बुद्ध संस्कृतीच्या तत्कालीन प्रचार-प्रसाराची उदाहरणे आहेत. या बरोबरच ऋग्वेद, यजुर्वेद, ब्रह्मपुराण, लिंगपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण, स्कंदपुराण आणि असंख्य प्राचीन साहित्य संहितांमध्ये श्रीगणेशाच्या माहात्म्यासंदर्भात विस्ताराने वर्णन उपलब्ध आहे. या सर्व संहितांमध्ये शिव आणि पार्वतीचा धाकटा पुत्र गजाननाला अनेक नावांनी संबोधित केले गेले.
चित्र क्र. २
महाविनायक गणेशमूर्ती, पाचवे शतक, फोटो सौजन्य:- archaeological Survey of India.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे मराठी विश्वकोशाचे ते आद्य संपादक आहेत. ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ आणि ‘हिंदू धर्मसमीक्षा’ ही त्यांच्या या विषयातील संशोधनाची महत्त्वाची दोन पुस्तके. तर्कतीर्थांच्या मते, रूद्र अर्थात शिवदेवतेचीच, ‘गणेश’ आणि ‘गणपती’ ही संबोधने आहेत. भरताच्या नाट्यशास्त्रानुसार ‘गणेश’, ‘गणपती’, ‘गणराज’ ही सर्व विशेषणे रूद्र, शिवदेवता आणि त्यांच्या अन्य विग्रहासाठी वापरली गेली. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात लिहिलेल्या कौटिलीय अर्थशास्त्रात, देवतांच्या देवळांच्या निर्मितीविषयी केलेल्या वर्णनात गणेशाचा उल्लेख नाही. तर्कतीर्थांच्या मते, याज्ञवल्क्यस्मृती आणि बौधायनसूत्रात एका ‘विनायकाचे’ वर्णन केले आहे. हा ‘विनायक’ विघ्नकर्ता आणि दुष्ट प्रवृत्तीचा होता. ‘तो विनायक’ आणि ‘आपला विनायक’ यांच्या मूळ व्यष्टीमध्येच निश्चित भेद आहे. आपला विनायक, ‘विघ्नहर्ता,’ ‘विघ्नविनाशक’ आणि ‘विघ्नेश’ अथवा ‘विघ्नराजेंद्र’ अशा संबोधनांनी साधकांना परिचित झाला. या सगळ्या वर्णनांवरून एक गोष्ट लक्षात येते की, शिवदेवता आणि त्याच्या गणांचा म्हणजेच साधकांचा प्रमुख म्हणजेच गणेश देवता असावी. उत्क्रांतीपर्वात समाजजीवन स्थिर होण्याच्या काळात, त्याच्या ‘विघ्नहर्ता’ अशा व्यष्टीमुळेच अन्य देवतांबरोबरच श्रीगणेशाला‘आराध्य देवता’ असे माहात्म्य प्राप्त झाले. श्रीगणेशाच्या मूर्ती या अनेक संस्कृतीत, अनेक शैलीत निर्माण झाल्या. प्रत्येक भिन्न संस्कृतीनुसार चतुर्भुज गणेशाच्या हातांत, कवठ (बेल फळ), मोदक, अंकुश, पाश, परशु, अक्षमाला, कमळ, नाग, झाडाचे मूळ (मुळा) अशी फळे, वनस्पती, आयुधे, खाद्यवस्तू आणि अन्य निर्जीव वस्तू धारण केलेल्या दिसतात.
चित्र क्र. ३
साधारण पावणे तीन इंच आकाराची भाजलेल्या मातीची Terracotalr गणेश मूर्ती, अंदाजे काळ ख्रिस्तपूर्व पन्नास ते तिसरे शतक. वीरापुरम, कुन्नूर.
गणेशाचे डावे शरीर, उपासक आणि दर्शकांच्या मनातील भावनांचे नियंत्रण करते. त्याचे उजवे शरीर उपासक, दर्शकाच्या विचार, तर्कशक्ती, विवेक बुद्धी आणि चेतना-ऊर्जेचे नियंत्रण करते. चतुर्भुज देवतेचे वरचे दोन हात त्यांच्या पारलौकिक, अतींद्रिय क्षमता-शक्तीचे दर्शक आहेत. देवतेचे पुढचे दोन हात त्यांच्या लौकिक अस्तित्वाचे प्रतीक आहेत. श्रीगणेशाच्या वरच्या डाव्या हातातील परशु आणि वरच्या उजव्या हातातील कमळ पुष्प हे संयुक्तपणे फार महत्त्वाचा सल्ला देतात.प्राप्त झालेल्या मानवी जीवनात प्रगती (उजव्या हातातील कमळ पुष्प) करायची असेल, तर भावना आणि सर्व प्रकारच्या वासनांना (डाव्या हातातील पराशुचा वापर करून) मर्यादेत ठेवा. गणेशाच्या काही मूर्तींमध्ये तो उजव्या हातात अंकुश आणि डाव्या हातात पाश धारण करतो. यातील उजव्या हातातील अंकुश, उपासक - दर्शकाच्या अविवेकी वर्तनावर नियंत्रण ठेवतो आणि चेतना-ऊर्जा जागृतीचे संकेत देतो. डाव्या हातातील पाश म्हणजेच लगाम आहे. हा उपासक-दर्शकांच्या उद्दिपीत भावना आणि मन-शरीर वासनांवर नियंत्रण ठेऊन त्यांना मर्यादा राखण्याचे संकेत देतो. पुढच्या डाव्या हातातील मोदक अथवा लाडू हे वरदमुद्रेत आहेत. ते उपासकाच्या समृद्धी आणि आनंदाचे संकेत आहेत. अभयमुद्रेत असणारा गणेशाचा पुढचा उजवा हात हा कुठल्याही चिंता आणि अडचणींपासून त्याने मुक्त असावे, असा उपासकाला दिलेला संकेत आहे.
गणेशाच्या हातातील मोदक आणि लाडवाकडे बघणारा उंदीर हे उपासक आणि दर्शकाच्या सर्व प्रकारच्या (शरीर आणि मन) मोह-वासनेचे प्रतीक आहे. गणेशाचा तो उंदीर हा मोदक जवळ असूनही पटकन खाण्याच्या त्याच्या नैसर्गिक मोहावर नियंत्रण ठेऊन आहे. तसेच नियंत्रण आणि संयम उपासक-दर्शकाने आपल्या मोह-वासनांवर ठेवावे असा हा संकेत. आपल्या लांब शक्तिमान सोंडेने विराट झाडे पाडण्याची क्षमता असणारा हत्ती एक सूक्ष्म सुईसुद्धा तितक्याच सफाईने उचलतो. कठीण प्रसंगात आणि सौम्य संवादात अशा दोन्ही वेळा आपल्या तोंडाचा-शब्दांचा योग्य वापर करावा, असा देवतेने दर्शकाला दिलेला साधासा पण महत्त्वाचा सल्ला. गणेशाचा डावा दात अर्धा तुटलेला आहे. त्याच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत. मात्र, या तुटक्या दाताचा संकेत मात्र महत्त्वाचा आहे. त्याचा उजवा दात बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे, तर तुटलेला डावा दात मनोभावनांचे प्रतीक. अखंड दाताच्या बुद्धीने, डाव्या दातावरम्हणजेच भावनांवर पूर्ण नियंत्रण ठेवावे, असा हा संकेत. डाव्या पायाच्या मांडीवर स्पर्श करून भूमीला स्पर्श करणारा गणेशाचा उजवा पाय फारच महत्त्वाचा संकेत आहे. यशस्वी जीवन साधना आणि प्राप्तीसाठी डाव्या शरीरातील भावनांवर-वासनांवर, तर्कशुद्ध-विवेकी विचारांचे नियंत्रण ठेवा, असा उपासक आणि दर्शकाला दिलेला सल्ला आहे.
श्रीगणेशाचे हे प्राचीन मूर्तिविधान म्हणजे त्याची मूर्ती आणि प्रतिमा, निश्चितपणे एक सुबोध असे पुस्तक आहे. श्रीगणेशाचे मोठे डोके हे त्याची प्रज्ञा आणि बुद्धिमत्ता, अलौकिक आकलनशक्ती, भेदमूलक म्हणजेच गुण-दोषांचे योग्य विश्लेषण करण्याची क्षमता या आणि अशा अनेक अतींद्रिय क्षमतांचे प्रतीक आहे. या क्षमतांमुळेच गणेश देवता भक्तांसाठी विघ्नविनाशक अशी स्फुर्तीदात्री-चैतन्यदायिनी आहे. आपल्या प्राचीन विद्वान आणि चतुर पूर्वजांनी ठेवलेला हा मूर्तिविधानांच्या या पुस्तकांचा अमूल्य ठेवा आपण अभ्यासायलाच हवा.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/