प्रवास पालिका शाळा ते परदेशी पुरस्कारापर्यंतचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2018   
Total Views |



 

तनुजा, तू जाऊ नकोस. माझ्याकडे राहा. मी सांभाळेन तुला.” परळच्या महानगरपालिकेच्या शाळेतील बुधकर बाई तिसरीमध्ये शिकणाऱ्या त्या चिमुरडीला मायेने सांगत होत्या. त्याला कारण पण तसंच होतं. ती चिमुरडी शाळेत नेहमी पहिली येणारी चुणचुणीत मुलगी. चित्र काढण्यात पण तिचा हातखंडा. वागण्याला एकदम आज्ञाधारक. कोणत्याही आईला आपली मुलगी अशीच हवी अशी वाटणारी ती, म्हणूनच बुधकर बाईंना ती आपलीशी वाटत होती. मात्र, नियतीच्या मनात वेगळं होतं. कुणाला माहीत होतं की, महापालिकेच्या शाळेत शिकणारी ती चिमुरडी एक दिवस आंतरराष्ट्रीय दर्जाची इंटिरियर डिझायनर होईल. जगातल्या इंटिरियर डिझाईन क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी एकमेव भारतीय म्हणून तिचं नामांकन होईल. हे नामांकन मिळविणारी ती चिमुरडी म्हणजेतनुजा अॅण्ड असोसिएट्सच्या संचालिका तनुजा योगेश राणे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 

 

परळच्या जेठाबाई चाळीत तनुजाचं बालपण गेलं. आई-बाबा, बहिणी, आजोबा, काका असं जणांचं कुटुंब त्या चाळीतील १० बाय १० च्या खोलीत राहत होतं. बाबा, विजय राणे एका खाजगी कंपनीत नोकरीस होते तर आजोबा मिलमध्ये जात. काकाअमरचित्रकथाया प्रसिद्ध ऐतिहासिक बालकथा तयार करणाऱ्या कंपनीमध्ये कलादिग्दर्शक म्हणून कामाला होते. तनुजा शिरोडकर शाळेत शिशुवर्गात शिकली. पुढे पहिली ते तिसरीपर्यंत जवळच्याच महानगरपालिकेच्या शाळेत शिकली. १९७६ साली बाबांना बोरिवलीमधल्या एमएचबी कॉलनीमध्ये घराची लॉटरी लागली. तिकडे आता जावं लागणार होतं. इकडची शाळा, मैत्रिणी, बुधकर बाई सगळं इकडेच राहणार होतं. हमसून रडणाऱ्या तनुजाला समजावणाऱ्या बुधकर बाई स्वत: कधी भावूक झाल्या, ते त्यांनाच कळलं नाही. ती सारी मायेची, प्रेमाची, संस्काराची शिदोरी घेऊन तनुजा, आपल्या कुटुंबासह बोरिवलीला आली. सुविद्या विद्यालयामध्ये चौथीसाठी प्रवेश घेतला. इथेसुद्धा तिला प्रेमळ शिक्षक लाभले. अभ्यासातली गती इथेसुद्धा कायम होती. दहावीच्या परिक्षेत तिला ८३ टक्के गुण मिळाले. काकांचा कलेचा वारसा तनुजा जोपासत होती. तिच्या हातांमध्येसुद्धा काकांची कला अवतरली होती. काकांनी तिला रहेजा महाविद्यालयातकमर्शिअल आर्टिस्टसाठी प्रवेश घ्यायला सांगितले. मात्र ८३ टक्के मिळाले असल्याने घरच्यांसह सर्व नातेवाईकांनी, शेजाऱ्यानी त्या काळच्या प्रथेनुसार विज्ञान शाखेतच अॅंडमिशन घ्यायला लावले. विल्सन महाविद्यालयात तनुजाच अॅडमिशन झालं.

 

तनुजा आणि तिच्या दोन मैत्रिणी एवढंच त्यांचं जग होतं. आपलं घर भले की आपलं कॉलेज अन् अभ्यास. अगदी कॉलेजचा रस्ता ओलांडून समोर पसरलेल्या चौपाटीवरसुद्धा त्या मैत्रिणी दोन वर्षांत कधीच गेल्या नाही. पुढे साठ्ये महाविद्यालतयातून तनुजाने बीएस्सी पूर्ण केलं. त्याच वर्षी बहिणीला जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेण्यासाठी तनुजा गेली होती. तिथे तिला इंटिरियर डिझायनर या एक वर्षाच्या अभ्यासक्रमाबद्दल कळलं. आपल्या कलेचा यामध्ये वापर होऊ शकतो, हे तिने ओळखलं आणि तिने लगेच प्रवेश घेतला. तनुजा, तिच्या बहिणी आणि एक भाऊ अशा मुलांचा शिक्षणाचा खर्च, घरातला खर्च वाढला होता. तनुजाच्या बाबांच्या पगारात हे सगळे खर्च भागणे अवघड होत होते. घराला हातभार म्हणून तनुजा घरगुती शिकवण्यासुद्धा घेऊ लागली. तनुजाची आई मोठी कष्टाळू. फक्त आठवी शिकलेली. मात्र, तिने जिद्दीने फ्रॉक शिवून ते विकण्याचा व्यवसाय सुरू केला. ते सुद्धा टेलरिंगचं कोणतंही औपचारिक शिक्षण घेता. याकामी तनुजाच्या बाबांनी मोठीच साथ दिली. तनुजा आणि तिची भावंडेसुद्धा हे तयार झालेले फ्रॉक्स व्यापारपेठेत, ग्राहकपेठेत विकायला जात. एकप्रकारचं उद्योजक बनण्याचं बाळकडू तनुजाला आईकडूनच त्या वयात मिळालं. प्रचंड कष्ट घेण्याची तयारी, जिद्द आणि सचोटीपणा हे आई-बाबांचे गुण तनुजा आणि तिच्या भावंडांनी आयुष्यभर जोपासले. १९९० मध्ये तिचा योगेश राणे यांच्याशी विवाह झाला. योगेश राणे यांचा फर्निचरचा आणि प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय होता.

 

लग्नानंतर तनुजा यांनी काम करता व्यवसाय करावा, असे त्यांच्या सासरच्यांनी सुचवले. त्यांच्या सूचनेनुसार तनुजा साड्यांच्या दुकानाकडे लक्ष देऊ लागल्या. याचवेळी ऋग्वेदसारख्या गोंडस बाळाला त्यांनी जन्म दिला. ऋग्वेद जरा मोठा झाल्यावर १९९३ साली त्यांनी रहेजामधून इंटिरिअर डिझायनिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. ‘चूल आणि मूलसांभाळत त्यांनी त्यावर्षी रहेजामधील इंटिरिअर डिझायनिंगमधलं सुवर्णपदक मिळविलं, हे विशेष. काही वर्षे त्यांनी विविध कंपन्यांमधून काम करून इंटिरिअर डिझायनिंग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. याच दरम्यान तनुजा यांनी स्वत:ची बेडरूम डिझाईन केली होती. त्यांच्या घरी येणारे पाहुणे आवर्जून ही बेडरूम पाहत आणि तनुजाचं कौतुक करीत. असेच एक पाहुणे आले होते. त्यांना ते बेडरूमचं डिझाईन एवढं आवडलं की, त्यांनी त्यांच्या पुण्यातील बंगल्याचं काम तनुजाला करण्यास दिले. या कामातील एक आव्हान म्हणजे एका जुन्या इमारतीच्या लाकडांमधून बंगल्याचं नवीन इंटिरिअर तयार करायचं होतं. ते आव्हान स्वीकारून तनुजा कामाला लागल्या. काही दिवसांतच तो दुमजली बंगला त्या परिसरातील सुंदर बंगल्यांपैकी एक गणला जाऊ लागला. या कामामध्ये तनुजाचे पती योगेश राणे यांनीसुद्धा प्रचंड मेहनत घेतली होती.

 

ऋग्वेदच्या शाळकरी मित्राची आई, पारुल देसाई ही तनुजाची चांगली मैत्रीण. ती एकदा तनुजाच्या घरी गेली. तिने तनुजाचे बेडरूम पाहिले. तिला ते एवढे आवडले की तिने तनुजाला आपल्या घराचं इंटिरिअरचं काम दिलं. त्या घराचंसुद्धा खूप छान पद्धतीने इंटिरिअर तनुजा यांच्या कंपनीने केलं. त्याचा फायदा असा झाला की, तनुजाच्या कामाचा बोलबाला देसाई समुदायात झाला आणि तनुजा यांना कामे मिळू लागली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आतापर्यंत त्यांनी २०० हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. अनेक नामांकित कंपन्यांचे अधिकारी, उद्योजक, राजकारणी यांची घरं, बंगले, हॉटेल्स यांच्या अंतर्गत सजावटीचं काम तनुजा यांच्यातनुजा अॅण्ड असोसिएट्सने पूर्ण केलेली आहेत. शून्यातून उभ्या राहिलेल्या या कंपनीची आज कोट्यवधींची रुपयांची उलाढाल आहे.  ‘तनुजा अॅण्ड असोसिएट्सहा ब्रॅण्ड जागतिक स्तरावर पोहोचविण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. सोबतंच फर्निचर उद्योग आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणे आणि गवंडी, सुतार यांसारख्या असंघटित कामगारांसाठी एक शैक्षणिक अकादमी सुरू करण्याचा तनुजा राणेंचा मानस आहे. तनुजा राणेंच्या या संपूर्ण उद्योजकीय वाटचालीत त्यांचे पती योगेश राणे यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हटले जाते. इथे मात्र तनुजाच्या यशामागे योगेश राणे आहेत, असे म्हटल्यास संयुक्तिक ठरेल.

 
 तनुजा राणेंना आतापर्यंत ब्रॅण्ड्स अकॅडमी, इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च असोसिएशन आणि आर्किटेक्चर अॅंण्ड इंटिरिअर डिझाईनचा नुकताच बंगळुरूमध्ये पुरस्कार मिळाला आहे. लंडन येथे होणाऱ्यादि इंटरनॅशनल डिझाईन अॅण्ड आर्किटेक्चर अॅवॉर्ड्स-2018’ या पुरस्कारासाठी तनुजा राणेंना नामांकन मिळालेलं आहे. यावर्षी अशाप्रकारे नामांकनाचा बहुमान मिळालेल्या त्या एकमेव भारतीय इंटिरिअर डिझायनर आहेत. हा बहुमान प्राप्त करण्यासाठी मात्र त्यांना मोठ्या प्रमाणावर मतांची आवश्यकता आहे. http://www.thedesignawards.co.uk/ या लिंकवर जाऊन कोणीही व्यक्ती आपले मत त्यांच्यासाठी नोंदवू शकते. आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या भूमीवर एका भारतीय महिला इंटिरिअर डिझायनरला निवडून देण्याची ही प्रत्येक भारतीयाला सुवर्णसंधी आहे. आपलं देशप्रेम व्यक्त करण्यासाठी सीमेवरच लढण्याची आवश्यकता नसते, तर आंतरराष्ट्रीय बहुमान आपल्या देशाला प्राप्त करून देणे, हासुद्धा देशभक्तीचा एक मार्ग आहे आणि ही संधी तनुजा राणेंच्या रूपाने आपल्या प्रत्येकाला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंटिरिअर डिझायनर होण्याचा तनुजा राणेंचा हा प्रवास निव्वळ रोचकच नाही, तर प्रत्येक भारतीय नारीला प्रेरणा देणारा आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@