
चेन्नई : तामिळनाडूचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र एम.के. स्टालिन यांची डीएमके (द्रविड मुनेत्र कळघम) पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे आज पार पडलेल्या पक्षाच्या प्रनिनिधी बैठकमध्ये स्टालिन यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.
चेन्नईमधील पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये आज अध्यक्ष निवडीसाठी पक्षाच्या सर्व सभासदांची महापरिषद बोलावण्यात आली होती. यामध्ये पक्षाचे सचिव आणि कार्यकारी अध्यक्ष असलेले स्टालिन यांची पक्षाच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली. तसेच पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून पक्षातील वरिष्ठ नेते दुरईमुरुगन यांची निवड करण्यात आली. याचबरोबर पक्षाच्या आणखी काही महत्त्वाच्या पदांवर देखील काही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर डीएमकेच्या अध्यक्ष पदासाठी पक्षांतर्गत काही वाद निर्माण झाले होते. करुणानिधी हे स्वतः तब्बल ४९ वर्ष पक्षाचे अध्यक्ष राहिले होते व त्यांच्या आजारपणादरम्यान स्टालिन हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यामुळे करुणानिधी यांच्या पाश्च्यात स्टालिन हेच पक्षाचे अध्यक्ष असतील यावर शिक्कामोर्तब झालेला होता. परंतु पक्षाच्या नियमानुसार यांनी आपली उमेदवारी दाखल करत आज त्यांची बहुमताने अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
याचबरोबर या बैठकीमध्ये करुणानिधी यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, यासाठी केंद्र सरकारला मागणी करण्याविषयी देखील एकमत झाले आहे. करुणानिधी यांनी आपले संपूर्ण आयुष्य तामिळी जनतेच्या भल्यासाठी आणि देशाला एकसंध ठेवण्यासाठी घालवले आहे. त्यामुळे भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, यासाठी सर्व सदस्यांनी एक प्रस्ताव परिषदेसमोर मांडत बहुमताने तो मान्य देखील केला आहे.