आठवणीतले अटलजी...

    23-Aug-2018
Total Views | 30


 

‘आपले अटलजी’ पंतप्रधान म्हणून कसे काम करतात, ते पाहण्यासाठी आम्ही पदाधिकारी मुद्दाम दिल्लीला गेलो होतो. लोकसभेचे अधिवेशन चालू होते. त्यावेळी प्रमोद महाजन संसदीय कार्यमंत्री होते. त्यांच्याबरोबर आम्ही अटलजींच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना भेटलो. त्यांनीच आमची चौकशी केली. जसे खासदार म्हणून होते, तसेच पंतप्रधान म्हणून आम्हाला ते दिसले व जाणवले. अत्यंत साधेपणा, पण सर्वांविषयी बोलण्यात, वागण्यात आत्मीयता अगदी सहजपणे होती.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

‘भारतरत्न’ म्हणून गौरवलेले, देशाचे तीन वेळा पंतप्रधानपद भूषवलेले श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्टला वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. राष्ट्रभक्तीचा एक प्रखर तारा निखळला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते संघ प्रचारक ही वाटचाल अगदी ऐन तारुण्यात करताना संघाच्या मुशीत आदरणीय अटलजींचे व्यक्तिमत्त्व घडले आणि मुळात राष्ट्रभावना मनात असताना एखाद्या हिऱ्याला पैलू पाडून तो अधिक चमकदार व्हावा, तसे अटलजींचे जीवन चमकदार झाले. खूप वाचन, राष्ट्रहिताच्या दृष्टीने खूप चिंतन, अतिशय संवेदनशील स्वभाव, कविमनाचा हळुवारपणा असला तरी देशहिताचे योग्य निर्णय कणखरपणे घेण्याची क्षमता आणि अमोघ वक्तृत्व, यामुळे अन्य अनेक राजकीय नेत्यांपेक्षा अटलजींचे व्यक्तिमत्त्व वेगळेपणाने उठून दिसणारे होते. त्यांच्या निधनाने पक्षाचा आधारवडच गेला. असे झाले असले तरी लाखो भाजप कार्यकर्त्यांना आपले वडिलांचे छत्र हरपल्यासारखे वाटले.

 

आणीबाणीपासून मी नाशिकमध्ये प्रथम जनसंघ, मग जनता पक्ष आणि नंतर भारतीय जनता पक्ष या राजकीय प्रवाहातही एक सामान्य कार्यकर्ती म्हणून राजकारणात काम करू लागले. दिघीमध्ये पूर्वीचे पक्ष विसर्जित करून जनता पक्षाची स्थापना झाली. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अटलजींचे हृदयस्पर्शी मार्गदर्शन ऐकण्याचे आणि जेव्हा पुढे १९८० साली दिघीत भारतीय जनात पक्षाची स्थापना झाली, त्या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहून साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. आदरणीय अटलजींचे भाषण म्हणजे मनाला व कानांना मेजवानी असे. १९८० नंतरच्या दशकात देशाला अनेक वेळा लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जावे लागले. त्या प्रत्येकवेळी मुंबईमध्ये अटलजींचे हमखास शिवाजी पार्कवर भाषण असायचे. मी व श्री. मोगल आम्ही आवर्जून नाशिकहून त्यांच्या भाषणाला उपस्थित राहिलो आहोत.

 

पुढे भारतीय जनता पक्षात मला सामान्य कार्यकर्ती ते प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, राष्ट्रीय महिला मोर्चा, अखिल भारतीय महामंत्री अशा महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. १९९९ साली आदरणीय अटलजी तिसऱ्यादा पंतप्रधान झाले. महिलांच्या शासकीय योजनांचा अभ्यास करून त्यात काळानुरूप बदल करण्यासाठी आ. अटलजींनी एका ‘टास्क फोर्स’ची स्थापना केली. त्या ‘टास्क फोर्स’च्या कार्य समितीवर अशासकीय सदस्य म्हणून संपूर्ण भारतातून मला एकटीला काम करण्याची संधी अटलजींमुळेच मिळाली. त्यांचा व माझा परिचय तसा १९८० पासूनच होता. नाशिकला त्यांचे तीन-चार वेळा येणे झाले. त्या सर्व कार्यक्रमात आणि १-१ वेळा झालेल्या निवडणुकांच्या जाहीरसभेच्या वेळीही त्यांच्याबरोबर बोलण्याची संधी मिळाली. अटलजींचे व्यक्तिमत्त्व इतके मोठे होते की, त्यांच्याबद्दल एक आदरपूर्वक दरारा वाटायचा. शिवाय अघळपघळ बोलण्याचा त्यांचा स्वभावही नव्हता.

 

एकदा दिल्लीला मी महिला मोर्चाच्या कार्यक्रमास गेले असता त्यांच्या घरी गेले होते. जाताना नाशिकचा चिवडा नेला होता. घरी गेल्यावर मी त्यांना तो दिला. ताबडतोब त्यांनी त्यांच्या मदतनीसाला बोलावून सर्वांना चिवडा द्यायला लावला आणि स्वतःही खूप आवडीने तो चिवडा खाल्ला. मला खूप समाधान वाटले. अखिल भारतीय महिला मोर्चाची पदाधिकारी असताना दिल्लीत एक बैठक त्यांच्याबरोबर होती. (महिला आरक्षणाचे) विधानसभा व लोकसभा यांच्यात ३३ टक्के आरक्षण देण्याचे बिल फार गाजत होते. बैठकीत मी त्यांना, “आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, पण पक्ष महिलांना तिकिटे फारच कमी देतो. त्यामुळे महिलांना खूप कमी प्रतिनिधित्व मिळते असे का?” असे विचारले असता, त्यावर ते म्हणाले की, “महिलाओंको जरुर प्रत्याशी बनाना चाहिए, लेकिन प्रथम आज महिला मोर्चाकी महिलाओंकी पहचान बनाओ.” मला त्यांचे हे वाक्य खूपच भावले आणि त्याप्रमाणे मी कामाला सुरुवात केली. प्रदेश महिला मोर्चाची अध्यक्ष असताना महिला अन्याय- अत्याचार निवारण केंद्रे, महिला सामाजिक संस्था, कायदेविषयक सल्ला केंद्रे वगैरे स्थायी स्वरूपाची अनेक कामे जिल्ह्या-जिल्ह्यात सुरू केली. प्रत्येक तीन महिन्यांनी प्रदेश बैठक व त्यात महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले.

 

आपले अटलजी पंतप्रधान म्हणून कसे काम करतात, ते पाहण्यासाठी आम्ही पदाधिकारी मुद्दाम दिल्लीला गेलो होतो. लोकसभेचे अधिवेशन चालू होते. त्यावेळी प्रमोद महाजन संसदीय कार्यमंत्री होते. त्यांच्याबरोबर आम्ही अटलजींच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना भेटलो. त्यांनीच आमची चौकशी केली. जसे खासदार म्हणून होते तसेच पंतप्रधान म्हणून आम्हाला ते दिसले व जाणवले. अत्यंत साधेपणा, पण सर्वांविषयी बोलण्यात, वागण्यात आत्मीयता अगदी सहजपणे होती.

 

आदरणीय अटलजी तिसऱ्यादा पंतप्रधान झाले व लगेचच ते मुंबईतील राजभवनात आले होते. मी माझ्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याना घेऊन त्यांना भेटायला गेले होते. आता अटलजी निश्‍चितपणे पाच वर्षे पंतप्रधान पदावर राहणार आहेत. तेव्हा या पाच वर्षांच्या काळात महिलांच्या सबलीकरणासाठी शासकीय स्तरावर काही नव्या योजना, नवे कायद्यात बदल करावेत, यासाठी आम्ही एक दहाकलमी कार्यक्रम तयार केला होता. ते निवेदन आम्ही त्यांना दिले. आम्ही महिला काहीतरी धडपड करतो आहोत, याचे त्यांना कौतुक वाटले. शासकीय स्तरावर इतके झटपट निर्णय होत नाहीत, याची आम्हाला जाणीव होती. “पण, मी पुढे विचार करतो,” या त्यांच्या शब्दाने आमचा काम करण्याचा हुरूप नक्कीच वाढला. अटलजींचे कर्तृत्व, नेतृत्व इतके महान होते की, त्यांच्याबद्दल किती लिहू आणि काय काय लिहू असे वाटते. पण, स्थळकाळाचे भान ठेवून त्यांना विनम्र आदरांजली वाहून इथेच थांबते.

 

डॉ. निशिगंधा मोगल

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121