सनातनची पाठराखण करणाऱ्या शिवसेनेने आता तरी जागे व्हावे : नवाब मलिक
महाराष्ट्र पोलिसांचे केले कौतुक
मुंबई : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र एटीएस यांनी तपास व अटकसत्र सुरू केले आहे. त्यामध्ये वैभव राऊत यांच्या घरात बाँब मिळाले, ते बनवण्याची सामग्री मिळाली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरीदेखील सापडले. यामध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीकांत पांगरकर यांनाही अटक करण्यात आली. शिवसेना आता सांगते आहे की त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. ज्या पद्धतीने सेना सनातनांची पाठराखण करत होती त्यांचे लोकदेखील बळी पडताना दिसत आहे. आता तरी शिवसेनेने जागे झाले पाहिजे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
मलिक यांनी महाराष्ट्र पोलिस प्रशासन योग्य भूमिका बजावते आहे असे सांगितले. कर्नाटक पोलिसांना कलबुर्गींच्या हत्तेनंतर तपासात या सर्व प्रकाराचे धागेदोरे मिळाले. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना याची माहिती दिली. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस येत आहे. पोलिस प्रशासन योग्य प्रकारे काम करत आहे, त्यांच्यावर बोट दाखवणे योग्य नाही. प्रशासनाला रितसर काम करू द्यावे. याचा छडा लागेपर्यंत ही केस पुर्ण झाली असे बोलणे चुकीचे ठरेल, असे मत मलिक यांनी यावेळी व्यक्त केले.