दूध उत्पादकांसाठी खुशखबर; दुधाला मिळणार २५ रुपये भाव

    01-Aug-2018
Total Views |



मुंबई : राज्यातील दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी आजपासून लिटरमागे २५ रुपयांचा भाव मिळणार आहे. दूध दरवाढीसाठी दूध उत्पादकांनी राज्यभर पुकारलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकार आणि दूध संघांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवार (३१ जुलै २०१८) रोजी पार पडली. या बैठकीत दुधाला लिटरमागे २५ रुपये भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. अनुदानासाठी ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफ ही दुधाच्या गुणवत्तेची अट शिथील करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

 

गेल्या महिन्यात राज्यभर दूध आंदोलन पेटल्यानंतर सरकारने पावसाळी अधिवेशनात १९ जुलै रोजी दुधाला २५ रुपये प्रति लिटरचा दर जाहीर केला होता. मात्र, काही दूध संघ वगळता इतर सहकारी, खासगी दूध संघांकडून नव्या दराची अंमलबजावणी केली जात नव्हती. याच पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व दूध संघांनी गाईच्या दुधाला प्रतिलिटर 25 रुपये भाव देण्याचे मान्य केले. दरम्यान, जे दूध संघ दुधाला २५ रुपये भाव देणार नाहीत त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही राज्य शासनाकडून देण्यात आला आहे.