पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या अश्वाचा रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या अश्वाचे नाव हिरा असे होते. पुणे मुक्कीमी असताना हा मृत्यू झाला, त्यामुळे माऊलींच्या जल्लोषाच्या वातावरणात अचानक शोक पसरला.
गेल्या आठ वर्षापासून हा अश्व माऊलीच्या वारीत सेवा देत होता. वारीच्या वाटेवरच अश्वाने अखेरचा श्वास घेतला. आळंदीहून शनिवारी पालखीसह अश्वांनी प्रस्थान केले होते. त्यानंतर पुणे येथे मुक्काम केला असताना आज सकाळी ही घटना घडली.
एकूण ३० किलोमीटर अंतर या अश्वाने पार केले होते. अश्वाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही, मात्र यामुळे वारकरी बांधवांमध्ये दु:खाचे वातावरण आहे. अश्वाचे वय १२-१३ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. वारीमध्ये हे अश्व अत्यंत शुभ मानले जातात.