भारताशी छुपे युद्धे पाकिस्तानने सुरू केले आहे. खलिस्तानची बंडखोरी भारताने कठोरपणे मोडून काढल्यावर पाकिस्तानने अफू भारतात पाठवण्यात सुरुवात केली. बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा अफूच्या गोळ्यांनी देशातील तरुणाईला संपविण्याची असुरी इच्छा बाळगणाऱ्या पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटना, भारतात गुन्हेगारी कारवाया करून परदेशात आश्रय घेतलेले गुन्हेगार या व्यवहारांतून हजारो कोटी रुपये कमवतात. याच पैशांचा वापर दहशतवादी व इतर गैर कारवायांसाठी केला जातो.
पंजाबला अमली पदार्थांच्या तस्करीने आता पुरते घेरले आहे. तेथील युवा पिढी या जाळ्यात पुरती गुरफटून गेली आहे. तेथील सामाजिक वातावरण त्यामुळे अतिशय गढूळ झाले आहे. मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी तस्करांकरिता फाशीच्या शिक्षेची मागणी केली. अमरिंदर सिंग यांनी सर्व राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांची उत्तेजक चाचणी करण्याचे आदेश दिले असून, त्यातून पोलीस अधिकाऱ्यांनाही वगळलेले नाही. चाचणीपूर्वी काही काळ अमली पदार्थ्यांपासून दूर राहतील, म्हणून अशी चाचणी पूर्वसूचना न देता केली जावी अशा सूचना केल्या आहेत. पंजाबात उत्तेजक द्रव्य घेणाऱ्याला शिक्षा होते; पण ती निर्माण करणाऱ्यांना वा तस्करी करणाऱ्यांच्या नाही. दिवसाकाठी सुमारे १४०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ फस्त करणाऱ्या युवकांनी अमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये, म्हणून समाजमाध्यमांचा वापर करण्याची कल्पना सरकारने अंमलात आणली.
समाजमाध्यमातून ही समस्या दूर होणार नाही
नोकरी/उद्योग नाही, अशा वातावरणात वैफल्यग्रस्त असलेल्या युवकांमध्ये त्याने फारसा फरक पडलेला नाही. पोस्टर लावून किंवा समाजमाध्यमांतून उपदेश करून ही समस्या दूर होणार नाही. त्यासाठी वरपासून खालपर्यंत झाडाझडती, पाळेमुळे खणून व माफियांचे जाळे उद्ध्वस्त केले पाहिजे. पंजाबमधील औषध कंपन्यांमध्ये तयार होत असलेल्या मालावर नियंत्रणही पाहिजे. युवकांच्या हाती सहज लागतील, अशी छोटी पाकिटे तेथे कुणालाही मिळू शकतात. गेल्या काही दशकांत माफिया आणि कारवाई करणाऱ्या यंत्रणा यांचेच लागेबांधे निर्माण झाले. सोन्याच्या तस्करीपेक्षा अमली पदार्थांच्या तस्करीत असलेला पैसा जास्त आहे, हे लक्षात येताच रातोरात माफिया तयार झाले.
विनाशाच्या वाटेवर पंजाब
पंजाबमधील ड्रग माफियांचा विदारक चेहरा संपूर्ण देशासमोर आणला ‘उडता पंजाब’ या चित्रपटाने. यामुळे अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकलेली तरुणाई, गांजा, अफीम, चरस, ब्राऊन शुगर, मरिजुआना आदी अमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुणाईवर होणारे परिणाम याची संपूर्ण देशभरात चर्चा झाली. स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या हरितक्रांतीमुळे पंजाब देशासाठी ‘गव्हाचे कोठार’ बनला होता. मातीतून सोने पिकू लागले. या सोन्याने राज्यात समृद्धी आणि विनाशाच्या वाटा आणल्या. शेतीतून मिळणाऱ्या बक्कळ पैशातून मौसमानंतर आठ महिने तरुण पिढी चैन करू लागली.
संपत्तीचा ओघ पंजाबात येऊ लागला तशा पंजाबमध्ये टोलेजंग हवेल्या उभ्या राहिल्या. आलिशान गाड्यांची रस्त्यांवर रेलचेल दिसू लागली. मॉल व हॉटेल्स जागोजागी उघडली गेली. थोडासा विरंगुळा म्हणून पब्ज व दारूच्या दुकानांनी मोठ्या प्रमाणावर आपले बस्तान बसविले. एवढा पैसा उधळला गेला, तरीही पंजाबी तरुणांच्या हाती बक्कळ पैसा बाकी राहिला. आता हा पैसा खर्च करायचा तरी कोठे? धूम्रपान, देशी व विलायती दारू, पब्ज, डिस्को, थेक्स या नशा विरंगुळ्याच्या बाबी ठरू लागल्या. देशातल्या देशात, सीमेवरून पंजाबमध्ये अफूचा चोरटा व्यापार सुरू झाला. बघता बघता मादक द्रव्यांनी पंजाबच्या तरुण पिढीला घट्ट विळखा घातला. त्याचवेळी स्वातंत्र्यानंतर भारताशी एकही युद्ध रणांगणावर जिंकू न शकलेला पाकिस्तान, बांगलादेश निर्मितीची सल आजही उरात बाळगून आहे. भारताशी छुपे युद्धे पाकिस्तानने सुरू केले आहे. खलिस्तानची बंडखोरी भारताने कठोरपणे मोडून काढल्यावर पाकिस्तानने अफू भारतात पाठवण्यात सुरुवात केली. बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा अफूच्या गोळ्यांनी देशातील तरुणाईला संपविण्याची असुरी इच्छा बाळगणाऱ्या पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटना, भारतात गुन्हेगारी कारवाया करून परदेशात आश्रय घेतलेले गुन्हेगार या व्यवहारांतून हजारो कोटी रुपये कमवतात. याच पैशांचा वापर दहशतवादी व इतर गैरकारवायांसाठी केला जातो.
बेकायदेशीर व्यापार
पंजाबच्या पाकिस्तान सीमेवरून अफूची तस्करी होते. सीमा सुरक्षादलांकडून सोयीस्कर कानाडोळा केला जातो. पोलीस खात्याशी अफू माफियांचे साटेलोटे आहे. राजकीय संरक्षणाशिवाय हा बेकायदेशीर व्यापार होऊच शकत नाही. दुर्दैवाने आज पंजाबचे सत्ताधारी, राजकीय नेते व त्यांचे जवळचे आप्तेष्ट, अनेक इतर माफिया यात सामील आहेत. माध्यमांमध्ये आरडाओरडा झाला की, पंजाब पोलीस कारवाईचा देखावा करतात. एखाद्या नशेखोराला पकडून त्याच्यावर अफूची वाहतूक व साठेबाजीची कलमे लावून तुरुंगात डांबतात. खटला दाखल करताना त्याला आश्वस्त करण्यात येते की, तू न्यायालयात सहज सुटशील, पण तोपर्यंत तुरुंगात राहावे लागेल. कारण, मादक द्रव्यांच्या वाहतूक व साठेबाजीस जामिनाची तरतूद नाही म्हणजे पोलीस यंत्रणाच गुन्हेगारांना जन्माला घालते.
एकदा अफूचे व्यसन लागले की, वाट्टेल ते करून नशेखोर ते मिळवतोच. सुरुवातीला चटक लागावी म्हणून माफियांकडून नवीन संपर्कात आलेल्या तरुण-तरुणींना फुकट अफू पार्टी दिली जाते. मादक द्रव्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे अत्यंत कठीण असते. ते वेळेवर न मिळाल्यास त्याची होणारी तडफड असह्य असते. मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन हा अनिवार्य इलाज आहे. काही वेळा नशेखोराला इस्पितळात दाखल करणेही अत्यावश्यक ठरते. आज पंजाबच्या खेड्यापाड्यात पसरलेल्या या विनाशकारी मगरमिठीतून सुटण्यासाठी सडलेली सरकारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे. नशेत वावरणाऱ्या तरुणांना कुटुंबात ठेवणे कठीण जाते. त्यामुळे शहरामध्ये व्यसनमुक्ती केंद्राची संख्या वाढू लागली आहे. ही केंद्रे शुल्क घेऊन राबवली जातात. त्यामुळे नशेच्या आहारी गेलेले तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे शुल्क परवडत नाही. कुटुंबातही थारा नाही आणि व्यसनमुक्ती केंद्र परवडत नाही. अशा कात्रीत सापडलेली तरुणाई नकळतपणे गुन्हेगारीकडे वळते. नशेची चटक लागली की, कोणत्याही मार्गाने पैसा कमवायचा या मानसिकतेने त्यांना पछाडलेले असते.
प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांची गरज
देश व पिढी गिळंकृत करणाऱ्या या देशविघातक विळख्यातून बाहेर पडणे अशक्य नाही. ८० च्या दशकात हजारो नागरिकांचे बळी घेणाऱ्या, पंतप्रधानांपासून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आहुती पाडणाऱ्या ‘खलिस्तान’ चळवळीचे पार कंबरडे मोडणाऱ्या भारताला मादक द्रव्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे शक्य आहे. प्रामाणिक राजकीय इच्छाशक्ती हा या समस्येवरचा पहिला उपाय आहे. स्वच्छ चारित्र्याच्या राजसत्तेने दणका देताच हा व्यापार कोसळून पडेल. के.पी.एस. गिलसारख्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याने प्रसंगी जाचक कायदे वाकवून खलिस्तान्यांचा नायनाट केला, त्याचप्रमाणे एखाद्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अनुभवी पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यास मुक्तहस्ते काम करू दिल्यास सामान्य जनता ‘खबरी’ बनते. सामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. सामान्य भारतीय नागरिक हा संकटसमयी आपली देशभक्ती न चुकता दाखवितोच दाखवितो. मादक द्रव्याला राजाश्रय देणाऱ्या गद्दार नेत्यांना धडा शिकवणे आवश्यक आहे. मादक द्रव्यांच्या दुष्परिणामांसोबत पाकिस्तानचा अंतस्थ हेतूही लोकशिक्षणाद्वारे जनतेच्या लक्षात आणून दिल्यास हा काळा व्यापार राजरोस करणे माफियांना अशक्य होईल.
माफियांवर हातोडा पडला, तरच...
पंजाबमधील हजारो कुटुंबातील एकुलता एक मुलगा अथवा मुलगी, कर्ता मुलगा, विशीच्या आतली संतानं, आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत मादक द्रव्यांच्या आहारी गेले व असाहय्यपणे त्यांनी आपल्या पोटच्या पोराचा विदारक मृत्यूही पाहिला. पंजाबची सर्वात महत्त्वाची ओळख आहे ती शौर्यासाठी, देशप्रेमासाठी. पण, आता पंजाबी तरुण ड्रग्सच्या नशेतच आत्ममग्न होतो आहे. सामरिकदृष्ट्या पंजाब महत्त्वाचा आहे. प्रत्येक घरात एक सैनिक असणाऱ्या पंजाबात आता प्रत्येक घरात किमान एक नशेची लागण झालेला सापडतोय. हे युद्ध दोन पातळ्यांवर एकाच वेळी लढणे आवश्यक आहे. एका बाजूला अमली पदार्थांची मागणी कमी करणे आणि दुसऱ्या बाजूला अमली पदार्थांची, जी अवैध आयात-निर्यात होते तिला अटकाव करणे. यापैकी पहिला भाग संस्थांच्या सहकार्याने जनजागरण, व्यसनमुक्ती उपचार आणि व्यसनमुक्त झालेल्या मित्रांची फौज उभी करून व्यसनी व्यक्तींना मदत करणे हा असावा. शासनाच्या गृह, कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत अमली पदार्थ विरोधी संघटना स्थापन करणे, अमली पदार्थांच्या विक्रेत्यांना शोधून, दोषी व्यक्तींना जास्तीत जास्त सजा कशी होईल, हे पाहणे ही दुसरी पातळी असावी.
राज्यात तयार होणाऱ्या आणि सीमेपलीकडून येणाऱ्या अशा अमली पदार्थांची तस्करी हे पाकिस्तानने भारताविरुद्ध चालवलेले युद्धच आहे. देशाच्या सीमेपलीकडून मिळत असलेले प्रोत्साहन आणि देशांतर्गत गैरव्यवहार यांना आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य अशा दोघांनाही हातात हात घालून काम करणे अधिक गरजेचे आहे.