बालगंधर्वांचे चरित्र हिंदीत प्रकाशित होणार

    02-Jul-2018
Total Views |

राजधानीत १६ जुलै रोजी प्रकाशन सोहळा

 
 
नवी दिल्ली : मराठी संगीत रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट असलेले श्रेष्ठ गायकनट नारायण श्रीपाद राजहंस अर्थात रसिकप्रिय बालगंधर्व यांचे चरित्र आता हिंदी भाषिकांनाही अनुभवायला मिळणार आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते नाट्य-पटकथालेखक, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या ‘असा बालगंधर्व’ या कादंबरीच्या ‘बालगंधर्व’ या हिंदी अनुवादीत पुस्तकाचे १६ जुलै २०१८ रोजी मंडीहाऊस स्थित रविंद्र भवनात प्रकाशन होणार आहे. त्यामुळे आता मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ साकारणाऱ्या बालगंधर्वांचे चरित्र जगभरातील हिंदी भाषिकांना अनुभवता येणार आहे.
 
 
पद्मश्री किर्ती शिलेदार यांच्या हस्ते प्रकाशन
 
दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा पद्मश्री किर्ती शिलेदार यांच्या हस्ते ‘बालगंधर्व’ या हिंदी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री रामगोपाल बजाज तर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर; ज्येष्ठ अभिनेते व लेखक आणि नॅशनल मिशन फॉर कल्चरल मॅपिंगचे अध्यक्ष दीपक करंजीकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. 
 
 
बालगंधर्व पुस्तकाविषयी
 
मराठी नाट्यसृष्टीतील मानाचे स्थान असणारे नारायण राजहंस तथा बालगंधर्व यांच्या जीवनावर श्री. भडकमकर यांनी ‘असा बालगंधर्व’ ही चरित्रात्मक कादंबरी लिहीली आहे. मराठीमध्ये राजहंस प्रकाशनाने कादंबरी प्रकाशित केली असून त्याच्या चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. राजकमल प्रकाशनातर्फे गोरख थोरात यांनी कादंबरीचा हिंदी अनुवाद ‘बालगंधर्व’ या नावाने केला आहे. हिंदीमध्ये बालगंधर्वांचे समग्र चरित्र प्रथमच प्रकाशित होत असून यामुळे हिंदी भाषकांना बालगंधर्वांची नेमकी ओळख होणार आहे.