‘शुन्यातून विश्व निर्माण करणे’ हा वाक्प्रचार आपण दैनंदिन जीवनात अनेकदा ऐकतो आणि खरोखरच असा प्रवास करणारे लोक इतरांचे आदर्श असतात. सर्व प्रकारच्या सोयीसुविधा असताना, घराण्याची परंपरा असलेल्या व्यक्ती जीवनात यशस्वी झाल्या तर त्यांच्याकडून ते अपेक्षितच असते परंतु, अत्यंत गरीब आणि विषम परिस्थितीतून जे लोक यशाचे सर्वोच्च शिखर गाठतात, त्यांच्या यशाला जी झळाळी असते, ती काही औरच असते. ‘काल रमण’ हे त्यापैकीच एक नाव.
तामिळनाडूतील एका छोट्या गावातील कल्याण रमणने शाळेत असताना पथदिव्यांखाली बसून अभ्यास केला आणि नंतर अमेरिकेच्या सिटल येथील कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदापर्यंत झेप घेतली, असे सांगितले, तर इतक्या सहजासहजी त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. लहानपणीच्या कल्याण रमणने पथदिव्याखाली बसून अभ्यास केला, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आणि आज कल्याणचा ‘काल रमण’ झाला. काल रमणच्या जीवनाने घेतलेल्या प्रत्येक वळणावर, पदोपदी त्याला अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्याचा प्रवास योग्य दिशेनेच झाला. अमेरिकन कंपनीच्या सीईओ पदापर्यंतचा त्यांचा प्रवास रोमांचक म्हणण्यापेक्षा नाट्यमय म्हणावा लागेल. आता तो यशाच्या शिखरावर आहे आणि ‘ग्लोबलस्कॉलर’ या कंपनीचा संस्थापक-सीईओ आहे.
कल्याण रमणचा जन्म तामिळनाडूच्या तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातील मन्नाराकोईल या छोट्याशा गावात झाला. कल्याणचे वडील तहसीलदार असल्याने, लहानपणी त्याचे कुटुंबीय इतरांसारखेच सामान्य मध्यमवर्गीय जीवन जगत होते परंतु, अवघ्या ४५ व्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे, एका रात्रीत कल्याणच्या जीवनाला अचानक कलाटणी मिळाली. त्यावेळी कल्याण १५ वर्षांचा होता. ‘’माझ्या आईला दरमहा ४२० रुपये निवृत्तीवेतन मिळत असे आणि एवढ्या कमी पैशात चार मुलांचे उदरभरण व शिक्षण किती कठीण असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता,” असे कालने आपला जीवनपट उलगडताना सांगितले. वडिलांच्या मृत्यूनंतर, कल्याणच्या जीवनाने नाट्यमय वळण घेतले. त्याचे कुटुंब भाड्याच्या घरातून एका झोपडीत गेले, त्या ठिकाणी ना पाण्याची सोय होती ना विजेची. आम्ही सर्वजण पथदिव्यांच्या खाली अभ्यास करायचो. सुदैवाने त्याकाळी पथदिवे प्रकाश देत होते. त्यावेळी एम. जी. रामचंद्रन तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. तांदूळ विकत आणण्यासाठी, आम्हाला प्लेट्स विकाव्या लागायच्या आणि आई हातात तांदूळ देत असे. इतकी आमची परिस्थिती वाईट होती, असेही त्याने सांगितले.
मात्र, आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे, नाव कमवावे, अशीच आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कालच्या आईची इच्छा होती. माझ्या मोठ्या भावाने शिक्षण सोडावे आणि सरकारी किंवा कुठेतरी छोटी-मोठी नोकरी पत्करावी, अशीच सर्व नातेवाईकांची इच्छा होती. मात्र, त्याने शिकावे असेच आईला वाटत होते. दहावीनंतर मला कुठेतरी नोकरी मिळेल, म्हणून टायपिंग किंवा शॉर्टहॅण्ड शिकावे, असे त्यांना वाटत असे. मात्र, आहे त्या परिस्थितीत मुलांना चांगल्यात चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करायचा, अशी जिद्द त्याच्या आईने उराशी बाळगली होती. आईच्या या दूरदृष्टीमुळेच, ती माझी सर्वोत्तम आदर्श होती आणि आजही आहे. आम्ही दु:खी असलो तरी आम्ही जे नशिबात आहे, ते मान्य केले होते आणि त्यामुळेच पुढची वाटचाल शक्य झाली. कुटुंबासमोर जी काही संकटं येत होती, आम्ही त्यांचा शांततेने सामना करायचो. गरिबीतून बाहेर काढायला वडील परत येणार नाहीत, याची पूर्ण जाणीव होती. शिवाय आमचे पापविमोचन खूप दूर आहे, याचीदेखील जाणीव होती, असेही कालने सांगितले.
अशी विषम परिस्थिती असताना, लोक नैराश्येच्या गर्तेत जातात, व्यसनाधीन होतात किंवा मग आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग पत्करतात परंतु, काल त्यापैकी नव्हताच. ‘’एक दिवस तुला इतका पैसा देईन की, त्याचे काय करायचे हे तुला कळणार नाही,” असे सांगून काल आईच्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करायचा. हे तो का म्हणत होता हे माहीत नाही परंतु, काही वर्षांनी त्याने आपले शब्द खरे करून दाखविले. “जीवनात ‘टर्निंग पॉईंट्स’ ज्याला म्हणता येईल, अशा सर्व प्रसंगी देवाची कृपा झाली,” असे त्याचे मत आहे. १२ वी नंतर पहिला ’टर्निंग पॉईंट‘ आला. कालला अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अशा दोन्ही विषयांमध्ये उत्तम गुण मिळाले. त्याला चेन्नईच्या अण्णा विद्यापीठात आणि तिरुनेलवेल्लीच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार होता. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात असताना मी तिला सांगितले की, “जर मी इथे प्रवेश घेतला, तर माझे जीवन येथेच सुरू होऊन येथेच संपेल परंतु, मला जग बघायचे आहे.” आई त्याच्या मताशी सहमत झाली आणि त्याने चेन्नईला ‘इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स’ या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. त्यावेळी त्याने तिरुनेलवेल्लीच्या बाहेरील जगात प्रथमच पाय ठेवला होता.
अनेक अडचणींवर मात करत, कालने शिक्षण पूर्ण केले. आपली पहिली नोकरी पत्करतानाही, कालने धोका पत्करला. त्याची पहिली नोकरी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) होती व त्याला चेन्नई किंवा मुंबई असा पर्याय देण्यात आला होता. मुंबईची काहीही माहिती नसताना, त्याने या स्वप्ननगरीची निवड केली. महिन्याभरातच त्याला बंगळूरला आणि तेही प्रोग्रॅमिंगमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर, त्याने टीसीएस चेन्नई येथे नोकरी पत्करली. काही महिन्यांनंतर तो ब्रिटनच्या एडिनबर्ग येथे गेला. एडिनबर्ग येथून त्याचा पुढचा टप्पा होता तो थेट अमेरिका. १९९२ साली काल अमेरिकेला गेला. प्रारंभी त्याने वॉलमार्टमध्ये काम केले. १९९८ साली त्याने ड्रगस्टोअर ऑनलाईन फार्मसीमध्ये “चीन इन्फॉर्मेशन ऑफिसर” म्हणून नोकरी पत्करली आणि २००१ साली वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी तो कंपनीचा सीईओ झाला. देवाची साथ असल्यामुळे, प्रत्येक पाऊल योग्य मार्गावरच पडले. मात्र, “माझीदेखील धोका पत्करून नव्या मार्गाने जाण्याची तयारी होती,” असे काल सांगतो.
अखेर ऑक्टोबर २००७ साली त्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले. त्याने ’नॅशनल स्कॉलर (युएसए), क्लासऑम1 (भारत), एक्सेलियर (युएसए) आणि एक्स-लॉजिका (युएसए)‘ या शैक्षणिक क्षेत्रातील चार कंपन्या खरेदी करून ’ग्लोबलस्कॉलर‘ नावाची कंपनी स्थापन केली. “कंपनी सुरू झाल्यानंतर तीनच महिन्यांत मी संपूर्ण अमेरिका, भारत, सिंगापूर आणि चीन फिरलो आणि शिक्षक व कंपन्यांशी संवाद साधला. शिक्षकांना प्रभावित केले, तरच शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. जगात कमतरता कशाची असेल, तर ती शिक्षकांची आहे. चांगले शिक्षक घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे काल आज अभिमानाने सांगतो. आज कालच्या कंपनीच्या चेन्नई येथील कार्यालयात २०० आणि अमेरिकेतील कार्यालयात १५० जण कार्यरत आहेत. २००८ साली त्याच्या कंपनीची उलाढाल ४० कोटी होती, २००९ मध्ये ती ८० कोटी. आज त्याची उलाढाल शेकडो कोटींच्या घरात आहे. मात्र, आजही त्याचे पाय जमिनीवरच आहेत, हे विशेष. कालबद्दल अजून बरेच काही सांगण्यासारखे आहे. मात्र, ‘जीवनात धोका पत्करल्याशिवाय यशोशिखरापर्यंत पोहोचता येत नाही,’ हेच कल्याण रमणने आपल्या जीवनप्रवासातून सिद्ध केले आहे.
-डॉ. वाय. मोहितकुमार राव