गावासाठी डोंगर खोदणारे ‘गुरुजी’

    14-Jul-2018   
Total Views |


 


बिहारच्या मांझींप्रमाणे महाराष्ट्रातही असेच एक ‘माऊंटन मॅन’ म्हणून ओळखले जाणारे मांझी आहेत. त्यांचं नाव राजाराम भापकर उर्फ ‘गुरुजी’. त्यांच्या जिद्दीची, दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि लढ्याची ही यशोगाथा...

 

२०१५ साली केतन मेहता दिग्दर्शित आणि नवाजुद्दीन सिद्दिकी अभिनित ‘मांझी - द माऊंटन मॅन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून बिहारमधील दशरथ दास मांझी या लढवय्याची कहाणी जगासमोर आली. या ‘माऊंटन मॅन’ने आपल्या पत्नीवर असलेल्या निस्सीम प्रेमापोटी आणि उपचाराभावी जीव सोडलेल्या गावकऱ्यांसाठी ३०० फुटांचा अक्राळ-विक्राळ डोंगर हातोडा, छिन्नी आणि पहार घेऊन तब्बल २२ वर्षांत फोडला. तिकडे बिहारमध्ये हा ‘माऊंटन मॅन’ डोंगर फोडत होता, त्याच दरम्यान आपल्या महाराष्ट्रातसुद्धा एक ‘माऊंटन मॅन’ डोंगराला आव्हान देण्याच्या तयारीत होता. कारण, मांझींप्रमाणेच महाराष्ट्रातल्याही या ‘माऊंटन मॅन’ला दळणवळणासाठी हा भला मोठा डोंगर अडथळा निर्माण करत होता. शेवटी या महाराष्ट्राच्या ‘माऊंटन मॅन’ने यश मिळवले आणि तब्बल ४० किलोमीटरचा रस्ता डोंगर खोदून तयार केला. या महाराष्ट्राच्या ‘माऊंटन मॅन’चे नाव आहे राजाराम भापकर उर्फ ‘भापकर गुरुजी’

 

अहमदनगर जिल्ह्यात डोंगर आणि जंगलाने वेढलेलं गुंडेगाव हे भापकर गुरुजीचं गाव. या गावाला श्रीगोंदा तालुका जवळ असल्याने बहुतांश सर्वच व्यवहार या तालुक्यावर अवलंबून होते. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या शेजारच्या गावात बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध होत्या. मात्र, या दोन्ही गावांमध्ये डोंगर आडवे येत होते. त्यामुळे व्यवहारांमध्ये, दळणवळणांमध्ये प्रचंड अडथळे निर्माण व्हायचे. जवळपास ३५-४० किलोमीटरचा वळसा घालून डोंगरापलीकडे जायला लागायचं किंवा डोंगरातून पायपीट करावी लागायची. अशात जर एखादा रुग्ण असेल, तर सगळीच दमछाक व्हायची. याच दरम्यान गुंडेगावचे रहिवासी असलेले भापकर गुरुजी कोळगाव येथे रुजू झाले. नोकरी करत असताना घरी यायचे म्हटले की, त्यांना तीन गावांना वळसा घालून यायला लागायचे. त्यांनी व गावकऱ्यांनी सरकारला अनेक अर्ज-विनंत्या करून देखील पदरी काहीच पडत नव्हतं. सरकार दरबारी प्रत्येक वेळी त्यांना ठरलेली उत्तर मिळत होती. शेवटी थकून गुरुजींनी घोषणा केली की, "मी रस्ता बांधतो!’’

 

 
 गुरुजींनी तयार केलेला रस्ता (फोटो सौजन्य- गुगल)
 

गुरुजींनी टिकाव फावडं घेऊन स्वतः डोंगर फोडायला सुरुवात केली. काही लोकांनी त्यांना वेड्यात काढलं, तर काहीजण त्यांच्यावर हसत होते. मात्र, गुरुजी त्यांच्या मतावर ठाम होते. त्यांनी त्यांचं काम सुरुच ठेवलं. शाळेतून वेळ मिळाला की ते स्वतः कामाला लागत. नंतर गुरुजींनी ग्रामस्थांना आवाहन केलं की, ज्याला श्रमदान करायची इच्छा असेल, त्याने ते करावे आणि जर कोणाला कामाचा मोबदला हवा असेल, तर तोही मी द्यायला तयार आहे. हळूहळू त्यांनी मजूर लावून काम सुरु केलं. आलेल्या पगारातून ते कामगारांना पैसे द्यायचे. घरखर्च आणि रस्त्याच्या खर्चाचा समतोल साधताना त्यांच्या नाकीनऊ यायचे. त्यामुळे अनेक वेळा पैशांची चणचण जाणवायची. पैशांची चणचण जाणवली की, काम बंद पडायचं. मात्र, तरीही ‘गुरुजी’ डगमगायचे नाहीत. पैसा आला की, पुन्हा काम सुरु व्हायचं. डोंगर खोदत असताना अनेक वेळा मध्ये मोठे दगड लागायचे. हे भलेमोठे दगड फोडण्यासाठी सुरुंग, मशीनरी हा सगळा खर्च स्वत: गुरुजी करायचे. निवृत्तीनंतर मिळालेली पेन्शन आणि काही साठवलेली रक्कम त्यांनी या रस्त्यात ओतली होती. मात्र, अखेर ३३ वर्षांनंतर १९९७ साली गुरुजींच्या कष्टाचे चीज झाले आणि गुंडेगाव ते कोळगाव हा १० किलोमीटरचा कच्चा रस्ता तयार झाला. हा रस्ता बनल्याने पूर्वी ३५ ते ४० किलोमीटर असलेले अंतर अवघ्या १० किलोमीटरवर आले होते. अशा प्रकारचे गुरुजींनी सात रस्ते तयार केले, ज्यामुळे गुंडेगाववरून इतर ठिकाणी पोहोचणे सोपे झाले. या सर्व रस्त्यांची लांबी मोजली, तर जवळपास ४० किलोमीटरच्या वर जाते. या सर्व रस्त्यांचा खर्च कोणत्याही सरकारी मदतीशिवाय त्यांनी स्वतःच्या खिश्यातून घालून ही सर्व किमया साधली.

 

हा महाराष्ट्राचा ‘माऊंटन मॅन’ वयाच्या ८९ व्या वर्षीही गावासाठी, ग्रामस्थांसाठी लढतोय. गेल्या वर्षी गुंडेगावात बससेवा सुरु व्हावी, यासाठी त्यांनी उपोषण केलं होतं. यात त्यांना यश आलं आणि अखेर पुणे ते गुंडेगाव अशी एसटी बस धावायला लागली. गुरुजी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर गावात दारूबंदीसाठी देखील ते लढा देत आहेत. दारूबंदीसाठी लढा देत असताना गावगुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. मात्र, वयाच्या ८९ व्या वर्षीदेखील ते जराही डगमगत नाहीत. आजही त्यांचा लढा सुरूच आहे. अशा या महाराष्ट्रांच्या मांझीला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम...

विजय डोळे

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब सब एडिटर म्हणून कार्यरत, ३ वर्षांपासून मेन स्ट्रीम मीडिया व डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव असून पुणे विद्यापीठामधून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. अनेक लघुपटांसाठी, विविध वेबसाईटसाठी लेखन, डिजिटल मीडिया तसेच शॉर्ट फिल्म प्रॉडक्शन आदी कामाचा अनुभव...