शिवसेनेच्या भूमिकेत बदल होणार नाही : संजय राऊत

    07-Jun-2018
Total Views |

शाह-ठाकरे यांच्या भेटीवर दिली प्रतिक्रिया



मुंबई :
''अमित शाह यांच्या 'मातोश्री' भेटीचा उद्देश जगजाहीर असला तरी देखील सेना युतीसंबंधीच्या आपल्या भुमिकेमध्ये कसल्याही प्रकारचा बदल करणार नाही' अशी स्पष्ट प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिली आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या मातोश्री भेटीवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

'शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये या अगोदरच युतीविषयी एक प्रस्ताव पारित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित सर्व प्रतिनिधींनी या प्रस्तावाला एकमताने मान्यता देत, सेना यापुढील सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सर्वांनी मान्य केले होते. त्यामुळे शाह हे जरी 'मातोश्री'वर येऊन चर्चा करून गेले असतील तरी देखील सेना आपल्या प्रस्तावामध्ये आणि निर्णयामध्ये कसल्याही प्रकारचा बदल करणार नाही,' असे राऊत यांनी म्हटले.

'संपर्क फोर समर्थन' या मोहिमेअंतर्गत भाजप अध्यक्ष अमित शाह हे काल एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी शाह यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच तब्बल दोन तास ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे सेना आणि भाजप यांच्यात दुरावत चाललेले संबंध आता पुन्हा रुळावर येणार अशी चर्चा सगळीकडे सुरु झाली होती.