सुधीर ढवळे यांच्यासह वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत व रोना विल्सन अशी या चौघांची नावे आहेत. ढवळे यांना त्यांच्या मुंबईतील गोवंडी येथील घरातून तर गडलिंग व राऊत यांना नागपुरातून तसेच रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली. भीमा-कोरेगाव प्रकरणात घडलेल्या हिंसाचारामागे हेच चारजण मास्टरमाइंड
असल्याचा पोलिसांचा संशय आहे. दि. ३१ डिसेंबर, २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाडा येथे ‘एल्गार परिषद’ झाली होती. भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासह कम्युनिस्ट नेता ओमार खालिद, जिग्नेश मेवाणी, निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, आदी अनेक डावे नेते यावेळी उपस्थित होते. या परिषदेत अनेक चिथावणीखोर भाषणे आणि गाणी सादर झाली होती. त्यामुळेच १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भीमा येथे दंगल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या प्रत्येकाचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच, नक्षलवाद्यांशी संपर्क असल्यामुळे यातील सर्वच जणांना पूर्वीदेखील अटक झाली आहे. नक्षलवाद्यांशी संपर्क ठेवणे, तसेच त्यांना काही वस्तू पुरवणे आदी अनेक आरोपांवरून यातील सर्वजणांना याधीही पोलिसांनी अटक केली होती.
सुरेंद्र गडलिंग हे नक्षलवाद्यांचे वकिल
नक्षलवादाच्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील वकिल सुरेंद्र गडलिंग हे नक्षलवाद्यांचे वकिल म्हणून ओळखले जातात. नक्षलवाद्यांचे खटले लढवण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. महेश राऊत मूळचे गडचिरोलीचे असून सध्या नागपूरमध्ये राहत आहेत. मुंबईतील टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस या नामांकित संस्थेतून त्यांचे शिक्षण झाले असून इथून बाहेर पडल्यानंतर ते नक्षलवाद्यांच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. त्याचसोबत, रोना विल्सन हे मूळचे केरळचे असून दिल्लीतील नक्षलवादी चळवळीशी संबंधीत असलेल्या प्रा. साईबाबा याची जागा चालवणारे नक्षलसमर्थक म्हणून ओळखले जातात.