नाणार होणार, मुख्यमंत्री ठाम

    28-Jun-2018
Total Views |




प्रकल्प ‘महाराष्ट्राचे भाग्य’ असल्याचे प्रतिपादन

उद्धव ठाकरे, राणेंच्या विरोधाला केराची टोपली


मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होऊ घातलेल्या हरित तेलशुद्धीकरण (ग्रीन रिफायनरी) प्रकल्पावरून पुन्हा एकदा रणकंदन पेटले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, नाणारबाबत स्पष्ट भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होणारच, असा निर्धारच केल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर हा प्रकल्प म्हणजे ‘महाराष्ट्राचे भाग्य’ असल्याची भावनाही फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमकतेमुळे नाणार प्रकल्पाला कडाडून विरोध करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले खा. नारायण राणे आदींच्या विरोधाला सरकारने केराची टोपली दाखवली असल्याचेच स्पष्ट होत आहे.

 

गुरुवारी मुंबईत पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नाणारप्रश्नी आपली भूमिका विशद केली. केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान हेही यावेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, नाणारसारखा प्रकल्प महाराष्ट्रात येणे ही भाग्याची बाब आहे. रिफायनरी महाराष्ट्रात व्हावी, अशीच आमची भूमिका आहे. या प्रकल्पाबाबत काही गैरसमज पसरले आहेत आणि त्यातूच काही लोक याला विरोध करत आहेत. मात्र, त्यांनी चर्चेद्वारे शंका दूर करू कारण हा प्रकल्प राज्याच्या फायद्याचाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शिवसेना तसेच महाराष्ट्र स्वाभिमान आदी युतीतील घटकपक्ष आता काय भूमिका घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मानसन्मान मुद्दा नाही, प्रतिष्ठेचा मुद्दा नाही, आपण शेतकरी वर्गातूनच आलो आहोत. जमीन अधिग्रहित करण्याचे दुःख आपल्यालाही माहिती आहे. परंतु, मी खुल्या मनाने चर्चा करू पाहतोय, असे सांगत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपले याविषयीचे मत मांडले.

 

राज्यातील वाहतुकीसाठी क्लीन फ्युएल - मुख्यमंत्री

राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन वापरणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धन शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. आतापर्यंत राज्यात सहा शहरात सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन केंद्र उपलब्ध होते, आता नव्या ९ शहरात ही केंद्रे आल्यानंतर राज्यात एकूण १५ जिल्ह्यात नॅचरल गॅस वितरण उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ दोन कोटीपेक्षा अधिक लोकांना होणार असल्याचे ते म्हणाले.

 

‘समृद्धी महामार्गा’चे महत्व अधोरेखित

केंद्र सरकारने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगत गॅस पाईपलाईन टाकण्याच्या दिलेल्या प्रस्तावाचे स्वागत करताना मुख्यमंत्री म्हणाले, या प्रस्तावामुळे या प्रकल्पाचे महत्व अधिक अधोरेखित होणार आहे. यासाठी लागणारे आवश्यक ते सहकार्य राज्य शासनातर्फे करण्यात येईल. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून स्टील हब, कोल्ड चेन यासारखे प्रकल्प उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

राज्यातील ३० जिल्ह्यांत ‘नॅचरल गॅस’ : धर्मेंद्र प्रधान

महाराष्ट्र राज्य हे देशाच्या प्रगतीचे इंजिन असून येत्या ४ ते ५ वर्षात सुमारे ३० जिल्ह्यात गॅस वितरण केंद्र उभारून ‘नॅचरल गॅस’ पोहचविण्यात येईल, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. सध्या मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापुर, कोल्हापूर येथे केंद्रे आहेत, आता पुढच्या टप्प्यात अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या ठिकाणी केंद्रे सुरु होणार असल्याचे प्रधान यावेळी म्हणाले.