मुंबई : “काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि उत्तर पूर्वेपासून पश्चिम सागरापर्यंत प्रत्येक घरातील महिला सक्षम असेल, तरच देश बलशाली होईल” असे मत भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांनी तामिळनाडू मधील करूर येथे आयोजित एका मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. भाजयुमोच्या वतीने केंद्र सरकारच्या कामाविषयी जागरूकता आण्याकरिता देशभरामध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, त्या अंतर्गत पूनम महाजन दोन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. यावेळी खासदार महाजन यांनी तामिळनाडू मधील सर्वच पक्षांवर ताशेरे ओढले. त्या पुढे म्हणाल्या की “महिला सक्षमीकरणाचे महत्व संपूर्णपणे जाणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी उज्वला योजनेसारख्या अनेक योजना गेल्या चार वर्षात सुरु केल्या आणि प्राधान्य देऊन राबविल्या. पूर्वी विधवांना १०२० रुपये वाटेल तशी पेन्शन दिली जात असे मात्र पंतप्रधानपदी मोदीजी आल्यानंतर त्यांनी सर्व विधवांना एकसारखी पेन्शन द्यायचा निर्णय घेतला.”