गेल्या काही वर्षांमध्ये भारतात खेळांना आणि खेळाडूंना मिळालेल्या प्रोत्साहनामुळे अनेक दिग्गज खेळाडू तयार झाले आहेत. मग तो खेळ क्रिकेट असू देत, हॉकी असू देत, बॅडमिंटन असू देत नाहीतर बुद्धिबळ. भारतातील खेळाडूंनी मोठ मोठ्या आंततराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत देशाचे नाव उंचावले आहे. मात्र जागतिक पातळीवर नाव कमावलेल्या प्रसिद्ध बुद्धिबळपटू भारताची महिला ग्रॅण्डमास्टर आणि माजी ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पिअन सौम्या स्वामीनाथन सोबत नुकतीच एक धक्कादायक घटना घडली ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इराण येथे आयोजित करण्यात येणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत 'बुरखा' घालण्याची सक्ती केल्यामुळे तिला या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. याविषयी तिने फेसबुकच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.
भारताची एक प्रसिद्ध बुद्धिबळपटू सौम्या स्वामीनाथन. आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून भारताचे नाव उंचावणारी खेळाडू. नुकतेच तिला एशियन नेशन्स कप या जागतिक स्तरावरील स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळत होती. ही स्पर्धा इराण येथे आयोजित करण्यात येणार आहे. मात्र या स्पर्धेत तिला भाग घेता येणार नाही. त्याचे कारण म्हणजे इराण सरकारने या स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिला खेळाडूंना हिजाब किंवा बुरखा घालणे अनिवार्य केले. हिजाब घालणे मान्य नसल्याने तिला या खेळातून बाहेर पडावे लागले, आणि आता तिला आता या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. ही एक अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी बाब आहे. एका महत्वाच्या स्पर्धेपासून तिला केवळ यासाठी मुकावे लागले कारण तिने बुरखा घालण्यास नकार दिला.
याबद्दल तिने फेसबुकच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. " मला असे सांगण्यास अत्यंत दु:ख होत आहे की २६ जुलै ते ४ ऑगस्ट २०१८ पर्यंत इराण येथे होणाऱ्या आगामी एशियन नेशन्स चषक चॅम्पियनशिप या स्पर्धेत मला भाग घेता येणार नाही. त्याचे कारण म्हणजे मी तेथे होणाऱ्या स्पर्धेत हिजाब किंवा बुरखा घालण्यास नकार दिला. इराणी कायद्यानुसार तेथे आयोजित करण्यात येणाऱ्या अशा स्पर्धांमध्ये महिला खेळाडूंना बुरखा घालणे अनिवार्य होते. मला हा कायदा म्हणजे माझ्या मानवी हक्कांचे उल्लंघन वाटते. माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे, माझ्या धर्म आणि विचारांच्या निवडीच्या स्वातंत्र्याचे हे उल्लंघन आहे. माझ्या या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग उपलब्ध होता, तो म्हणजे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी इराणला न जाणं." अशा शब्दात तिने तिचा राग, वेदना आणि रोष व्यक्त केला आहे.
"मला हे बघून अतिशय दु:ख होतं की इतक्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन करत असताना खेळाडूंच्या अधिकारांना आणि विचारांना इतके कमी महत्व दिले जाते. आयोजकांनी खेळाडूंना आपल्या राष्ट्रीय पेहरावामध्ये किंवा आपल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पेहरावामध्ये, 'फॉर्मल' पेहरावामध्ये उपस्थित राहण्यास सांगितलं तर ते मी समजू शकते, मात्र खेळांमध्ये धार्मिक 'ड्रेसको़ड'ला स्थान नाही. मग अशी सक्ती का?" असा सवाल देखील तिने उपस्थित केला आहे.
"प्रत्येकवेळी आपल्या देशाचे, आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करताना मला खूप अभिमान वाटतो. मात्र यावेळी मी या स्पर्धेत भाग घेवू शकणार नाही याविषयी मला खूप वाईट वाटतंय. प्रत्येकवेळी आम्हा खेळाडूंना अनेक गोष्टींसाठी तडजोड करावी लागते, ती आम्ही करतो देखील मात्र काही गोष्टींसोबत तडजोड मान्य नाही, आणि पुढेही होणार नाही." असं ठामपणे ती सांगते.
या एका घटनेने मोठे प्रश्न निर्माण केले आहेत. आज सौम्यात धाडस होते, त्यामुळे तिने नकार दिला. आणि याबद्दल तिचे खरंच कौतुक देखील करायलाच पाहिजे. कारण आपल्या करिअर मधील इतक्या मोठ्या स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेण्यासाठी देखील धाडसच लागते. मात्र यामुळे क्रीडा सारख्या क्षेत्रात धर्म मध्ये का येतो? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. भारताच्या संस्कृतीत साडी, नौवार, घाघरा असे अनेक विविध धर्मांच्या अनुसार विविध पेहराव आहेत, मात्र खेळाचे काही नियम असतात, त्यानुसारच त्याचा पेहराव ठरवला जातो. भारतामध्ये बाहेरून येणाऱ्या खेळाडूंना अशा प्रकारची कुठलीच सक्ती करण्यात येत नाही.
बुरखा घालण्याची सक्ती होणे हेच मात्र दुर्दैवी आहे. कारण यामुळे त्यादेशासाठी काय महत्वाचे आहे हे लक्षात येते. याठिकाणी खेळ महत्वाचा नसून धर्म महत्वाचा आहे, असे ठळकपणे दिसून येते. सौम्याने त्यासाठी नकार दिला आणि याविषीय वाच्यता केली ही एक मोठी बाब आहे. खेळाडूंना अनेकदा तडजोड करावी लागते मात्र त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असेल, तर असे नियम बनविणे आणि ते नियम पाळणे कितपत योग्य आहे? आणि अशा अवाजवी नियमांमुळे आपल्या येथील किती खेळाडूंना किती स्पर्धांपासून वंचित रहावे लागेल? असे अनेक प्रश्न या एका घटनेमुळे निर्माण झाले आहेत. जो पर्यंत असे नियम अस्तित्वात आहेत, तो पर्यंत कुठल्याच देशातील क्रीडा क्षेत्र प्रगती करू शकणार नाही हे मात्र खरे.
- निहारिका पोळ