पश्चिम रेल्वेचा अनोखा उपक्रम

    27-May-2018
Total Views |



मुंबई: हरित पर्यावरणाच्या दिशेने पुढाकार घेत, पश्चिम रेल्वेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. पश्चिम रेल्वेतर्फे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर एक बायोगॅस संयंत्र उभारण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर पश्चिम रेल्वेद्वारे सॉलिड वेस्ट डिस्पोजल अॅण्ड मॅनेजमेंट संयंत्र उभारले आहे. कोच केअर सेंटर जवळ हे संयंत्र उभारण्यात आले असून, ते नुकतेच कार्यरत करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. या संयंत्राद्वारे सेंद्रीय कचर्‍याला गॅसमध्ये परिवर्तित करण्याचे काम केले जाणार आहे. दरम्यान, हरित पर्यावरण आणि स्वच्छतेच्या दृष्टीने टाकण्यात आलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. हे संयंत्र त्याच्या पूर्ण क्षमतेने वापरल्यास एक एलपीजी गॅस भरेल इतका गॅस यातून निर्माण केला जाऊ शकतो, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. मात्र, सद्य परिस्थितीत कमी प्रमाणात सेंद्रीय कचरा जमा होत आहे. त्यामुळे गॅसही कमी प्रमाणात निर्माण होत आहे. तसेच कचर्‍यात मिसळलेल्या प्लास्टिक किंवा अन्य वस्तूंना वेगळे करण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली. तसेच सेंद्रीय कचर्‍याद्वारे बायोगॅस निर्माण करण्यात येणार असून, तो एका ठिकाणी साठवून 
ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील काळात याचा वापर रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या उपहारगृहामध्ये करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.