मुंबईः ‘हरित महाराष्ट्रा’चे स्वप्न साकारण्यासाठी राज्यात ५० लाख १२हजार ७६६ हरित सेनेची फौज सज्ज झाली आहे. यामध्ये वैयक्तिक नोंदणीसह संस्थात्मक नोंदणीचाही समावेश आहे. लोकसहभागातून महाराष्ट्राचे वृक्षाच्छादन वाढावे, वृक्ष आणि वन्यजीव संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी एक कोटींची हरित सेना निर्माण करण्याचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संकल्प केला आहे. त्यांच्या या संकल्पाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून, अर्ध्या कोटीपर्यंतची वाटचाल लोकांच्या सहकार्यातून यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. नोंदणी झालेल्या हरित सैनिकांमध्ये १९ लाख ८८ हजार ९३८ वैयक्तिक हरित सैनिक आहेत. तर; ३०लाख २३ हजार ८२८ हरित सैनिक हे संस्थात्मक स्वरूपातून सदस्य झाले आहेत.
नेहमी पाणीटंचाईच्या झळा सोसणार्या मराठवाड्याने हरित सैनिकाच्या नोंदणीत मात्र पुढाकार घेतला आहे. लातूर जिल्हा राज्यात अग्रस्थानी असून जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख
१५ हजार २७० जणांनी ग्रीन आर्मीचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद दुसर्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात चार लाख एक हजार एकशे पाच जणांनी हरित सेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. तिसर्या क्रमांकावर बीड जिल्हा आहे. येथे तीन लाख ५५ हजार ५७१ हरित सैनिक आहेत. हरित सैनिकाच्या नोंदणीत पहिले तिन्ही जिल्हे मराठवाड्यातील आहेत. हरित सैनिकांच्या नोंदणीमध्ये नाशिक दोन लाख ७९ हजार १११ हरित सैनिकांसह चौथ्या स्थानावर आहे तर;दोन लाख ३६ हजार तीनशे चार नोंदणीसह चंद्रपूर राज्यात पाचव्या स्थानावर आहे.