दहशतवादी संघटना व इतर इस्लामी दहशतवादी गटांशी संबंध - भाग २

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018   
Total Views |
 

 
अका मुल मुजाहिदीन (AMM- Aqa Mul Mujahidin) ही अशीच अजून एक संघटना आहे ज्यांच्या नेत्यांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन नंतर रखिन राज्यातील रोहिंग्या युवकांना भरती करून घेतले आहे. ‘हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी-अराकन’ (हुजी-अ) मधून अस्तित्वात आलेली अका मुल मुजाहिदीन ही संघटना जम्मू व काश्मीरमध्ये कार्यरत असणाऱ्या 'लष्कर-ए-तैबा' (LeT) व जैश-ए-मोहम्मद (JeM) च्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. पाकिस्तानी अतिरेक्यांसोबत रोहिंग्या दहशतवादी काश्मीरमध्ये लढत असल्याचे अहवाल उपलब्ध आहेत. २०१५ ला त्यांचा सर्वोच्च नेता छोटा बर्मी काश्मीरमध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’ च्या अदील पठाणसोबत मारला गेला होता. त्याआधी छोटा बर्मी पाकिस्तानच्या हाफ़ीज सईदसोबत एकाच व्यासपीठावर दिसून आला होता. ढाक्यातील सरकारी सूत्रांनुसार 'अब्दुस कादूस बर्मी' हा मूळ रोहिंग़्या असलेला पाकिस्तान नागरिक 'हुजी-अ'चा सध्याचा प्रमुख आहे. त्याने म्यानमार सीमेलगत दूरवर पसरलेल्या टेकड्यांच्या सहाय्याने बांगलादेशमध्ये 'हुजी-अ'चे जाळे तयार केले आहे, हाही हाफ़ीज सईदचा जवळचा मानला जातो. अब्दुसने म्यानमारच्या माँगडाँवमधील 'हाफ़ीज तोहर'ला भरती केले आहे व सध्या तोहर ‘अका मुल मुजाहिदीन’चा पुढारी असल्याचे समजते. २०१२ च्या दंगलीनंतर रखिना राज्यातील रोहिंग्या निर्वासित शिबिरात सईदच्या ‘जमात-उद-दावा' ह्या अतिरेकी संघटनेचा मानवतावादी हात ‘फ़लाह-इ-इस्नानियत’ सक्रिय होता. जमात-उद-दावाने रोहिंग्या समस्या छायांकित करण्यासाठी २०१२ ला पाकिस्तानात 'दिफ़ा-इ-मुसलमान-इ-अराकन' परिषद आयोजित केली होती. त्यानंतर बांगलादेश-म्यानमार सीमेलगतच्या छावण्यांमधील रोहिंग्या जहालवाद्यांशी 'शाहिद महमूद' व 'नदीम अवन' ह्या जमात-उद-दावाच्या दोन उच्च नेत्यांनी थेट संपर्क साधला होता. बांगलादेशी अधिकाऱ्यांनी २०१२ मध्ये कार्यरत असणाऱ्या पाकिस्तानस्थित रोहिंग्या 'मौलाना शबीर अहमद'ला अटक केली व तो जैश-ए-मोहम्मदच्यावतीने बांगलादेशातील रोहिंग्या अतिरेक्यांशी समन्वय साधत असल्याचे उघड केले. थायलंड-म्यानमार सीमारेषेच्या थाई भागातील माई सोत क्षेत्रात पाकिस्तानसंबंधित रोहिंग्या दहशतवादी गट सक्रिय दिसून आला आहे.
 
 
‘अल्-कलाम’ ह्या जिहादी उर्दू साप्ताहिक मासिकात ‘जैश-ए-मोहम्मद’च्या मौलाना मसूद अझहरने 'सादी' ह्या टोपणनावाने लेख लिहिला आहे. अझहरने 'देशाची स्थिरता व शांतता लवकरच हिरावून घेतली जाईल' अशी धमकी अन्यायी म्यानमार सरकारला दिली आहे. 'बेताब बर्मा' (दुःखी बर्मा) ह्या शीर्षकाच्या लेखात त्याने उपखंडातील मुस्लिमांना 'काहीतरी व तेही लवकर करण्याचे' आवाहन केले आहे.


इस्लामिक स्टेटचा नेता 'अबु बक्र अल्-बघदादी'ने १ जुलै २०१४ ला खिलाफती स्थापनेची घोषणा करताना दिलेल्या भाषणात रोहिंग्यांचा दुर्दशेचा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता. नोव्हेंबर २०१६ ला तालिबाननेही म्यानमारमधील मुस्लिम हत्याकांडाचा निषेध करून प्रत्येक मुस्लिम उम्माहला म्यानमारमधील मुस्लिमांच्या संरक्षणासाठी प्रत्येक साधनाचा उपयोग करून सज्ज राहण्यास सांगितले होते.


नोव्हेंबर २०१६ मध्ये इंडोनेशिया पोलिसांनी जकार्तामधील म्यानमार दूतावासात बॉम्ब हल्ल्याचा कट रचणाऱ्या तिघांना अटक केली, ते तिघे इस्लामिक स्टेटशी शपथबध्द गटातील होते. मे २०१३ मध्येही इंडोनेशिया पोलिसांनी जकार्तामधील म्यानमार दूतावासात बॉम्बहल्ल्याचा कट रचणाऱ्या दहशतवादी गटाचा बिमोड करून अनेकांना अटक करून त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. बाली बॉंबस्फोटातील आरोपी जिहादी 'अबू बकर बशिर'ने म्यानमार राष्ट्रपती 'थेन सेन' ह्यांना २०१२ जुलैमध्ये कारावासातून खुले पत्र लिहले, त्यात तो म्हणतो, ''त्यांनी (म्यानमार बौद्ध) मुस्लिमांची घर जाळली, (इस्लामी) उपासनेवर बंदी घातली व जनावरांसारखी कत्तल केली.'' जर म्यानमारने मुस्लिमांविषयीची वागणूक बदलली नाही तर 'मुजाहिदीनांच्या हस्ते (अल्लाहच्या अनुमतीने) (म्यानमारच्या) भूमीचा विध्वंस घडून येईल.' १४ जून २०१३ ला जमाते-ए-इस्लामीने लाहोरला मोर्चा काढून रोहिंग्यांना शहीद म्हणून दाखविले. सप्टेंबर २०१२ मध्ये बांगलादेशातील कॉक्स बाजार जिल्ह्यातील रामूमध्ये रोहिंग्या गटावर हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप आहे, ह्यात डझनभर बौद्ध मंदिरे व ५० हून जास्त घरे उध्वस्त झाली. जून २०१३ ला चार म्यानमार बौद्धांचे मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये खून झाले, काही सूत्रांनी स्थानिक मलय मुस्लिमांना दोष दिलाय तर काही सूत्रांनी रोहिंग्या शरणार्थींना.


जुलै २०१२ ला तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने (TTP) रोहिंग्यांना लक्ष्य केल्यामुळे सूड घेऊ अशी म्यानमारला धमकी दिली व प्रवक्ता एहसानुल्लाह एहसानने पाकिस्तान सरकारकडे म्यानमारशी सर्व संबंध तोडून त्यांचे राजदूतावास बंद करण्याची मागणी केली. २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय दबावामुळे म्यानमार शासनाने संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान ह्यांच्या आधिपत्याखाली सल्लागार आयोग स्थापन केला. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान स्यू की ह्यांनी त्या शिफारसी स्वीकारल्या होत्या पण तो अहवाल घोषित केल्यानंतर तासाभरातच ARSA ने हल्ले केले.


कदाचित म्यानमार शासन किंवा म्यानमार बौद्धांकडून होणाऱ्या रोहिंग्यांच्या छळामुळे किंवा म्यानमारपासून फुटून स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्यासाठी किंवा बहुसंख्य मुस्लिम स्वायत्त राज्याची मागणी पूर्ण करण्यासाठी म्हणा नाहीतर नागरिकत्वाचे अधिकार मिळावेत म्हणून अथवा १३५ राष्ट्रीय वांशिक गटात समावेश करण्यासाठी - कारण काहीही असो पण हे खरयं की काही रोहिंग्यांनी अतिरेकी संघटना स्थापून व इतर आंतरराष्ट्रीय इस्लामी दहशतवादी संघटनांशी संबंध प्रस्थापित करून हिंसक हल्ले केलेले आहेत. रोहिंग्या हे प्रामुख्याने इस्लाममधील कर्मठ व हिंसक अशा वहाबी-सलाफी विचारसरणीने प्रभावित आहेत. काश्मिरी पंडितांचाही अशाचप्रकारे छळ झालेला आहे व ते गेल्या दोन दशकांपासून निर्वासित छावण्यात रहात आहेत पण काश्मिरी पंडितांनी दहशतवादी संघटना स्थापून सूड म्हणून हिंसक हल्ले केल्याचे कधी कोणी ऐकलय का ?

संदर्भ :

१. Roy Chaudhury, Dipanjan. Rohingya terrorists linked to pro-Pak terror groups in Jammu & Kashmir, The Economic Times, 25 October 2016

२. Rasool Dehlvi, Ghulam. Rohingya crisis: a call to arms for Islamic fundamentalism?, Asia Times, 19 September 2017

३. Jayakumar, Shashi. The Islamic State Looks East: The Growing Threat in Southeast Asia, Combating Terrorism Center, February 2017- Volume 10- Issue 2

४. Brandon, James. Anti-Muslim Attacks in Myanmar Threaten Uptick in Regional Violence & Islamist Activism, Combating Terrorism Center, July 2013- Volume 6- Issue 7

५. Pak Taliban threaten to attack Myanmar over Rohingya Muslims, Times of India, 26 July 2012

६. Calamur, Krishnadev. The Misunderstood Roots of Burma's Rohingya Crisis, The Atlantic, 25 September 2017

७. Rasool Dehlvi, Ghulam. Rohingya crisis: a call to arms for Islamic fundamentalism?, Asia Times, 19 September 2017
 
 
- अक्षय जोग 
@@AUTHORINFO_V1@@