एच. राजा यांनी 'त्या' पोस्टविषयी मागितली माफी

    07-Mar-2018
Total Views |



चेन्नई :
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव एच. राजा यांनी द्रविडीयन क्रांतीचे जनक 'ई. वी. रामासामी पेरियार' यांच्या संबंधी केल्या वक्तव्य विषयी माफी मागितली आहे. तसेच आपल्या फेसबुक अॅडमीनने ती पोस्ट आपल्याला न विचारात सोशल मिडीयावर टाकली असल्याचे त्यांनी म्हटले व यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास त्यासाठी माफी मागत असल्याचे राजा यांनी जाहीर केले आहे.


आज सकाळीच राजा यांनी आपल्या सोशल मिडियावर तमिळ भाषेत एक पोस्ट टाकली असून त्यामध्ये त्यांनी आपल्या अगोदरच्या पोस्ट विषयी माफी मागितली आहे. 'प्रतिक्रिया ही प्रतिक्रिया असते. त्यामुळे त्यातून हिंसा व्हावी, असा कोणताही उद्देश कोणाच्या मनात नसतो. आपल्या विरोधी पक्षाचा विरोध करायचा झाला तर तो शांततेच्या मार्गानेच झाला पाहिजे, असे आमचे मत आहे. त्यामुळे आमच्या पोस्ट कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असल्यास त्याविषयी दिलगिरी व्यक्त करत आहे' असा मजकूर राजा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिला आहे.


दरम्यान राजा यांच्या कालच्या वक्तव्यामुळे तामिळनाडूतील विरोधकांनी भारतीय जनता पक्षाला चहूबाजूंनी घेरले आहे. राजा यांच्या वक्तव्य हे अत्यंत निंदनीय असून हिंसा भडकविण्याच्या उद्देशानेच ते केले गेले आहे, असा आरोप विरोधकांकडून त्यांच्यावर करण्यात येत आहे. तसेच राजा यांच्या वक्तव्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.





राजा यांनी आपल्या फेसबुकवर काल एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्रिपुरामधील लेनिनच्या पुतळ्यासह तामिळनाडूतील पेरियार यांच्या पुतळ्यांचा उल्लेख करण्यात आला होता. 'लेनिन कोण होता ? त्याचा आणि भारताचा काय संबंध ?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच ज्याप्रकारे त्रिपुरातून लेनिनचा पुतळा हटवला त्याच प्रकारे तामिळनाडूमधून पेरियारचे पुतळे हटवले जातील, असे देखील त्यात म्हटले होते. राजा यांच्या या वक्तव्यानंतर पेरियार यांच्या एका पुतळ्याची नासधूस करण्यात आली होती, त्यामुळे हे प्रकरण चिघळले होते.