अस्तित्वाची लढाई...
येता काळ हा निवडणुकांचा काळ म्हटला तरी गैर ठरणार नाही. त्रिपुरा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर विरोधकांचे धाबे दणाणले. कम्युनिस्टांची लाल गढी भाजपने उद्ध्वस्त करुन टाकली. गुजरात, त्रिपुरामधील निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर देशभरात भाजपची ताकद नक्कीच वाढली. त्यातच आता आणखी एक प्रतिष्ठेची निवडणूक म्हणजे १२ मे रोजी होणारी कर्नाटक विधानसभेची निवडणूक. त्यामुळे येत्या दीड महिन्यांत राष्ट्रीय राजकारणातही कर्नाटकच्या राजकीय किश्शांची सर्वाधिक चर्चा होणार, हे नक्की! लोकसभा निवडणुकांपूर्वी राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहणार आहेत. त्यामुळे आगामी काळात देशातले राजकीय वातावरण ढवळून निघेल, यात शंका नाही. काँग्रेस सत्तेत असलेल्या काही उरल्यासुरलेल्या राज्यांपैकीच कर्नाटक हे एक राज्य. त्यामुळे काँग्रेसची अस्तित्व टिकवण्याची धडपड येत्या दीड महिन्यात आणखीनच तीव्र होईल, तर दुसरीकडे संपूर्ण देश भाजपमय करायला निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासाठीदेखील ही निवडणूक तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे लोकसभेची एक दिशा म्हणूनदेखील या निवडणुकांकडे पाहिले जाते. भाजप, काँग्रेस आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जेडीएस या पक्षाच्या ताकदीमुळे यंदाची निवडणूक नक्कीच तिरंगी ठरणार आहे, तर दुसरीकडे सिद्धरामय्या यांनीदेखील गेल्या वर्षभरापासूनच या निवडणुकीची तयारी केली आहे. वर्षभरात आपली मतपेढी भक्कम करण्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित अनेक निर्णय त्यांनी अतिशय चाणाक्षपणे घेतले. मग तो कर्नाटकातील मोठ्या संख्येत असलेल्या लिंगायत समाजाला खुश करण्यासाठी लिंगायतला स्वतंत्र धर्माचा दर्जा बहाल करण्याचा निर्णय असो, अथवा कन्नड अस्मितेसाठीच्या प्रदर्शनासाठी राज्यध्वजाची फडकवाफडकवी, सिद्धरामय्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपनेही सिद्धरामय्यांचे मनसुबे धुळीस मिळण्यासाठी कंबर कसली आहेच. लिंगायत समाजातला एक मोठा गट आजही भाजप समर्थक आहे आणि भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांचा प्रभाव या समाजावर अजूनही कायम आहे. तसेच दुसरा समाज जो कर्नाटकातील निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो तो म्हणजे,वोक्कालिंग समाज. हा समाज आज जेडीएससारख्या पक्षाच्या मागे आहे. त्यामुळे काँग्रेससह भाजपलाही कर्नाटकाची निवडणूक तितकीच आव्हानात्मक असेल, हे नक्की.
विधान परिषद आश्वासन समितीच्या समिती प्रमुख पदाचा दरेकरांनी पदभार स्वीकारला..