भारतीय स्त्री शक्ति जागरण या नावाने कार्यरत असलेल्या पुण्यातील संघटनेमध्ये नव्याने जोडल्या गेलेल्या कार्यकर्त्यांबरोबर सौ. निर्मलाताई म्हणजेच उर्मिलाताई आपटे यांची भेट ठरली होती. ‘भारतीय स्त्री शक्ति’च्या संस्थापक अध्यक्ष असणाऱ्या निर्मलाताईंबद्दल आधी खूप ऐकलं होतं आणि थोडसं दडपण होतं. एक एक कार्यकर्त्या येत होत्या. एकदम साधी साडी नेसलेल्या आणि सामान्य व्यक्तीसारख्या बसलेल्या एका कार्यकर्तीशेजारी मी जाऊन बसले आणि नंतर कळलं ह्याच निर्मलाताई आहेत. त्यानंतर एक तास ज्या ओघवत्या वाणीत त्या बोलत होत्या, नवीन कार्यकर्त्यांची त्यांना माहिती होती आणि त्यांना संघटीत ठेवण्यासाठी आवश्यक अशी प्रत्येकाची नाळ त्यांना तत्काळ लक्षात येत होती आणि सगळ्यांशी ज्या आत्मीयतेने त्या संवाद साधत होत्या ते अविस्मरणीय होतं. गणित विषयात एम. एस्सी. केल्यामुळे कदाचित त्यांच्या विचारातील आणि त्यामुळे येणारी वाणीतील स्पष्टता, भाषेवर प्रभुत्व, वयाची सत्तरी ओलांडल्यावरही कामासाठी असलेली तळमळ आणि जिद्द, आजच्या प्रश्नांशी सांगड, नवीन कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी अथक विचार ह्या सगळ्या गोष्टी अगदी थोड्या वेळात लक्षात आल्या. ह्या सगळ्याला शिक्षणाबरोबरच कॉलेजच्या दिवसात अभाविपमध्ये धडाडीने केलेल्या कामाची पार्श्वभूमी आहे हे लक्षात येत होतं.
म्हणूनच २०१७ सालचा सन्माननीय ‘नारी शक्ति’ पुरस्कार सौ. निर्मलाताई आपटे ह्यांना जाहीर झाला, केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि भारतीय स्त्री शक्तिच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आनंदाने भरून आलं. १९८८ मध्ये स्थापन झालेल्या 'भारतीय स्त्री शक्ति' या संघटनेच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. संघटनेची ध्येय-धोरणं तसंच भूमिका ठरवण्यात त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. महिला सशक्तीकरणाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणाऱ्या संघटनेला उभं करण्यात त्यांचं ३० वर्षांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. संघटन मंत्री या नात्याने भारतभर प्रवास करत १० राज्यांमध्ये भारतीय स्त्री शक्तिच्या ३३ शाखा सुरु होण्यात निर्मलाताईंचं खूप मोठं योगदान आहे. महिलांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी केंद्र सरकारने नेमलेल्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केलं आहे. स्त्रियांसाठी आवश्यक असलेले कायदे, ग्रामीण स्त्रियांचा विकास, अंगणवाड्या अशा अनेक विषयांवर आयोजित केलेल्या कार्यशाळांमध्ये तसंच घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण, सरोगसी अशा विविध विषयांवर आयोजित केलेल्या अधिवेशनांमध्ये त्यांचं वैचारिक योगदान आहे. स्त्रियांची वसतिगृहे, एकतर्फी प्रेमाची प्रकरणं, हिंसाचार अशा कित्येक विषयांवर झालेली सर्वेक्षणं, सर्व भारतीय महिलांसाठी समान कायदा, जेन्डर बजेट अशा अनेक प्रकारच्या उपक्रमांसाठी त्यांचं वैचारिक नेतृत्व आणि मार्गदर्शन मोलाचं आहे. याबरोबरच राज्य महिला आयोग, दादरमधल्या एका शैक्षणिक संस्थेत विश्वस्त आणि अध्यक्ष म्हणूनही त्याचं योगदान आहे.
रायगडमधील महाड गावात निर्मलाताईंचा जन्म. १९६० च्या दशकात शिक्षणासाठी मुंबईला आल्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून समाजकार्याची त्यांची सुरुवात झाली. बलवंत आपटे ह्यांच्याशी विवाह झाल्यानंतर काही काळ कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात गेला. परंतु त्या काळातही स्त्री शक्तीच्या स्थापनेपूर्वीची जुळवाजुळव सुरु होती. जेंडर न्याय, जेंडर संवेदनशीलता हे विषय महिला संघटनांमध्ये येण्यापूर्वी शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य, समानता आणि आत्मसन्मान अशी पाच सूत्र घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. महिला सुरक्षा, कुटुंबसंस्थेमध्ये आवश्यक बदल, निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग आणि त्यासाठी सर्वेक्षण, जागरुकतेसाठी व्याख्याने, आंदोलने ह्या मार्फत विषयाचा आवाका वाढला गेला. ‘भारतीय स्त्री शक्ति’ आवश्यक त्या परिवर्तनासाठी विविध उपक्रम हाती घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना दिसते. सरोगसीसारख्या विषयावर भारतात कोणताच कायदा नसल्यामुळे गरीब महिलांचं शोषण होण्याच्या घटना घडत होत्या त्याकडे भारतीय स्त्री शक्तिने लक्ष वेधलं. समान नागरी कायदा, महिला सुरक्षा ह्या विषयांचा आग्रह धरला. असा कायदा करण्यासाठी सूचना दिल्या. बचत गट, समुपदेशन, किशोरवयीन मुलींना त्यांच्यातील शाररीक बदलांची ओळख करून देण्यासाठी कार्यशाळा, आदिवासी, कॉर्पोरेट आणि अनिवासी भारतीय महिलांचे प्रश्नही स्त्री शक्तीने हाताळले आहेत. आरक्षणातून राजकारणात येणाऱ्या स्त्रियांना प्रशिक्षणाचे कार्यक्रम, स्मार्ट सिटी ही जेन्डर स्मार्ट सिटी असावी अशी मागणी आणि त्यासाठी महिला आयोगाला सूचना अशा विविध विषयांवर आज भारतीय स्त्री शक्ति कार्यरत आहे.
आज महिला सबलीकरण आणि स्त्रीवाद अनेक महिलांकडून पुरुषविरोधी स्वरुपात घेतला जातो. पारंपारिक कुटुंब व्यवस्थेला विरोध, स्त्रीत्व आणि संस्कृतीला झुगारून देणं, पेहेराव, आचारविचार अशा बाबींत पुरुषांचे अनुकरण, मोर्चे, आंदोलनांमधून आक्रमता दाखवणं असा काहीसा स्त्रीवादाचा अर्थ घेताना महिलाही दिसतात. त्या पार्श्वभूमीवर हे सगळं न नकारातही अनुकूल बदल होतात हे निर्मलाताई आणि त्यायोगे ‘भारतीय स्त्री शक्ति’ दाखवून देत आहे.
कार्याचा विस्तार होत असताना स्वतः च्या प्रसिद्धीला कधीही त्यांनी महत्त्व दिलं नाही. कधीही आवेश आणि अभिनिवेश घेऊन त्या माध्यमांसमोर आल्या नाहीत. पुरुषांना विरोध, त्यांच्याशी तुलना किंवा अनुकरण करण्यापेक्षा परस्परपूरकतेची वाढ होण्यासाठी संघटन कायम प्रयत्नशील राहील हे त्यांनी बघितलं. लिंग समभाव समाजात स्थापित करताना, आपले हक्क मिळवताना इतरांच्या हक्कांवर गदा येणार नाही हा विचार त्यांनी संघटनेत रुजवला आहे. भारतीय मुल्ये आणि विचारधारा ह्यांना कटिबद्ध राहून पुरुषप्रधान रचनेत काळानुरूप बदल करण्यासाठी सामंजस्य, प्रबोधन आणि महिलांचा स्व जागृत करण्याचे काम निर्मलाताईंनी सुरु केलं. आज तीन दशकांनंतर त्याची पुरस्काररूपाने दखल घेतली गेली, त्याचा यथोचित गौरव झाला त्यामुळे भारतीय स्त्री शक्तिच्या कामाला अधिकच प्रेरणा मिळून कार्यविस्तार होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
- विभावरी बिडवे