एक मालवणी किस्सा

    25-Mar-2018   
Total Views | 51
घरातलीच गोष्ट आहे. घरातली म्हणजे कुटुंबातली. माझ्या वडिलांकडे जुन्या काळातली एक डॉज गाडी होती आणि तिचे पंक्चर झालेले चाक बदलण्याच्या कामात ते गर्क झालेले होते. तेव्हाच त्यांचा एक मित्र घरी आलेला आणि थोड्या वेळात चाक बदलून मोकळा होतो, असे सांगून त्याला वडिलांनी बसवून ठेवलेला. बराच वेळ त्यांची चाकाशी झुंज चालली होती आणि तो मित्रही बघत होता. मुळात चाक निघत नव्हते, तर बदलण्याची काय कथा? शेवटी त्या मित्राने चिडून विचारले, ‘‘मेल्या वसंता करतंहस तरी काय?’’ त्यावर वडील उत्तरले, ‘‘ह्यो टायरचो नट निघाना म्हणून वेळ लागतासा.’’ तो टायपिकल मालवणी संवाद होता. साहजिकच त्या मित्राने चूक दाखवली. ‘‘मेल्या मगाधरून बघतंय मी, तू नट घट्ट करत बसलंय. मग टायर निघतलो कसो?’’ त्याच्या उपहासाने खजील झालेल्या वडिलांनी तरीही युक्तिवाद केला- ‘‘अरे, नट सैल करूचो तर तो घट्ट नको? म्हणान आधी घट्ट करत होतंय.’’ त्यानंतरच्या काळात तो आमच्या कुटुंबातला एक परवलीचा शब्द होऊन गेला होता. वडील चूक मान्य करायचे नाहीत, तेव्हा आई त्यांना एकच सुनवायची- ‘‘तुमचा काय, तुमी घट करून सैल करणारे!’’ खूप बालवयात ऐकलेला हा किस्सा आहे. अचानक त्याचे स्मरण झाले. कारण अर्थातच राजकीय आहे. त्रिपुरातील डाव्यांचा पराभव आणि पोटनिवडणुकातील भाजपाला बसलेला दणका, यामुळे देशातील नरेंद्र मोदी विरोधी राजकारणाला वेग आलेला आहे आणि तेलंगणा, बंगालच्या मुख्यमंत्र्यापासून मनसेच्या अध्यक्षांपर्यंत प्रत्येकाला मोदीमुक्त भारताचे वेध लागले आहेत. इतकीच सर्वांना मोदींची भीती वा चिंता असेल, तर त्यांनी मुळात 2014 सालातच मोदींना सत्तेपर्यंत का पोहोचू दिले? तेव्हा तर हा गृहस्थ गुजरातचा मुख्यमंत्री होता आणि त्याच्याकडे आजच्या इतकी उजळ मोठी प्रतिमाही नव्हती. म्हणजे तेव्हा मोदींना पराभूत करणे सोपे असून का दुर्लक्षित राहिले? त्याचे उत्तर उपरोक्त गोष्टीत दडलेले आहे.
आज तावातावाने प्रत्येक जण मोदींना पराभूत करण्याचा मनसुबा बाळगून आहे. मोदींमुळे देशाचे नुकसान होत असल्याचे दाखले दिले जात आहेत आणि काहीही करून मोदींपासून देशाची मुक्ती करण्याच्या आणाभाका घेतल्या जात आहेत. पण, एका प्रश्नाचे उत्तर कोणीच देत नाही. तो प्रश्न आहे- 2014 सालात तरी मोदींमुळे भारताचा असा कुठला लाभ व्हायचा होता, की याच सर्वांनी एकमेकांच्या पायात पाय घालून मोदींचा विजय सोपा कशाला केला होता? तेव्हाच प्रत्येक लहानमोठ्या वा प्रादेशिक पक्षाने शहाणपणा दाखवून मोदींना पंतप्रधानपदी पोहोचू दिले नसते, तर आज त्यांच्या विरोधात इतका आटापिटा करावा लागला नसता ना? म्हणूनच आधी 2014 सालात मोदींना अशी मोकळीक कशाला दिली, त्याचे उत्तर यापैकी प्रत्येक पक्षाने शोधले पाहिजे. पण तो प्रश्न विचारला जात नाही, की त्याचे उत्तर कोणी देत नाही. मग त्याचे उत्तर शोधावे लागते आणि मला ते उत्तर माझ्या वडिलांच्या फसव्या युक्तिवादात सापडले, असे वाटले. घट्‌ट असल्याशिवाय सैल करता येत नाही, म्हणून आधी घट्‌ट करणे, याचा अर्थ मोदींना पराभूत करण्यासाठी आधी मोदींना पंतप्रधानपदी स्थानापन्न होऊ देणे, असाच निघतो ना? आज कुठल्याही तत्त्वावर वा तडाजोडी करून मोदी विरोधात एकत्र यायला निघालेल्यांनी, 2014 सालात त्यापेक्षा कमी लवचीकता दाखवली असती, तरी 31 टक्के मते वा एनडीएची 43 टक्के मते घेऊन मोदी पंतप्रधान झाले नसते, की आज त्यांना इतके मजबूत होताही आले नसते. मग तशी मोकळीक विरोधकांनी मोदींना कशाला दिली असेल? कदाचित जितके मोदी मजबूत, तितके त्यांना पराभूत करण्यातले शौर्य अधिक, अशी समजूत त्याला कारणीभूत असावी. मोदींना पराभूत करण्याऐवजी पंतप्रधानाला पाडण्याचा पुरुषार्थ मोठा, असे त्यामागचे तर्कशास्त्र असू शकते. अन्यथा या लोकांनी चार वर्षांपूर्वीची संधी कशाला वाया घालवली असती?
आज मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणीस आपल्या पक्षाच्या अधिवेशनात कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचे प्रस्ताव मांडत आहेत; किंवा तेलंगणाचे मुख्यमंत्री कोलकात्याला भेट देऊन ममतांशी गुफ्तगू करीत आहेत. न मागितलेला पाठिंबा अखिलेशला देऊन मायावती पोटनिवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यात धन्यता मानत आहेत. पंधरा वर्षे चाललेली आघाडी मोडून भाजपाचा मार्ग सोपा करणार्‍या शरद पवारांना मोदींविरोधी आघाडी करायचे डोहाळे लागलेले आहेत. फार कशाला, चार वर्षांपूर्वी मोदीच पंतप्रधान व्हावेत म्हणून तावातावाने बोलणारे राज ठाकरेही मोदीमुक्त अशी भाषा बोलू लागले आहेत. त्यांनी तसे करण्याला लोकशाही व्यवस्था मान्यता देते. म्हणूनच मोदी वा भाजपाने त्याच्या विरोधात तक्रार करण्याचे काही कारण नाही. पण, मग तीच सद्बुद्धी त्यांना चार वर्षांपूर्वी कशी सुचलेली नव्हती? कालपरवा कुठेतरी बोलताना शरद पवार म्हणाले, तरुण वयात कोणीतरी तंबाखूच्या व्यसनापासून रोखायला हवे होते. त्याचे दुष्परिणाम मग भोगावे लागले नसते. याला पश्चातबुद्धी असे म्हणतात. अन्य कोणी आपल्याला व्यसनापासून मुक्त करावे, ही अपेक्षा गैरलागू नाही. पण, पवार हे तितके सामान्य बुद्धीचे गृहस्थ नाहीत. त्यांना अपायकारक गोष्टी नक्की कळू शकतात. म्हणजेच त्यांनी डोळसपणे ते व्यसन केले होते. त्यापेक्षा 2014 सालची राजकीय स्थिती भिन्न मानता येईल काय? आपले राजकीय रागलोभ वा मतभेद आपल्यालाच संकटात घेऊन जातील, हे राजकीय नेत्यांना वेळीच ओळखता येत नसते काय? आज नरेंद मोदी पंतप्रधान होण्यात यशस्वी ठरले, तर पाच वर्षांत ते असाध्य आव्हान होऊन बसतील, हे ओळखता आले नाही, अशाच राजकीय जाणत्यांचा भारतीय राजकारणात भरणा आहे काय? तर आहे! कारण तेव्हा त्यांना मोदी नावाचे आव्हान ओळखता आले नाही; किंवा त्यापेक्षाही अशा प्रत्येक नेता व पक्षाला आपल्या अहंकाराचे व्यसन सोडण्याचा शहाणपणा सुचलेला नव्हता.
 
 
थोडक्यात, आज अशा नेत्यांनी आपला अतिरिक्त शहाणपणा वा मोदींचे आव्हान सांगण्यापेक्षा, आधी आपला चार वर्षांपूर्वीचा मूर्खपणा कबूल केला पाहिजे. इतका थोडासा तंबाखू आपल्या आरोग्याला बाधक ठरणार नाही, ही मस्तीच संकटाला आमंत्रण असते. आजही त्या अहंकारातून किती राजकीय पक्ष व नेते बाहेर पडू शकलेले आहेत? व्यसन सोडायचे संकल्प अगत्याने केले जातात, पण पाळले जात नाहीत; तशी या नेत्यांची स्थिती आहे. त्यांना संकल्प करता येतात. पण, त्यासाठी अनेक मोह व आमिषे सोडण्याचा निर्धार आवश्यक असतो, त्याचा दुष्काळ आहे. म्हणून मग पळवाटा व युक्तिवाद शोधले जातात.
2014 सालात मोदी जिंकणार नाहीत, हा अहंकार दगा देऊन गेला आणि आजही मोदींचे निश्चित मूल्यांकन करण्यापेक्षा नुसते युक्तिवाद चालले आहेत. आपली चूक नाकारणारे माझे वडील आणि या विरोधकांची विधाने यात तसूभर फरक नाही. खरोखरच मोदींविरोधात लढायचे असेल, तर प्रत्येक पक्षाने आपला स्वार्थ, जागा किंवा अहंकार सोडून, मोदी पराभवाला प्राधान्य दिले पाहिजे. त्यातली पहिली अट आपल्या सहकारी वा मित्रपक्षाला अधिक जागा मिळतील तर मिळू देण्याचे औदार्य दाखवता आले पाहिजे. सगळे घोडे तिथेच येऊन अडते. मोदींना पराभूत करण्याविषयी एकमत आहे. पण, मग पंतप्रधान कोणी व्हायचे व नेतृत्व कोणाकडे जाणार, याविषयी शेकडो दिशांनी तोंडे करून विरोधक उभे आहेत. तीच विरोधी गोटातील मतभिन्नता मोदींचे आजचे बळ आहे. युक्तिवादात गुरफटून नट इतका घट्‌ट केला गेला आहे, की तो आता कितीही ताकद लावून सैल होताना दिसत नाही. त्यातून आणखी निराशा पदरी येते आणि त्यामागची मीमांसा करायला गेले, मग नट घट्‌ट करण्यातली चूक मानण्यापेक्षा आणखी घट्‌ट करण्यासाठी बुद्धी वापरली जात असते. मगे टायर निघतलो कसो आणि चाक बदली तरी होवचा कसा?
भाऊ तोरसेकर

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121