“आबा, आज कोणता ग्रहण प्रकार सांगणार आहात?”, सुमितने उत्सुकतेने विचारले.
“सुम्या, ग्रहणाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये चंद्र सूर्याच्या समोरून प्रवास करतो त्या सूर्यग्रहणाचा. तसे, जेंव्हा जेंव्हा चंद्र एखाद्या चांदणीच्या समोरून प्रवास करतो तेंव्हा तारा-ग्रहण घडते. कधी कधी एखादी चांदणी चंद्रामागे झाकली जाते. आणि आपल्याला ग्रहणाचा एक वेगळाच अविष्कार पाहायला मिळतो.”, आबा म्हणाले.
“आबा, हे चांदणीचे ग्रहण दिसते कसे?”, सुमितने विचारले.
“काय होते, चंद्र अशा टीमटीमणाऱ्या चांदणीच्या समोर हळूच येतो, आणि ती चांदणी अलगद चंद्रामागे लपते. कधी कधी चंद्रावरच्या एखाद्या उंचवट्यामागे लपलेली चांदणी, जराशाने हळूच दरीतून वाकून बघते, ‘पृथ्वीवरची ही सगळी लोकं बघतायत ना मला, शोधतायत ना?’ अशी खात्री करून घेते असावी बहुतेक! आणि खात्री पटल्यावर पुन्हा लपते! चंद्राचा समोरून प्रवास पूर्ण झाला की चांदणी पुन्हा दृश्य होते.
“पण काही ठराविकच चांदण्या चंद्रामागे लपू शकतात. का सांग बरे?”, आबांनी सुमितला विचारले.
सुमित विचार करून म्हणाला, “ज्या चांदण्या चंद्राच्या मार्गावर असतील त्याच चंद्रामागे लपू शकतील. ज्या त्याच्या मार्गापासून दूर आहेत, त्यांना काही असं लपाछपी खेळता येणार नाही.”
“अगदी बरोबर बोललास मित्रा! तेजस्वी चांदण्यांपैकी - मघा (Regulus), चित्रा (Spica), रोहिणी (Aldebran), कृत्तिका (Pleiades) आणि ज्येष्ठा (Antares) चंद्रामागे लपतात. यांच्या शिवाय इतर अनेक बारक्या चांदण्या सुद्धा चंद्रामागे लपू शकतात.”, आबा म्हणाले.
“अशा तारा - ग्रहणाला काय म्हणतात?”, सुमितने विचारले.
“याला म्हणायचे Occult. एक लहान ग्रह जेंव्हा एका मोठ्या ग्रहाच्या मागे झाकला जातो, तेंव्हा त्याला occult म्हटले जाते. Occult या Latin शब्दाचा अर्थ आहे ‘लपणे’. त्यामुळे जादूटोणा सारख्या गूढ, अनाकलनीय गोष्टींसाठी हा शब्द युरोप मध्ये वापरला गेला.”, आबा म्हणाले.
“शंकरराव ग्रहांचे काय? ते सुद्धा चंद्रामुळे ग्रासले जाऊ शकतात काय?”, दुर्गाबाईंनी विचारले.
“होय! कधी कधी गुरु, शुक्र, मंगळ वगैरे मंडळी सुद्धा चंद्रा मागे लपतात. चंद्राच्या मागे लपणारी, किंवा कधी चंद्रकोरीच्या अतिशय जवळून जाणारी शुक्राची चांदणी अफलातून दिसते!
“गुरूच्या बाबतीत तर असे होते की घाईघाईने आधी त्याचा एखादा चंद्र पुढे जाऊन आपल्या चंद्रामागे लपतो. मग एक एक करत गुरु आणि त्याचे इतर चंद्र पण लपतात. गुरु त्याच्या सगळ्या लाव्याजाम्यासह चंद्राच्या मागे लपतो आणि मग सावकाश दुसऱ्या बाजूने बाहेर येतो.”, आबा सांगत होते.
“शंकरराव जसे चंद्रामागे चांदणी लपू शकते, तसे ग्रहामागे पण चांदणी लपू शकते का?”, दुर्गाबाईंनी विचारले.
“वाह झकास प्रश्न विचारलात दुर्गाबाई! शुक्र, मंगळ वगैरे मंडळी क्वचित कधीतरी एखाद्या चांदणीच्या समोरून प्रवास करतात. तर कधी एक ग्रह दुसऱ्या ग्रहाच्या समोरून प्रवास करतो. आता गंमत पहा हं, समजा ग्रहाच्या मागे लपणारी चांदणी गपकन अंतर्धान पावली तर समजायचे की ग्रहावर अजिबात वातावरण नाही. आणि जर मिणमिणत लपली तर त्यावरील वातावरणाचा अंदाज घेता येतो. एकदा Uranus च्या मागे एक चांदणी मिणमिणत लपली आणि परत मिणमिणत बाहेर आली. त्या निरीक्षणावरून Uranus च्या भोवती असलेल्या कड्यांचा शोध लागला.”, आबा म्हणाले.
“आबा, असे occults वारंवार घडतात का?”, सुमितने विचारले.
“ग्रहामुळे घडणारे occults ही क्वचित घडणारी घटना आहे. शंभर वर्षातून १० – १५ वेळा. बर हा occult रात्रीच्या आकाशात घडायला हवा, कारण सूर्या जवळ घडला तर प्रखर प्रकाशात दिसत नाही. सूर्यग्रहण जसे पृथ्वीवरच्या ठराविक भागातूनच दिसते तसेच Occult चे पण आहे. त्यामुळे लोकवस्ती असलेल्या भागातून तो दिसायला हवा. अशा कारणास्तव ग्रहांमुळे घडणारा occult टिपायला मिळणे फारच अवघड असते. आणि ग्रहामुळे ग्रहाचा occult तर त्याहून दुरापास्त! म्हणजे बघ, १८१८ मध्ये गुरु शुक्राच्या मागे लपला होता. असा योग आता पुन्हा २०६५ येणार आहे.
“चंद्रामुळे मात्र वारंवार occults घडत असतात. दर दोन चार दिवसातून एखादा तरी होतच असतो. अर्थात आपल्याला शहरातील प्रकाशामुळे बारक्या चांदण्याच दिसत नाहीत, तिथे हे बारके occults काय दिसणार! पण जेंव्हा चंद्राची बारीक कोर, गडद अंधारात, तिच्या अंधेऱ्या बाजूने, एखाद्या तेजस्वी ताऱ्याला गिळंकृत करते ते दृश्य बघायला भारीच मजा येते!”, आबा म्हणाले.
दोघांना उठवत दुर्गाबाई म्हणाल्या, “बरे, मी काय म्हणते, रात्र गडद झाली आहे, पाने मांडली आहेत. तुमच्या गप्पा झाल्या असतील, तर चला ग्रहणायला ... आपलं, गिळायला!”
संदर्भ –
१. Sky & Telescope
२. What Is an Occultation? - Elizabeth Howell
- दिपाली पाटवदकर