बायंडिंगचा ब्रॅण्ड नितीन कांडर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2018   
Total Views |
 
 

 
 
२०१२ साली नितीनने सूरतमध्ये ‘नितीन बुक बायंडिंग वर्क्स’ची दुसरी शाखा सुरू केली. तिथेदेखील दीडशेच्या आसपास कामगार कार्यरत आहेत, तर ’युनायटेड रेप्रोग्राफिक्स’ नावाने नितीन कांडर यांनी प्रिंटिंग प्रेस सुरू केली आहे. एखादा कागद छापण्यापासून ते त्याचं बायंडिंग करण्यापर्यंत सारी कामे एका छताखाली केली जातात. सर्वसामान्य भाषेत सांगायचं झाल्यास प्रिंटिंग क्षेत्रातील ‘ए टू झेड’ सर्व कामे नितीन कांडर याची कंपनी करते.
 
कांजूरमार्ग. मुंबईच्या मध्य रेल्वेचे एक स्थानक. मुंबई पूर्व उपनगरातील मध्यम आणि निम्न मध्यमवर्गीयांचा म्हणून कांजूरमार्गची प्रामुख्याने ओळख. याच कांजूरमार्ग परिसरात बापू कांडर बायको, ३ मुली आणि मुलांसह आपला संसार सुखाने चालवत होते. एका प्रिंटिंग प्रेसमध्ये कामगार म्हणून कार्यरत होते. प्रचंड मेहनती, प्रामाणिक आणि विश्वासू या गुणांमुळे बापू कांडर हळूहळू मॅनेजर बनले. कामगारांचे पगार देणे, प्रिंटिंगची सारी कामे वेळेवर करून देणे, एखादा कामगार कामावर आला नाही तर त्याच्या ठिकाणी स्वत: उभं राहून काम पूर्ण करून देणे अशी सारी कामे बापू करत. एक दिवस बापूंना हृदयविकाराचा झटका आला. मालकाला वाटले बापू आता शारीरिकदृष्ट्या पूर्वीसारखं काम करू शकणार नाही. त्यांनी बापूला सरळ कामावरून काढून टाकले. आपल्या बाबांना निव्वळ ते आजारी पडले म्हणून नोकरीवरून काढून टाकले. ही बाब बापूंच्या १४ वर्षांच्या मुलाला, नितीनला खटकली. मात्र, ही खटकलेली बाबच पुढे नितीन कांडरला एका उंचीवर घेऊन गेली आणि प्रिंटिंग विश्वाच्या ‘प्रतिष्ठित’ मानल्या जाणार्‍या मासिकामध्ये नितीनवर एक लेख लिहून आला.
 
नितीन एका रात्रीत प्रिंटिंग क्षेत्रात ‘स्टार’ झाला. हा स्टार पुढे कोट्टींची उड्डाणे घेऊ लागला. नोकरीवरून काढल्यानंतर बापू इतर ठिकाणी नोकरी शोधू लागले. त्यांचे एक मित्र सी. आर. पिंटो त्यांना म्हणाले, ’’अरे बापू, वयाच्या चाळीशीत तुला नोकरी कोण देणार? तुझा प्रिंटिंगमध्ये खूप चांगला अनुभव आहे. तू प्रिंटिंगचाच बिझनेस कर.’’ मात्र, पैसे नसल्याने बापूंनी बायंडिंगचा व्यवसाय सुरू केला. काही निवृत्त झालेले, तर काहींना नोकरीतून काढून टाकले, अशा प्रिंटिंग प्रेसमधल्याच कसलेल्या पाच-सहा कामगारांना एकत्र आणून एका छोट्या झोपडीत त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. दरम्यान, नितीनने बारावी पूर्ण करून आयटीआयचा एक कोर्स केला. या कोर्सच्या जोरावर नितीनला बॉम्बे ऑईल कंपनीमध्ये नोकरी लागली. दिवसभर राबून, पाच-सहा कामगारांचा पगार देऊन बापू महिन्याला १० हजार रुपये कमावत असे, तर वयाच्या १७ व्या वर्षी नितीनला पगार होता आठ हजार रुपये. एवढ्या लहान वयात इतका जास्त पगार असल्याने साहजिकच कौतुकमिश्रीत मान नितीनला मान मिळू लागला. १९९३ सालच्या आसपास बापूंना परत हृदयविकाराचा झटका आला. नितीनने १५ दिवसांची सुट्टी काढली. सुदैवाने बापूंना दोन दिवसांतच डॉक्टरांनी घरी सोडले.
 
१३ दिवस करायचं काय? हा प्रश्न नितीनला पडला. बापू आजारी असल्याने नितीन बापूंच्या त्या झोपडीवजा कारखान्यात गेला. त्याचवेळी त्याला एक काम मिळालं. नितीनपेक्षा ४०-५० वर्षांनी मोठ्या असणार्‍या कामगारांसोबत नितीनने काम करून अवघ्या १० दिवसांत ६० हजार रुपये कमाविले. आपण जर १० दिवसांत कामकरून ६० हजार रुपये कमवू शकतो, तर पूर्ण महिना राबून आठ हजार रुपयांसाठी नोकरी का करायची? असा प्रश्न नितीनला पडला. आता नोकरी करायची नाही असा निर्धार करून नितीनने नोकरी सोडली आणि बायंडिंगच्या व्यवसायात स्वत:ला झोकून देण्याचा निर्णय घेतला.
 
बापू जरी व्यावसायिक असले तरी मुलाने सोन्यासारखी नोकरी सोडल्याचं दु:ख त्यांना झालं. ‘‘नोकरी सोडू नकोस,’’ असं त्यांनी नितीनला सांगितलं. मात्र, नितीन आपल्या निर्णयावर ठाम राहिला. पाच-सहा कामगारांनिशी सुरू झालेली ‘नितीन बुक बायंडिंग वर्क्स’ २०-२५ कामगारांच्या संख्येवर पोहोचली आणि आज हीच कंपनी सुमारे १५० कामगारांना रोजगार देते. २०१२ साली नितीनने सूरतमध्ये ‘नितीन बुक बायंडिंग वर्क्स’ची दुसरी शाखा सुरू केली. तिथेदेखील दीडशेच्या आसपास कामगार कार्यरत आहेत, तर ’युनायटेड रेप्रोग्राफिक्स’ नावाने नितीन कांडर यांनी प्रिंटिंग प्रेस सुरू केली आहे.
 
एखादा कागद छापण्यापासून ते त्याचं बायंडिंग करण्यापर्यंत सारी कामे एका छताखाली केली जातात. सर्वसामान्य भाषेत सांगायचं झाल्यास प्रिंटिंग क्षेत्रातील ‘ए टू झेड’ सर्व कामे नितीन कांडर याची कंपनी करते. राहणीमान अत्यंत साधी असलेले, कोणत्याही व्यक्तीशी आत्मीयतेने संवाद साधणारे नितीन कांडर आज आठ ते नऊ कोटी रुपयांची उलाढाल सहज करतात. जर तुमच्यात जिद्द असेल आणि प्रचंड कष्ट घेण्याची तयारी असेल, तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. नितीन कांडर यांचा जीवनप्रवास जणू काही हाच संदेश देतो.
 
 
 
 
- प्रमोद सावंत
 
@@AUTHORINFO_V1@@