नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणातील खटल्याची पुढची सुनावणी १४ मार्चला होणार असल्याचे आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. या प्रकरणातील काही कागदपत्रे आणि भाषांतर न्यायालयासमोर सादर होणे बाकी असल्यामुळे न्यायालयानी पुढील सुनावणीची तारिख दिली आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद या वादावर अनेक याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणीला आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुरूवात झाली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेले विशेष खंडपीठ या खटल्याची सुनावणी करणार आहे.
यावर्षीच्या अखेरपर्यंत अयोध्या प्रकरणाची निकाल देण्यात येईल असेही न्यायालयाने सांगितले आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये न्यायालयाने अयोध्या प्रकरणी अंतिम सुनावणीला फेब्रुवारीमध्ये सुरुवात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांनी आवश्यक असलेले सर्व महत्त्वाचे कागदपत्रे आणि इतर पुरावे न्यायालयात सादर करण्यात यावीत, असे निर्देश दोन्ही पक्षांना न्यायालयाने दिले होते. परंतु मुस्लीम पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी ही सुनावणी २०१९ पर्यंत राखून ठेवण्याची मागणी न्यायालयकडे केली होती. कारण या सुनावणीचा परिणाम देशाच्या निवडणुकांवर होऊ शकतो, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता. परंतु न्यायालयाने सिब्बल यांची ही मागणी धुडकावून लावत, सुनावणी फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.