सेवा किंवा परिवर्तनाची भावना समाजातला आशावाद जागवते. परंतु, समाज व्यवस्थित चालण्यासाठी सुनियोजित सत्ताकेंद्रांची आवश्यकता असते. ही समाजरथाची दोन चाके आहेत. त्यापैकी केवळ एका चाकावर समाज चालू शकत नाही. ही दोन्ही चाके स्वतंत्र आहेत, त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत, पण ती स्वायत्त नाहीत.
क्रांती घडविणारे एक असतात व सत्ता गाजविणारे दुसरेच असतात किंवा एखादी संस्था उभी करणारे एक असतात व नंतर तिच्यावर कब्जा करणारे दुसरेच असतात. हा अनुभव सार्वत्रिक आहे. केवळ त्या चळवळीचे नेतृत्व करणारी माणसेच बदलतात असे नाही, तर त्यांच्या प्राथमिकताही बदलतात. त्यामुळे जे खरेखुरे क्रांतिकारक असतात किंवा ज्यांनी आपला जीव ओतून संस्था उभी केलेली असते, त्यांचे नैराश्य पाहून जगात न्याय आहे की नाही, याची शंकाही वाटू लागते. यासाठी सहज समजणारे उदाहरण घ्यायचे असेल तर चांगले मराठी माध्यमातून शिक्षण मिळावे म्हणून एखाद्या कार्यकर्त्याच्या गटाने प्रयत्न करून एखादी शिक्षणसंस्था उभी करावी. ती नावारूपालाही आणावी, पण कालांतराने असे लक्षात येते की, केवळ मराठी माध्यमातून शिक्षण देणारी शाळा चालणे अवघड आहे. तिला इंग्रजी माध्यमाची जोड दिली पाहिजे. अशा वेळी ज्या माध्यमासाठी शाळा उभी केली ते टिकवायचे की शाळा टिकवायची, असा प्रश्न निर्माण होतो. ज्यासाठी शिक्षणसंस्था स्थापन केली तो उद्देश साध्य होत असेल तर ती बंद करावी, असे याला तर्कशुद्ध उत्तर असते. पण, ते प्रत्यक्षात आणणे अवघड असते. याचे कारण शिक्षणसंस्था चालण्यावर आता अनेक जणांचे भवितव्य अवलंबून असते, अनेक हितसंबंध निर्माण झालेले असतात. अशावेळी जर ‘मराठी माध्यमनसेल तर शिक्षणसंस्थाच नको,’ असे म्हणणारे अल्पमतात जातात व तरीही त्यांनी विरोध सुरू ठेवला, तर सत्तास्थानातून त्यांना बाहेर पडावे लागते. ज्यांनी कष्ट केले ते अशावेळी बाहेर पडतात व नंतर सत्तास्थानी आलेले सत्ताधारी बनतात. यात मराठीच्या मुद्द्याऐवजी अन्य कोणताही मुद्दा घातला तरी कहाणी तीच बनते.
मग प्रश्न असा उभा राहतो की, समाजकारण आणि सत्ताकारण यांचे परस्पर संबंध हे ’अहि नकुला’सारखे परस्पर विरोधीच आहेत का? दुसर्या शब्दात सांगायचे तर चांगला कार्यकर्ता चांगला नेता बनूच शकणार नाही का? याचे उत्तर शोधायचे असेल तर या दोन्ही कामांच्या प्रेरणेचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. समाजकारणाच्या प्रेरणेचा उगम हा हृदयातून होतो. विद्यमान व्यवस्थेतील उणिवांमुळे त्या बदलण्याच्या प्रेरणेतून सामाजिक कार्यकर्ता कार्यरत होतो. प्रचलित परिस्थिती बदलण्याच्या आकांक्षेतून व्यक्तिगत नफा-नुकसानीचा विचार न करता तो कार्यरत होतो. आपल्या त्याग भावनेने व आपल्या ध्येयाप्रत असलेल्या समर्पित वृत्तीने तो समाजातील नैतिक शक्तीला आवाहन करतो. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी समाजातले अनेक घटक उभे राहतात. परंतु, एका टप्प्यानंतर त्या सेवा प्रकल्पाचे सत्ता स्थानात रूपांतर होते. एखाद्या संस्थेच्या सेवा प्रकल्पाचे सत्तेत रूपांतर केव्हा होते ते समजण्याची एक साधी खूण आहे. जेव्हा ती संस्था चालविण्याकरिता लोकांकडे जावे लागते, तोवर ती सेवा संस्था असते व जेव्हा आपल्या हितसंबंधासाठी लोक तिच्याकडे येऊ लागतात तेव्हा ते सत्तास्थान बनते.
सेवा संस्था चालविण्याकरिता लागणारे गुण व ते सत्ताकेंद्र बनल्यावर लावणारे गुण यात फरक असतो. सत्ता हृदय किंवा भावनेवर चालत नाही, तर बुद्धीवर चालते. ती हिशोबी बनते. आपल्या भोवतालच्या वेगवेगळ्या हितसंबंधांचा तोल कसा सांभाळायचा याचा तिला विचार करावा लागतो. सेवा संस्था चालविताना येणारी प्रलोभने कमी असतात, जवळपास नसतातच. परंतु, सत्तास्थानावर आल्यानंतर पदोपदी ती उभी राहतात. सेवाकार्य करणार्यांना स्पर्धक कमी असतात. त्यांच्या कार्यामुळे ज्यांचे हितसंबंध धोक्यात येतात तेवढेच स्पर्धक असतात. परंतु, सत्तास्थानी प्रत्येकजण दुसर्याचा स्पर्धक बनतो. त्यामुळे सेवा प्रकल्प चालवत असताना जे सहकारी असतात तेही एकदा सत्तास्थान आल्यावर एकमेकांचे स्पर्धक बनतात. हा त्यांचा दोष नसतो. सत्तापदाचा तो अपरिहार्य गुणधर्म आहे. एकदा सत्तापदावर आल्यानंतर त्याचा दृष्टिकोन, विचारांची पद्धत बदलते. सामाजिक कार्य करताना अशक्य ते साध्य करण्याची उर्मी असते, तर सत्तास्थानी बसल्यावर परिवर्तनापेक्षा सत्तास्थान टिकविण्याचे उद्दिष्ट महत्त्वाचे बनते.
सेवा भावना किंवा क्रांतीच्या भावनेवर जेव्हा सत्ता भावना वरचढ होऊ लागते, तेव्हा त्यावर मात करण्याचे प्रयत्नही झाले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याकरिता प्रयत्न करणार्या कॉंग्रेसचे सत्तापिपासू कॉंग्रेसमध्ये रूपांतर होत असताना म. गांधींनी पाहिले. त्यामुळे कॉंग्रेसचे राजकीय स्वरूप बदलून त्याचे लोकसेवक संघात रूपांतर करण्याची योजना त्यांनी बनविली होती. गांधीहत्येनंतर प्रकाशित झालेल्या ’हरिजन’च्या अंकात ती प्रकाशितही झाली आहे. गांधीहत्या झाली नसती तर गांधींनी ती कशी अमलात आणली असती व त्याला गांधी, पटेल व अन्य नेत्यांनी कशी साथ दिली असती? हे आता केवळ कल्पनेतलेच विषय उरले आहेत. दुसरा प्रयत्न माओने चीनमध्ये केला. क्रांतीनंतर सर्वजण क्रांतीची उद्दिष्टे विसरून सत्ता गाजविण्यात गर्क झाले आहेत. ते पाहून त्याने सांस्कृतिक क्रांतीची हाक दिली. त्यानंतर चीनमध्ये अभूतपूर्व असे हत्याकांड झाले. जमाववाद प्रभावी झाला. अनेक अधिकार्यांना जमावाने आपल्या खुर्च्यांवरून खाली खेचले. चीनमध्ये प्रचंड अराजक निर्माण झाले. जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तेव्हा माओला सांस्कृतिक क्रांती मागे घ्यावी लागली.
सेवा किंवा परिवर्तनाची भावना हा समाजातला आशावाद जागवते. परंतु, समाज व्यवस्थित चालण्यासाठी सुनियोजित सत्ताकेंद्रांची आवश्यकता असते. ही समाजरथाची दोन चाके आहेत. त्यापैकी केवळ एका चाकावर समाज चालू शकत नाही. ही दोन्ही चाके स्वतंत्र आहेत, त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत, पण ती स्वायत्त नाहीत. जे परिवर्तन घडायचे असेल ते अंतिमत: सत्ताकेंद्रांद्वारेच घडत असते. ज्यासाठी परिवर्तन झाले ते लक्षात न घेता, जर सत्ताकेंद्र चालू लागले तर त्यामागचा नैतिक पाया ढासळतो व असे सत्ताकेंद्र फार काळ टिकू शकत नाही. एकेकाळी गांधी टोपी ही गांधीजींच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करीत होती, सामाजिक विश्वासाचे प्रतिनिधित्व करीत होती. ती एकदा सत्ता मिळविण्याचे साधन बनल्यानंतर तिची काय अवस्था झाली याचे भेदक चित्र जयवंत दळवी यांनी ’पुरुष’ नाटकात उभे केले आहे. लोकांच्या वेदनेला वाचा फोडणार्या गांधीटोपीचा उपयोग एका बलात्कारित स्त्रीचा आवाज बंद करण्याकरिता गुलाबराव करतो. सेवेचे प्रतीक असलेली गांधीटोपी जेव्हा सत्ता गाठण्याचे साधन बनते, त्यातून त्याच्या अवमूल्यनाची अपरिहार्यता त्यातून दिसते. गांधीटोपी अपवाद नाही. हे कोणत्याही संघटना, चळवळी, संघटनेबाबत घडू शकते. सत्तेला आपला तोल तेव्हाच सांभाळता येतो, जेव्हा तिला मूल्यांचे भान राहाते व क्रांती किंवा परिवर्तन तेव्हाच अर्थपूर्ण राहाते, जेव्हा सत्तास्थानाच्या मर्यादा लक्षात घेऊन अपेक्षा केल्या जातात.
- दिलीप करंबेळकर