“प्रगती आणि विकासाच्या मार्गावरील भारताचा प्रवास नव्या वर्षातही अखंडितपणे कायम राहील, देश नव्या शक्तिनिशी नवीन उंची गाठेल, असे मला प्रामाणिकपणे वाटते. याच अनुषंगाने आपण सर्व एकत्र येऊन सकारात्मक व्हायरल तयार करू, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना, समाजात बदल घडविणाऱ्या आपल्या हिरोंविषयी माहिती मिळेल. काही लोक समाजात नकारात्मक व्हायरल पसरवत आहेत, तर अनेक जण आपल्या सभोवताल खरोखरच चांगले आणि सकारात्मक काम करीत आहेत. अनेक वेबसाईट सकारात्मक बातम्या प्रसारित करीत आहेत, नागरिकांनीही असेच सकारात्मक काम करावे, जेणेकरून समाजात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होईल,” असे पंतप्रधान म्हणाले.
“२०१८ हे वर्ष ‘आयुष्मान भारत’ ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना अमलात आणणारे ठरले आहे. याच वर्षी देशातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात वीज पोहोचली आहे. भारतातील दारिद्य्राचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे, हे जगातील नामांकित संस्थांनी आपल्या अहवालातून मान्य केले आहे. देशवासीयांनी घेतलेल्या स्वच्छतेच्या निर्धाराचे प्रतिबिंब देशात सर्वत्र दिसत आहे. देशातील स्वच्छतेचे प्रमाण ९५ टक्क्यांच्या घरात पोहोचले आहे. सिक्कीमच्या रूपात देशाला शंभरावे विमानतळ मिळाले, इतकेच नव्हे तर, स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच स्वातंत्र्य दिनाव्यतिरिक्त लाल किल्ल्यावर यावर्षी तिरंगा फडकविण्यात आला. आझाद हिंद सरकारच्या ७५ व्या स्थापना दिनानिमित्त अलीकडेच लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या जगातील सर्वांत मोठ्या पुतळ्याचे याचवर्षी राष्ट्रार्पण करण्यात आले. पद्म पुरस्कारांच्या धर्तीवर मी अलीकडेच राष्ट्रीय एकात्मतेकरिता सरदार वल्लभभाई पुरस्कारांची घोषणा केली. इतकेच नव्हे, तर संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ भारताला जाहीर करण्यात आला,” याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पुण्याच्या वेदांगीचे कौतुक
“या वर्षात खेळ जगतातही देशाने उत्तम कामगिरी केली आहे. अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक आणि ब्लाईंड क्रिकेट विश्वचषकात भारताने गौरवास्पद कामगिरी केली आहे. आसियान स्पर्धांमध्येही भारताने मोठ्या संख्येने पदके जिंकली आहेत. याच महिन्यात पुण्याच्या वेदांगी कुळकर्णीने सायकलवरून जगाची फेरी पूर्ण केली. सुमारे २९ हजार किलोमीटर अंतर सायकलवरून १५४ दिवसांत पार करीत कमी वेळेत जगप्रदक्षिणा पूर्ण करणारी आशियातील सर्वांत वेगवान महिला सायकलपटू ठरलेल्या वेदांगीचे मी मनापासून कौतुक करतो, तसेच कोरियात झालेल्या कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या श्रीनगरच्या १२ वर्षांच्या हनाया निसारचेही कौतुक करतो,” असे मोदी म्हणाले.
अण्वस्त्रक्षमता वाढली
“या वर्षात भारताची संरक्षण क्षमता कितीतरी पटीने वाढली आहे. अतिशय शक्तिशाली असलेल्या विविध क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या करण्यात आल्याने आता देशाची समुद्र, जमीन आणि हवेतून मारा करण्याची क्षमता प्रचंड वाढली आहे,” असे सांगताना त्यांनी आयएनएस अरिहंत या आण्विक पाणबुडीच्या अलीकडील चाचणीचा संदर्भ दिला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/