जामनेरला सरपंच-उपसरपंच मेळाव्यात भास्कर पेरे-पाटील यांचे प्रतिपादन
जामनेर :
आई जशी आपल्या मुलांचा सांभाळ करून त्याला घडविते, तशाच प्रकारे प्रत्येक सरपंचांनी आपआपल्या गावासाठी आई झाले पाहिजे, असा मोलाचा सल्ला पाटोदा जिल्हा औरंगाबाद येथील आदर्श पुरस्कारप्राप्त सरपंच भास्कर पेरे-पाटील यांनी दिला. पेरे-पाटील बाजार समितीच्या शेतकरी निवासात आयोजित सरपंच, उपसरपंचांच्या तालुका मेळाव्यात बोलत होते.
व्यासपीठावर पुरुजीत चौधरी, श्रीकांत महाजन, तालुकाध्यक्ष विनोद चौधरी, अशोक राजपूत, रूपाली पाटील, लीलाबाई नाईक, अश्विन राजपूत, सुनील धुरळे, प्रशांत अवसरमोल, संजय देशमुख, दीपक चव्हाण, भाविनी पाटील, युवराज पाटील, समाधान पाटील आदी होते.
सरपंचांनी मनावर घेतल्यास दोनच वर्षात गावाचा विकास होऊ शकतो.आमच्या गावात आम्ही ग्रामपंचायतीमार्फत सकाळी दोन तास नळाद्वारे गरम पाणी, स्वच्छ पिण्याचे पाणी, थकबाकी नसलेल्या प्रत्येक कुटुंबासाठी सर्वप्रकारचे दळण मोफत, स्वच्छता, वृक्षारोपणासह अनेक मूलभूत सोयी-सुविधा राबविल्या जात आहेत, अशी माहितीही पोरे-पाटील यांनी दिली.
प्रास्ताविक सुहास चौधरी यांनी तर सूत्रसंचालन शांताराम जाधव आणि आभार श्रीकांत पाटील यांनी मानले. या मेळाव्यात परिसरातील सरपंच उपस्थित होते.
योजना असूनही गावाचा विकास नाही
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकही सरकारी योजना नव्हती, तरीही गावागावांचा विकास होतच होता. आता तर तीनशेच्या वर योजना असूनही गावांचा विकास का होत नाही, असा प्रश्न पेरे-पाटील यांनी विचारला.
त्यावेळी उपस्थितांचा चेहरा पाहण्यासारखा होता. तसेच गावात जाती-पातीचे राजकारण न करता गावाच्या विकासकडे लक्ष दिले पाहिजे. महिलांमध्ये काम करण्याची क्षमता असल्याने त्यांना जास्तीतजास्त संधी देण्याची गरजही पेरे-पाटील यांनी भाषणात सांगितली.