१९८४ साली दिल्लीमध्ये शीखविरोधी दंगल उसळली होती. या दंगलीशी संबंधित दोन खटले सीबीआयने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांच्याविरोधात दाखल केले होते. जमावाला भडकावून दंगल भडकवण्याचा आणि शीख कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याचा खटला सज्जन कुमार यांच्यावर होता. हत्येच्या खटल्यातून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. परंतु दंगल भडकवणे, जमावाला भडकवणे या खटल्यात त्यांना न्यायालयाने दोषी ठरवले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर ३१ डिसेंबरपर्यंत सज्जन कुमार यांना शरणागती पत्करावी लागणार आहे. १९४७ साली भारत पाकिस्तान फाळणीच्यावेळी ज्याप्रमाणे अनेक लोकांची हत्या करण्यात आली होती. अशाचप्रकारची घटना दिल्लीमध्ये ३४ वर्षांपूर्वी घडली होती. परंतु राजकीय संरक्षण असल्याने आरोपी सुटले होते. असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. एस. मुरलीधर आणि न्या. विनोद गोयल यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
याप्रकरणी बलवान खोखर, कॅप्टन भागमल आणि गिरीधारी लाल या तिघांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. माजी आमदार महेंद्र यादव आणि बलवान खोखर यांच्या शिक्षेत वाढ करून त्यांना प्रत्येकी १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याआधी कनिष्ठ न्यायालयाने या दोघांना प्रत्येकी ३ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. दिल्ली छावणीच्या राजनगर परिसरात ३४ वर्षांपूर्वी एका शीख कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती. सीबीआय, पीडित व्यक्ती आणि आरोपींचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायालयाने २९ ऑक्टोबर रोजी या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. आज या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल देऊन काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/