मुंबई : रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढाव्याला आठवडा शिल्लक असताना भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) मुदत ठेवींच्या व्याजदरात बुधवारपासून बदल केले. बुधवारपासून विविध मुदत ठेवींवर ०.५ ते ०.१० टक्क्यांनी वाढ केली.
यापूर्वी एसबीआयने जुलै २०१८ मध्ये मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती. एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक या बॅंकांनी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवल्यानंतर एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. एसबीआयने व्याजदरांमध्ये ०.५ ते ०.१० टक्क्यांची वाढ केली आहे.
यात किमान एक किंवा दोन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींवर ६.८० टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. यापूर्वीचा व्याजदर ६.७० टक्के इतका होता. दोन ते तीन वर्षांवरील मुदत ठेवींवर ६.७५ टक्क्यांऐवजी ६.८० टक्के व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर ७.२० टक्क्यांऐवजी आता ७.३० टक्के व्याज मिळणार आहे.