मुंबईतील ब्रिटिशांनी उभारलेल्या वास्तू म्हणजे आर्ट डेको. या आर्ट डेकोमध्ये समावेश होतो तो रहिवाशी इमारतींपासून ते अगदी कारंजांचाही. जून २०१८ मध्ये या वास्तू वारसा स्थळे म्हणून घोषित झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनेही त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले. अशाच काही वास्तूंची, त्यांच्या दुरुस्ती कामांची माहिती देणारा हा लेख...
मुंबईतील अनेक आर्ट डेको इमारतींना वारसास्थळे म्हणून किताब मिळाला आहे व मुंबई महापालिकेने त्यांच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव प्रकल्प बनविला आहे. या नूतनीकरणाच्या प्रकल्पांचा उद्देश हा आहे की, ही स्थळे वा इमारती बऱ्याच वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या असल्याने त्यांची दुरुस्ती करणे जरूरीचे आहे. दुसरा उद्देश हा आहे की, स्थळ-क्षेत्रांच्या सृष्टिसौंदर्यात वाढ व्हावी. फ्लोरा फाऊंटनला वारसास्थळातील पहिल्या दर्जाचा किताब मिळालेला आहे. त्यामुळे जगातील पर्यटकांसाठी हे जलकारंजे आकर्षण ठरेल. ही आर्ट डेकोची स्थळे मुंबईतील कुलाबा, चर्चगेट, फोर्ट, कंबाला हिल, मोहम्मद अली रोड, माटुंगा, दादर, जुहू ते चेंबूर या ठिकाणी वसली आहेत. मुंबईतील समुद्र किनाऱ्यासमोरच्या मरिन लाईन्सच्या उंच इमारती सौंदर्यांत अधिकच भर टाकतात. या इमारतींबरोबर फ्लोरा फाऊंटनसारख्या काही वारसास्थळांना ‘युनेस्को’कडून पहिल्या दर्जाचा किताब मिळाला आहे. मुंबईतील विशेषत: दक्षिण मुंबईत ही अनेक आर्ट डेको शोभिवंत स्थळे आहेत, जी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. अमेरिकेतील मियामी शहराच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाच्या संख्येने ही स्थळे १९३० पासून बांधली गेली आहेत. ही सर्व स्थळे स्वातंत्र्यपूर्व काळात बांधली असल्यामुळे त्यांना पाश्चिमात्त्य रंगांची शान आली आहे. ही सगळी आकर्षक स्थळे व इमारती मुंबईतील मराठी, गुजराती व पारशी वास्तुविशारदांनी व मोठ्या कंत्राटदारांनी बांधली आहेत. या सगळ्यांविषयी माहिती दिली आहे, आभा नारायण लंभा यांनी, जे वारसा व ऐतिहासक संकुलांचे संरक्षण करणार्यांपैकी एक सल्लागार आहेत. या सगळ्या वास्तूंच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव तयार होत असून या वास्तू सुरक्षित राहाव्यात, असे प्रयत्न सुरु आहेत. या आर्ट डेकोंच्या आकर्षणामुळे अनेक पर्यटक या वास्तूंना भेट देतील व त्यातून निधीसंकलन होईल, असा विश्वास पालिकेला वाटतो.
हुतात्मा चौक
हे फ्लोरा कारंजे बनल्यानंतर त्यावेळचे मुंबईचे मुख्य अधिकारी बार्ल्टले फ्रिअर यांच्या नावाने ते समर्पित केले गेले. ईस्ट इंडिया कंपनीने बांधलेला मुंबईतील किल्ला प्रदेश विभाग (Fort area) अधिकारी फ्रिअरने विकासकामे लवकर व्हावीत म्हणून तोडून टाकला होता. या किल्ल्याला तीन दरवाजे होते ते म्हणजे, अपोलो, चर्च व बझार. हे तिन्हीही दरवाजे अजूनही अपोलो गेट, चर्चगेट व बझारगेट म्हणून ओळखले जातात. फ्रिअरने त्यानंतर हॉर्न्बी रोड (दादाभाई नवरोजी रोड) बांधला. हा रस्ता सर्व मुंबईकरांच्या परिचयाचा झाला आहे. कारण, तेथे मोठ्या प्रमाणात झालेले व्यावसायिकरण. फ्लोरा फाऊंटनचे बांधकाम पश्चिम भारतातील अॅग्री-हॉर्टीकल्चरल सोसायटीने केले. या कामाकरिता कर्सेटजीफर्दुमजी पारेख यांनी देणगी दिली. रिचर्ड नॉर्मन शॉ यांनी तो रचित केला. त्याचे शिल्पकाम जेम्स फॉर्सिथनी पोर्टलँड लाद्यांचे बनविले. भव्य अशा रोमन फ्लोरा नावाच्या पुष्पदेवतेच्या स्मारकाचे व इतर आकर्षक नक्षींचे शिल्पकाम त्या रचित स्थापत्य कामावर केले गेले. यातून जलकारंजाच्या वाहिनींचे काम अतिसुंदर दिसू लागले. त्यावर पांढऱ्या रंगाच्या ऑईलपेंटमुळे ते सुरुवातीच्या काळात जरी चकाकले असले तरी, त्या पेंटमुळे जास्त काळ टिकले नाही व पुरातन कारंजाच्या धातूंचे अवशेष दिसायला लागले. हे जलकारंजे ब्रिटिश कारकिर्दीत १८६४ मध्ये पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन झाले होते. त्याच्या ४७ हजार खर्चापैकी २० हजार रुपयांची मदत कर्सेतजी पारिख यांनी केली. कारंजे असलेल्या ठिकाणाची स्थापत्त्य कामे सौंदर्यवर्धनाकरिता पोर्टलँड लाद्यांची व इतर सुंदर कलाकृतींनी बनविली होती.
फ्लोरा फाऊंटन दक्षिण मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले आहे. या ठिकाणाहून अनेक व्यावसायिक, शैक्षणिक, सरकारी इमारती जवळ आहेत. रात्रीच्या वेळेला या फाऊंटनला दिव्यांची रोषणाई केली, तर सौंदर्यात भर पडते. संयुक्त महाराष्ट्र समितीला मुंबईसह महाराष्ट्र मिळाल्याने फ्लोरा फाऊंटनचे नाव १०५ हुतात्मांच्या नावाने ‘हुतात्मा चौक’ म्हणून १९६० पासून घोषित झाले व तो चौक आता याच नावाने ओळखला जाऊ लागला. या प्रकल्प कामामध्ये जलकारंजे, स्मारक पुतळ्याची दुरुस्तीची कामे व सभोवतालच्या सुशोभितरचना कामांकरिता नकाशा बनविण्याचे व संरचनेचे काम वास्तूविशारद विकास दिलावरी व संरचना तज्ज्ञांकडे दिले गेले. या प्रकल्पाचे २.६७ कोटी रुपये स्थूल मूल्य काढले गेले. फ्लोरा फाऊंटनच्या नूतनीकरणाची कामे नोव्हेंबर २०१८च्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण झाली. पहिल्या टप्प्याच्या शिल्पाच्या दुरुस्तीचे काम २०१६ पासून सुरू झाले. त्यात सुंदर लाद्यांना धक्का लागू नये म्हणून हळूवार हाताने माती, धूळ व जुना रंग काढणे, कारंजाकरिता जलअभियांत्रिकी काम न दिसणाऱ्या वाहिन्यांनी पूर्ण करणे, कारंजाच्या पायामध्ये इटालियन मार्बल लाद्या बसविणे, यांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्याच्या सौंदर्यवर्धीत कामांत कारंजाभोवतालच्या सुंदर बागेचे नूतनीकरण करून पर्यटकांच्या प्रवेशाची सोय करणे, त्यावरील स्लॅबकरिता जुन्या वारसा बेसाल्ट खडकांचे नूतनीकरण करणे, पोलादी कुंपणजाळ्या घालण्याऐवजी न गंजणाऱ्या रॉट लोखंडाच्या कठड्यांनी बांधले जाईल. शिल्पांवर काही रसायने लावावी लागतील, त्यामुळे ही वास्तू १०० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहील.
वारसा स्थळाच्या दर्जाला शोभेल अशी सोनेरी रोषणाई
सुधारित उद्यान बनविण्याकरिता उंचावर बाग करण्याऐवजी पर्यटकांना त्यात शिरून आनंद उपभोगण्याची सोय करता येईल. या कामाभोवती लोखंडी कुंपण बांधणे, सभोवताली सौंदर्यसृष्टी बनवायला हवी. बसायला लाकडी बाके, भोवती व्हिक्टोरिअन ग्रील व पायरस्ते हे नक्षीदार लाद्यांचे बनणार आहेत. पालिका आयुक्तांनी २०१६ सालच्या आर्थिक संकल्पात पाच कोटी रुपये राखून यासाठी मान्यता दिली होती.
चित्रपटगृहे
इरॉस, रिगल, एक्ससेलसिअर, अलेक्झाडंर, लिबर्टी यांसारखी चित्रपटगृहे आर्ट डेको एलिव्हेशंनी नटलेली आहेत. परंतु, गेल्या २० वर्षांत या चित्रपटगृहांना दूरदर्शनमुळे वा अनेक प्रकारचे कर द्यावे लागल्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे बऱ्याचजणांनी ती विक्रीला काढली आहेत. महाराष्ट्रातील १२०० पैकी आता या प्रकारातील केवळ ४७५ ही चित्रपटगृहे राहिली आहेत. मुंबईतील मोठ्या पडद्याची अशी १०० पैकी केवळ ५५ चित्रगृहे राहिली आहेत. अनेक आर्ट डेकोंच्या संरक्षक दलांनी ही चित्रपटगृहे जागतिक पर्यटकांना आकर्षित करणार असल्याने त्यांच्या संरक्षणाचा पाठपुरावा केला. मेट्रो सिनेमासमोरील वाहतूक बेटावरील १८६७ मध्ये बांधलेले कास्ट आयर्नरचित फिझराल्ड जलकारंजे १९६० मध्ये रस्तारूंदीकरण कामाकरिता भायखळ्याच्या भाऊदाजी लाड म्युझियममध्ये हलविण्यात आले होते. पालिका अधिकारी म्हणतात, “आम्ही ते परत जागेवर आणण्याचे प्रयत्न करणार आहोत. यातून मुंबईच्या रस्त्यावरील सौंदर्यात भर पडेल.” मात्र, वाहतूक पोलिसांनी या प्रस्तावाला मान्यता देण्याचे टाळले आहे. कदाचित हे कारंजे वासुदेव बळवंत फडके मार्ग व महापालिका मार्गाच्या संगमाठिकाणी बांधले जाईल. तेथे रोषणाई करून त्याचे सुशोभिकरणही करता येईल.
इतर स्थळे
भायखळ्याजवळील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय. सध्या वारसावास्तू असलेल्या भायखळ्याच्या राणीबागेतील बंगला संग्रहालयाच्या प्रमुखांना राहावयास दिला आहे. हा लाकडी सागाचा बंगला १०० वर्षे जुना आहे व त्याचे छत हे मंगलोर टाईल्सनी सजले आहे. पालिका या नूतनीकरणाच्या प्रकल्पाकरिता पुढील वर्षात १.११ कोटी स्थूल खर्चाची कामे करणार आहे. याशिवाय वांद्रे स्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावरील वांद्रे तलाव पण वारसावास्तूंच्या ‘दर्जा २’ च्या यादीत आहे. हा तलाव मध्यम आकाराचा असून जलतळे साडेसात एकर व्याप्तीचे आहे. तळ्याभोवती सुंदर अशी झाडे वाढलेली ठेवणार आहेत. हे एक शांत ठिकाण असून गेली २०० वर्षांपासून ते मुंबईकरांच्या पसंतीस उतरले आहे. राजाबाई टॉवर, मुंबई विद्यापीठ इमारत व मूळजी जेठा कारंजे यांचे नूतनीकरण झाले व या कारंजाकरिता वास्तूविशारद विउकास दलवारी काम करीत होते. याशिवाय माटुंगा लेबर कॅम्प जवळील गोलाकार अरोरा इमारत, जुने वॉटसन हॉटेल असलेले आता एक्सप्लनेड मॅन्शन एक कास्ट आयर्नची इमारत आहे. रॉयल ओपेरा हाऊस १९११ साली बांधलेल्या वास्तूचे नूतनीकरण २०१९ मध्ये झाले, १८८७ मध्ये न्यू एक्सेल्सिअर बांधलेल्या चित्रपटगृहाचे २०१६ मध्ये ‘मुक्ता ए २’ नावाने नूतनीकरण झाले. १९२१ मध्ये बांधलेले जुने नागपाडा वा अलेक्झांडर सिनेमागृह २०११ मध्ये तिचे मशीद व मुस्लीम संस्थांच्या इमारतीत रूपांतर झाले. तेव्हा, मुंबईकर म्हणून अशा आपलाच शहरातील वारसा स्थळांची, वास्तूंची आपल्याला माहिती हवी, यासाठी केलेला हा लेखप्रपंच.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/