'चांद्रयान - २' आणि 'इस्रो'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018   
Total Views |
 

भारताची ‘चांद्रयान-२’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम लांबणीवर पडली असून ती आता एप्रिल २०१८ ऐवजी जानेवारी २०१९ मध्ये शक्य होणार आहे. तेव्हा, ही मोहीम नेमकी काय आहे, त्याची माहिती देणारा हा लेख...

 

'इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून जीएसएलव्ही-एमके-३ डी-२ या प्रक्षेपकाद्वारे सायंकाळी या उपग्रहाचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले. भारताच्या प्रक्षेपणात सर्वात वजनदार असल्याने त्याला ‘बाहुबली’ असे टोपणनाव दिले आहे. बाहुबलीची क्षमता जून २०१७ मध्ये प्रक्षेपित केलेल्या जीएसएलव्ही-एमके-२ या उपग्रहाच्या दुप्पट आहे. श्रीहरीकोटा येथील या रॉकेटवाहनाचे ६७ वे प्रक्षेपण होते. हा उपग्रह बनवायला ‘इस्रो’ला तब्बल १५ वर्षे लागली व या प्रकल्पाला रु. ५०० कोटी (रु. ३०० रॉकेटकरिता व रु. २०० कोटी उपग्रहाकरिता) खर्च झाला. हे जीएसएलव्ही एमके-३ रॉकेट २०२२ मधील भारताच्या अवकाशात उड्डाण घेणार्‍या मानवी मोहिमेकरिता व जानेवारी २०१९ मध्ये प्रक्षेपित होणार्‍या ‘चांद्रयान-२’ या मोहिमेकरिता खास उपयोगी ठरणार आहे. या रॉकेट जीएसएलव्ही एमके-३ वाहनाबरोबर पाठविलेला उपग्रह ‘जीसॅट २९’ हा ईशान्य भारत व जम्मू-काश्मीर या दुर्गम भागातील संपर्क यंत्रणा गतिमान करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांनी माहिती दिली की, अवकाशात २०२२ मध्ये मानवी उड्डाण होण्यापूर्वी चाचणीकरिता दोन मानवरहित उड्डाणे केली जातील व त्यातील पहिले मानवरहित उड्डाण डिसेंबर २०१९ मध्ये करण्याचे ठरले आहे.

 

चांद्रयान-२ ची मोहीम

 

जीसॅट ६-अ हा लष्करी संदेशवहन उपग्रह आणि आयआरएनएसएस १-एच या उपग्रहांबाबत संपर्क तुटल्यामुळे आणि आयआरएनएसएस उपग्रहाकरिता उष्णतारोधक आवरण न उघडल्याने आलेल्या अपयशामुळे भारताची ‘चांद्रयान-२’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम लांबणीवर पडली असून ती आता एप्रिल २०१८ ऐवजी जानेवारी २०१९ मध्ये शक्य होणार आहे. पण, त्याआधी सावध पवित्रा म्हणून काही चाचण्या केल्या जातील. ‘चांद्रयान-१’ व ‘मंगळयान’ या दोन्ही मोहिमा यशस्वी पार पाडल्यानंतर तिसरी मोहीम ‘चांद्रयान-२’ ही अपेक्षित आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेत भारत प्रथमच चंद्राच्या आजपर्यंतच्या संशोधन न झालेल्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर रोव्हर गाडी उतरविणार आहे. अंतराळ स्पर्धेत इस्रायल पुढे जाण्याची शक्यता आहे, कारण सर्व काही त्यांच्या योजनेनुसार घडले तर १३ फेब्रुवारी २०१९ ला इस्रायलचे यान चंद्रावर उतरेल. अमेरिकेतील अंतराळ उद्योजक इलॉन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ या कंपनीच्या प्रक्षेपकावरून इस्रायलचे यान सोडण्यात येईल. ते चंद्राच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करेल. रशिया, अमेरिका, चीनने चंद्रावर याने पाठविली आहेत. चौथे स्थान पटकविण्याकरिता भारत व इस्रायलमद्ये सध्या स्पर्धा सुरू आहे. ‘चांद्रयान-१’ हे २२ ऑक्टोबर २००८ ते २९ ऑगस्ट २००९ पर्यंत चांद्रकक्षेमध्ये होते. त्याचे प्रक्षेपित वाहन पीएसएलव्ही-सी ११ व वजन १३८० किग्रॅ होते. वाहनात ऑर्बिटर व प्रोब प्रक्रिया होत्या.

 

प्रस्तावित ‘चांद्रयान-२’ चे प्रक्षेपण ३ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०१९ दरम्यान करण्याचे ठरले आहे. त्याचे वाहन जीएसएलव्ही एमके-३ व साधने खालीलप्रमाणे -

 

ऑर्बिटरमध्ये परिसराचा ३ दिशांचा नकाशा मिळण्याकरिता २ कॅमेरे, तेथील असंख्य खनिजे टिपण्याकरिता एक्सरे मॉनिटर, तेथील वातावरण नोंदण्याकरिता मास स्पेक्ट्रोमीटर, रेडिओ लहरी टिपण्याकरिता अ‍ॅपर्चर रेडार, तेथील खोलामधील अवाढव्य स्वरूपातले बर्फमय पाणी नोंदण्याकरिता इमेजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर आणि उतरविण्याचे ठिकाण शोधण्याकरिता अतिशक्तीमान कॅमेरा इत्यादी साधने असणार. लँडरमध्ये चंद्रावरील भूकंपांची नोंद करण्याकरिता योग्य ते साधन, पृष्ठभागावरील उष्णता नोंदण्याकरिता काही चाचण्या घेण्याची साधने आणि चंद्रावरील रेडिओ अ‍ॅनॉटॉमी व प्लास्माची घनता तपासण्याकरिता योग्य ती साधने इत्यादी असणार. रोव्हरमध्ये दोन मुख्य साधने लेसर उद्युक्त स्पेक्ट्रोस्पोक व अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर व इतर साधने असणार. हे यान विशिष्ट आराखड्यांनी नोंदण्याकरिता एकूण १३ पे लोड बरोबर बाळगणार आहे. ‘चांद्रयान-१’ बरोबर फक्त ८ पे लोड होते. ‘चांद्रयान-२’ मध्ये अचूकता मिळण्याकरिता पाच हजार नॅनोमायक्रॉनपर्यंत तर ‘चांद्रयान-१’ मध्ये फक्त तीन हजार मायक्रॉनपर्यंत अचूकता दर्शविली जात होती. (मानवी डोळे सामान्यपणे ४०० ते ५०० नॅनोमीटरपर्यंत अचूकता ताडू शकतात. यावरून पाच हजार मायक्रॉनपर्यंतची अचूकता ही किती उच्च दर्जाची आहे, ते समजेल).

 

भारताची अवकाशातील मानवासहित गगन यात्रा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्ट २०१८च्या भाषणात जाहीर केले की, भारत २०२२ मध्ये मानवी अवकाश यात्रा करणार. त्या अवकाश यात्रींमध्ये वीर पुरुष वा स्त्री असेल. त्यामुळे जगातील रशिया, अमेरिका व चीन देशांनंतर, भारत अशी यात्रा करणारा चौथा देश ठरेल. पंतप्रधान म्हणाले की, ”२०२२ हे भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीचे ७५ वे वर्ष असल्याने हे अमृत महोत्सवी वर्ष अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.” ‘इस्रो’ने २०२२ मधील मानवी अवकाश यात्रेकरिता ‘व्योम’ म्हणून कार्यक्रम तयार केला आहे. त्या अवकाशात जाणार्‍या वीरांवर मायक्रोग्रॅव्हिटी व इतर शास्त्रीय प्रयोग एक आठवड्याकरिता केले जातील. वीरांकरिता वापरण्यात येणारे क्रू मॉड्यूल ३.४ मी. आकाराचा क्यूब असणार, बरोबर सर्व्हिस व ऑर्बिटल मॉड्यूल असणार व सर्वांचे वजन पृथ्वीच्या हिशोबाने ७ टन असेल. पृथ्वीपासून थोड्या उंचीच्या (३०० ते ४०० किमी) कक्षेत अवकाश मानवी वीर १६ मिनिटात पोहोचतील व ५ ते ७ दिवस तेथे राहतील. त्या आधी त्यांचे रिकामे व वेगळे झालेले क्रू मॉड्यूल गुजरात किनार्‍याजवळील अरेबियन समुद्रात पाडले जाईल. याकरिता रॉकेट वाहन जीएसएलव्ही एमके ३ असणार. याआधी ते वीर बाहेर कसे पडणार याबद्दल चाचण्या झाल्या आहेत. या मानवी अवकाश यात्रेला सुमारे रु. १० हजार कोटी खर्च येणार आहे. पुढील दोन वर्षांत मानवरहित उड्डाणाच्या दोन चाचण्या केल्या जाणार आहेत. पहिली चाचणी ३० महिन्यांच्या आत व दुसरी ३६ महिन्यांच्या आत असेल. मानवासह उड्डाण ४० महिन्यांच्या आत होईल.

 

अवकाशवीरांकरिता अवकाशयोग्य पेहराव (ीरिलर्शीीळीं) बनवून तयार आहे. अवकाशवीराची निवड आयएएफ व ‘इस्रो’कडून होईल व त्यांना दोन ते तीन वर्षे बंगळुरूला प्रशिक्षण दिले जाईल. १९८४ मध्ये अवकाशात जाऊन परत आलेले वीर राकेश शर्मा यांच्याकडून मार्गदर्शनसुद्धा घेतले जाईल. या अवकाश मोहिमेमुळे देशात १५ हजार नोकर्‍यांच्या संधी निर्माण होणार आहेत. २००७ मध्ये ‘इस्रो’ने ५५० किग्रॅ. वजनाचा उपग्रह कक्षेत पाठविला व तो १२ दिवसांनी परत आणला. हे परत मागे आणण्याचे तंत्रज्ञान उष्णतारोधकता व इतर अनेक गोष्टींची चाचण्या घेण्याकरिता करावे लागले. जीएसएलव्ही एमके-३ वाहन वेगात फरक पडणे, विश्वासार्हता, सुरक्षितता, अतिकंपनता सहन करणे इत्यादी संकटे सहन करण्याची क्षमता या रॉकेटमध्ये संरचित करायला हव्यात, असे ‘इस्रो’ने ठरविले. या अवकाश यात्रेकरिता, जे वीर ठरविले जाणार आहेत त्यांची गुणवत्ता अनेक प्रकारच्या चाचण्यांनी ठरविली जाणार आहे. त्या वीरांना वातावरण सहन करण्याची व कोठे संकट आले तर बरोबरच्या रोबोच्या साहाय्याने काय कृती कराव्या लागतात, त्यांचे प्रशिक्षण देणे क्रमप्राप्त आहे.

 

‘इस्रो’ची यशस्वी उड्डाणे

· ऑगस्ट १९८० - एसएलव्ही-३, उंची २२.७ मी, उचलण्याची ताकद १७ टन व पे लोडकरिता ताकद ४० किग्रॅ, कक्ष २००० किमी. उंचावरून.

· मार्च १९८७ - एएसएलव्ही, उंची २३.५ मी., उचलण्याची ताकद ३९ टन व पे लोडकरिता ताकद १५० किग्रॅ, कक्ष २००० किमी उंचावरून.

· ऑक्टोबर १९९४ - पीएसएलव्ही, उंची ४४ मी., उचलण्याची ताकद ३२० टन व पे लोडकरिता ताकद १८६० किग्रॅ, कक्ष ४७५ किमी. उंचावरून

· जून २०१७ - जीएसएलव्ही एमके २, उंची ४३.४३ मी., उचलण्याची ताकद ४१४ टन व पे लोडकरिता ताकद २२०० किग्रॅ, कक्ष ३५,७८६ किमी. उंचावरून

· नोव्हेंबर २०१८ - जीएसएलव्ही एमके ३, उचलण्याची ताकद ६४० टन व पे लोडकरिता ताकद ४००० किग्रॅ, कक्ष ३५,७८६ किमी. उंचावरून.

 

‘इस्रो’ची भरारी

 

‘इस्रो’ने ‘चांद्रयान-१’ व ‘मंगळयान’ मोहीम यशस्वी करून दाखविली. शिवाय संचारसंदेश क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. आता ‘चांद्रयान’ व मानवी अवकाश यात्रेकरिता अंतराळ कॅप्सूलमध्ये अथक प्रयत्न होत आहेत. ‘इस्रो’ने पुनर्वापर तंत्रज्ञानातही प्रगती केली आहे. अंतराळ स्थानकास भविष्यात मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. या क्षेत्रात अमेरिका, रशिया, कॅनडा, युरोपीय समुदाय व जपान भागीदार आहेत. चिनी संस्थेचे स्वतंत्र ‘चिनी अंतराळ स्थानक’ टप्प्याटप्प्याने २०२३ ते २०२५ पर्यंत बांधले जात आहे. या स्थानक क्षेत्रात भारताने अजून पाऊल ठेवलेले नाही. अंतराळ मानवी वीरांसह प्रवास करायचा म्हणजे अंतराळ स्थानक असणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

अंतरिक्ष कचर्‍याचे दुष्परिणाम

 

गेल्या ६० वर्षांत सर्व देशांनी अंतराळात एकूण सुमारे पाच हजार उड्डाणे केली. (म्हणजे सरासरी वर्षाला ८३ उड्डाणे केली). या उड्डाणामुळे अंतराळात सुमारे साडेसहा हजार टन अंतरिक्ष कचरा जमा झाला आहे. यापुढे ‘स्पेस एक्स’सारखी कंपनी प्रतिवर्षी ५० उड्डाणे करण्याचे मनसुबे आखत आहे व २०२५ पर्यंत त्यांचे २५ हजार उपग्रह असतील, असे जाहीर केले आहे. म्हणजे या अंतराळ उड्डाणस्पर्धेत अंतराळातील कचरा कैकपटीने वाढणार आहे. आज पृथ्वीभोवती छोटे-मोठे उपग्रह व यान आदींचे तुकडे पडत आहेत व असे हजारो तुकडे आसमंतात विखुरलेले आहेत. त्यातील बरेचसे तुकडे एक ते दहा मीटर आकाराचे आहेत. अंतराळ भ्रमंती करणार्‍या उपग्रहांना या तुकड्यांपासून थेट धोका संभवतो. उपग्रहांशी त्यांची टक्कर झाल्यास त्यांचा पूर्ण नाश होऊ शकतो, याची खबरदारी ‘इस्रो’ने घ्यावी.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@