‘रोगदमन’ आणि होमियोपॅथिक उपचार

    29-Oct-2018
Total Views |



आजच्या भागात आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि तो म्हणजे ‘रोगाचे दमन.’ म्हणजेच रोग बरा न करता जेव्हा आता दाबून टाकला जातो, त्यावेळी होमियोपॅथीची औषधे कशी उपयोगी पडतात ते आपण पाहूया. आता रोगाचे दमन किंवा आत दडपून टाकणे (suppression) म्हणजे काय ते आपण पाहूया...


आपण जेव्हा चैतन्यशक्तीची माहिती पाहिली, त्यात आपण असे पाहिले की, ही शक्ती संपूर्ण शरीर व मनाला सांभाळते व त्यांच्यात समतोल व समन्वय राखण्याचे काम करते. जेव्हा बाहेरील गतिमान शक्ती या चैतन्यशक्तीवर परिणाम करते, तेव्हा माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन मग त्याला आजार होतो. जेव्हा माणसाला आजार होतो, त्यावेळी ही चैतन्यशक्ती ठराविकपणे प्रतिक्रिया देते. चैतन्यशक्तीची ही प्रतिक्रिया शरीरावर उमटते, ती विविध लक्षणे व चिन्हे (symptoms & signs) यांच्या स्वरूपात. ही लक्षणे जेवढी चांगल्या प्रकारे दिसून येतील, तेवढेच डॉक्टरांना त्यावर उपचार करणे सोपे जाते. जेव्हा सर्व लक्षणे व्यवस्थित दिसू लागतात, तेव्हा आजाराचे व्यवस्थित निदानसुद्धा होते व त्यावरील औषध शोधणे सोपे घेऊन जाते. इथपर्यंत चैतन्यशक्ती (vital force) नैसर्गिकरित्या प्रतिक्रिया देत असते आणि जसे आपण बघितले की, प्रत्येक माणसाच्या शरीरात जी शक्ती असते, ती दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक माणसाची आजार व्यक्त करण्याची व लक्षणे दाखविण्याची पद्धतही वेगळी असते. उदा. दोन माणसांचे सांधे दुखत आहेत, तर एकाला बर्फाने शेकले की आराम मिळतो; तर दुसऱ्याला गरम पदार्थांनी शेकले की आराम मिळतो. म्हणजेच, प्रत्येकाची वैयक्तिक प्रतिक्रिया ही फार महत्त्वाची असते. परंतु, काही कारणे किंवा घटकांमुळे चैतन्यशक्तीची ही नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजेच आजाराची लक्षणे ही दाबली जातात, रोगाचे खरे स्वरूप आपल्याला दिसून येत नाही. यालाच ‘रोगदमन’ (Suppression) असे म्हणतात.

 

आता आपण असे काही बाह्यघटक पाहूया की, ज्याच्यापुढे चैतन्यशक्ती प्रभावित होते व आजाराची लक्षणे दाबली जाऊ शकतात. प्रथमतः आपण काही मानसिक लक्षणे पाहूया. जसे भीती वाटणे, घाबरणे याउलट अतिआनंद, अतिप्रमाणात लैंगिक संबंधांची हाव, एकतर्फी प्रेम, अतिदुःख, कुटुंबातील किंवा जवळच्या माणसाचा मृत्यू, उद्योगधंद्यात होणारे नुकसान किंवा व्यवसायातील काळजी इत्यादी. या आणि अशा प्रकारच्या बाह्यघटकांमुळे माणसाच्या मनावर परिणाम होत असतो व या परिणामांमुळे शरीराची नियमित कार्यपद्धतीही बिघडून जाते. त्यामुळे चैतन्यशक्तीचा नैसर्गिक कामात अडथळा येतो व लक्षणेसुद्धा दाबली जातात. अशावेळी होमियोपॅथीमध्ये या बाह्यघटकांचा शरीरावर व मनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो. या घटकांमुळे माणसाला नक्की काय त्रास होतो, याची पडताळणी करून औषध ठरवताना या गोष्टींचाही प्रामुख्याने विचार केला जातो. या घटकांबरोबरच काळजी, चिंता, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात येणारे अपयश व मग त्यातून तयार होणारी निराशा, अतिकामांमुळे येणारा शारीरिक व मानसिक थकवा किंवा तणाव यामुळे चैतन्यशक्तीचे नैसर्गिक कार्य बिघडते व माणसाची सहजता निघून जाते आणि लक्षणे दिसू लागतात. या मनाच्या भावना फक्त त्या वैयक्तिक स्तरांवरच कार्य करून दुष्परिणाम दिसू लागतात, असे नाही. काही तर पुढच्या पिढीतही दिसून येतात. मुख्यत्वे तर लहान बाळाला दूध पाजणारी आई. तिला या घटकांचे दुष्परिणाम भोगावे लागत असतील, तर हे दुष्परिणाम लहान बाळापर्यंतसुद्धा जाऊ शकतात. तसेच गरोदरपणात आलेल्या ताणतणावांचाही बाळावर थेट परिणाम होऊ शकतो. पुढील भागात आपण या ‘रोगदमना’विषयी आणखी कारणे व महत्त्वाची माहिती पाहणार आहोत.

 

-डॉ. मंदार पाटकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/