नाईल नदीच्या काठांवरील त्रस्त नागरिकांना सूर्य आणि चंद्र यांचे दर्शन रोज होत होते आणि नियमित दिसणारा हा प्रकाश देणारा सूर्य तारा त्यांना देव म्हणून स्वीकारावासा वाटला असावा. या प्रकाशमान सूर्याला ‘आमून-रे’ असे संबोधित केले गेले.
आज अस्तंगत झालेल्या प्राचीन इजिप्तमधील समाजाच्या तत्कालीन पंथ-संप्रदाय-धर्म या संकल्पनांचा आणि आपल्या अभ्यासाचा गाभा असलेल्या त्यातील प्रचलित चिह्न-चिह्नसंस्कृतीचा आता आपण विस्ताराने विचार करूया. नाईल नदीच्या दोन्ही काठांवरच्या सुपीक प्रदेशात, त्याकाळातील वसलेल्या इजिप्तमधील प्रत्येक गावात एक पंथ-संप्रदाय निर्माण झाला होता. बहुईश्वरवाद या संकल्पनेची निश्चित बांधणीही झालेली नव्हती अशा त्या काळात त्या समाजाला अनेक देव-देवता स्वीकृत होत्या. काही देवता स्थानिक होत्या, काही वैश्विक होत्या आणि काही वैयक्तिक होत्या. कुठलेही निश्चित धोरण नसल्याने पहिली देवता बाजूला सारून नव्या देवतांचा स्वीकारही सहज केला जात होता. या श्रद्धास्थानी असलेल्या देवतांच्या उपासनेला खूप मर्यादित मार्ग होते आणि देवतेकडून असलेल्या अपेक्षाही तशा मर्यादित होत्या. नाईल नदीचे वार्षिक महापूर, त्यामुळे होणारे अगणित नुकसान, रोगराई, माणसे-पशू आणि पक्ष्यांचा मृत्यू या आणि अशा निसर्गप्रलयामुळे त्रस्त झालेला समाज फार पिडीत-निराश-नाजूक मनःस्थितीत त्रस्त झालेला असावा. नदीला पूर येऊ नये, रोजचे निसर्ग चक्र आपल्याला हवे तसे व्हावे, जवळच्या माणसांचा-प्राणी-पक्ष्यांचा रोगराईमुळे विनाश होऊ नये, शेतीचे नुकसान होऊ नये अशा अगदी प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्या यासाठीच चिह्नस्वरूप देवतांची उपासना केली जात होती. प्रत्येक गावात अशा असंख्य देवता जरी निर्माण होत होत्या तरीही काही शतकांनंतर त्यातील काही देवतांची चिह्न व्यापक प्रदेशात आराध्य देवता म्हणून स्वीकृत झाली होती. कालांतराने ती सर्व चिह्नं आणि त्यातील देवतांच्या संकल्पना इजिप्तची राष्ट्रीय चिह्नं झाली. नाईल नदीच्या काठांवरील त्रस्त नागरिकांना सूर्य आणि चंद्र यांचे दर्शन रोज होत होते आणि नियमित दिसणारा हा प्रकाश देणारा सूर्य तारा त्यांना देव म्हणून स्वीकारावासा वाटला असावा. या प्रकाशमान सूर्याला ‘आमून-रे’ असे संबोधित केले गेले. हा शब्द एकाच वेळी दोन संकल्पना व्यक्त करतो. यातला ‘आमून’ हा शब्द देवतेची अदृश्य शक्ती असा अर्थ संदर्भ व्यक्त करतो. सूर्याचा निरंतर प्रकाश असा अर्थ, ‘रे’ या दुसऱ्या शब्दातून व्यक्त होतो. सूर्याची चिरंतन अव्यक्त शक्ती आणि त्याचा चिरंतन प्रकाश अशा दोन संकल्पना ‘आमून-रे’ या शब्दांत व्यक्त होतात. आता ही संकल्पना एकाच वेळी अनेक चिह्नांच्या रचनेतून व्यक्त झाली.
सूर्यदेवता या संकल्पनेतील स्पिंक्स ही पहिली चिह्नरचना. सिंहाच्या शरीरावर स्त्रीचे मुख अशी या चिह्नाची व्यक्त मांडणी आहे. खरं म्हणजे हे एक रहस्यमय चिह्न आहे. प्राण्यांना दैवी शक्ती प्राप्त असते असा विश्वास तत्कालीन समाजात रूढ होता. त्यामुळे गुणवत्ता-क्षमतेचे चिह्न-प्रतीके म्हणून अनेक प्राणी आणि पक्षी यांचा वापर उपासना पद्धतींमध्ये केला गेलेला दिसतो. प्राचीन इजिप्तसह युरोपातील अनेक देशात याची उत्तम शिल्प निर्माण झाली. इजिप्शियन समाजासाठी स्पिंक्स हे शक्ती आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक मानलं गेलं. हेच स्पिंक्सचे चिह्न आज इजिप्तची आंतरराष्ट्रीय ओळख बनली आहे. या चिह्नांतील व्यक्त होणारे भाव, आपले अंतःस्थ हेतू आणि त्यामागचा विचार कोणालाही कळू न देणारी व्यक्ती अशा स्वरूपाचे आहेत, असे मत काही पाश्चात्य संशोधकांनी त्यांच्या प्राचीन इजिप्तसंदर्भातील लिखाणात व्यक्त केले आहेत. हे स्पिंक्सचे चिह्न अनेक पिरॅमीडशी जोडले गेलेले आहे. पिरॅमीडसारखेच या स्पिंक्सचे चिह्न कायम गूढ राहिले आहे. रोज नियमित उगवणारा सूर्य, त्याचा प्रकाश आणि ऊर्जा, त्याची उष्णता या सर्वांचा मानवाला होणारा फायदा, त्याच्यामुळे चालणारे नियमित निसर्गचक्र हे जरी अनुभवाला येत होते तरीही त्याच्याशी प्रत्यक्ष बोलता येत नव्हते, त्याच्यापर्यंत पोहोचता येत नव्हते. मग यालाच ‘आराध्य दैवत’ म्हणून स्वीकारले गेले. प्राणी-पक्षी यांच्याऐवजी चिह्न-प्रतीके म्हणून असे आकाशीय तारे-ग्रह यांचा वापर त्या नंतरच्या काळात सुरू झाला. याच काळात एकेका घराण्याची सत्ता इजिप्तच्या वेगवेगळ्या प्रदेशात सुरू झाली होती आणि राज्यकर्ता सूर्यदेवाचे प्रतीक मानला गेला होता. मानवी शरीरावर गरुडाचे तोंड आणि त्याच्या डोक्यावर तळपणारा सूर्य असे सूर्यदेवाचे दुसरे चिह्न-प्रतीके त्याकाळात वापरले गेले. हे चिह्न, सूर्योदयापासूनसूर्यास्तापर्यंतच्या समोर दिसणाऱ्या सूर्यासाठी होते. मेंढ्याचे तोंड असलेले मानवी शरीर हे चिह्न सूर्यास्तानंतर न दिसणाऱ्या सूर्यदेवाचे प्रतीक म्हणून वापरले गेले. अशा चिह्नांच्या रचनांसाठी, प्राणी-पक्षी यांना दैवी शक्ती-क्षमता असते अशी निश्चित धारणा या मागे होती. सूर्यदेवतेच्या ३० वेगवेगळ्या चिह्न-प्रतीकांचा प्रसार तत्कालीन इजिप्तमधील अनेक प्रदेशांत झाला होता. आत्मिक-आध्यात्मिक अनुभव फक्त शब्दांच्या माध्यमातून मांडता येणार नाहीत, याची निश्चित जाणीव तत्कालीन समाजातील विद्वानांना नक्कीच होती. प्राणी-पक्ष्यांची तोंडे असलेल्या मानवी प्रतिमा दृष्टांत आणि रूपके वापरून थोड्या नाट्यमय पद्धतीने असे गूढ अनुभव समविचारी उपसाकांपर्यंत पोहोचवले गेले. अशा नाट्यमय चिह्नांच्या रचना खूप जाणीवपूर्वक केल्या गेल्या होत्या. वरकरणी अर्धा पक्षी-अर्धा मानव किंवा अर्धा प्राणी, अर्धा मानव अशी चिह्नात्मक-प्रतीकात्मक रचना, बघणाऱ्याला खोटी आणि अविश्वसनीय वाटत असे. वरकरणी कल्पित वाटणारे चिह्न प्रत्यक्षात खूप गहन संकल्पना प्रसारित करत असे. ज्यांना समजायला हवे त्यांना त्यातील संकल्पना उमजत असे मात्र, ज्यांना जाणीव नाही अशा दर्शकांना ते निव्वळ एक कपोलकल्पित चित्र वाटत असे. आपल्या पंथात किंवा संप्रदायात कोणाला प्रवेश द्यायचा, त्याचे निश्चित गणित अशा नाट्यमय प्रतीकांतून रचले गेले होते.
इजिप्तच्या आता अस्तंगत संस्कृतीमध्ये आणि आजही प्रचलित प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये, विशेष करून या दोन्हीमधील चिह्नसंस्कृतीमध्ये एक निश्चित महत्त्वाचा फरक आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत स्त्री देवता-पुरुष देव या संकल्पनांची व्यक्त कलेत रचना करताना त्यांना मानवी शरीरमुद्रांमध्येच निर्माण केले गेले. देव-देवतांच्या प्रतिमांमध्ये सान्निध्य असलेल्या प्राणी-पक्ष्यांचा संदर्भ, अलिखित संकल्पना आणि मूल्यवृद्धीच्या मांडणीसाठी केला गेला. प्राचीन इजिप्तच्या अशा चिह्नसंस्कृतीमध्ये मानवी शरीरावर प्राणी आणि पक्ष्यांची तोंडे लावून त्या संकल्पना व्यक्त रचनेत निर्माण झाल्या. या दोन चिह्नसंस्कृतीमधील दुसरा फरक असा की, खंडप्राय भारतीय भूमीतील दूरदूरच्या प्रदेशात शिल्प-मूर्ती-चित्र यांच्या रचनेत एकसंधता असल्याचे आपल्या लक्षात येते. अशी शिल्पे काही सहस्त्र वर्षांपासून वेगवेगळ्या काळात निर्माण झालेली असूनही, शैलींमध्ये फरक झाले तरी मूळ संकल्पना व्यक्त करताना कुठलाही बदल केला गेला गेला नाही. इजिप्तच्या चिह्नसंस्कृतीमध्ये, एकच संकल्पना रचनेसाठी अनेक चिह्नात्मक-प्रतीकात्मक रचना निर्माण झाल्या. चिह्नसंस्कृती आणि त्यातून निर्माण होणारे संकेत हा फार रंजक प्रवास आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/