जागरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jan-2018   
Total Views |
 

 
 
शुक्रवारी संध्याकाळी शरू शाळेतून आली, की आमचा ठरलेला संवाद. “शरू, शनिवार – रविवारसाठी काही प्रकल्प, काही गृहपाठ, Worksheet काही दिलाय का गं?”
“कल्क!”, शरू प्रश्न उडवून लावते.


“नक्की? नीट आठवून सांग!”, मी.


“काही नाही!”, असे म्हणून शरू खेळायला पळते.
शुक्रवार संपतो. अख्खी शनिवारची दुपार उडाणटप्पूपणा करण्यात जाते. शनिवारी संध्याकाळी, शरूच्या आग्रहाखातर आम्ही डिस्नेचा लहान मुलांचा पिक्चर पाहतो. हा पिक्चर मी आणि नरेन सातवेळा पाहून कंटाळलो असतो. तरी परत पाहतो. शरुची रविवारची सकाळ लोळण्यात जाते. दुपारी मस्त पत्ते खेळून होतात. नंतर मैत्रिणीकडे वाढदिवसाला जाऊन येते. खेळणं होतं. संध्याकाळ संपते. अंधार पडायला लागतो. शरू दमून भागून घरी येते. हातपाय धुवून देवाला नमस्कार केला की मग पुढचा संवाद –
“आई, उद्या ना शाळेत ‘My Hobby’ असा तक्ता करून द्यायचा आहे!”
“अग! पण हे आत्ता सांगतात का? शुक्रवार पासून विचारात आहे ना मी!?”
“पण मला आत्ता आठवलं ना!”, शरुचे निरागस उत्तर.
मग पळापळ सुरु! दुकाने बंद होण्याच्या आत नरेन चार्ट पेपर आणतो. कुठले कुठले स्टीकर आणतो. तोपर्यंत मी आणि शरू नेटवर शोधाशोध करून माहिती मिळवतो. इथे नुसत ‘मला गाणं आवडतं’ असं म्हणून चालत नाही. गाण्याचं गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान इत्यादी आधुनिक देवतांनी तक्त्यामध्ये अवतार घेतला नाही, तर त्या तक्त्याला दुसरा जन्म जन्म घ्यावा लागतो! आता रात्री जागल्याशिवाय पर्याय नसतो. आम्हा दोघींना मिळून कापाकापी, चिटकवा चिटकवी, खाडाखोड, रंगरंगोटी आणि राग राग करून तो तक्ता संपवायचा असतो. या नाटकाचा अजून एकच अंक झाला असतो, तोपर्यंत शरू पेंगायला लागते. इतका वेळ राग राग केल्यामुळे असेल कदाचित, पण शेवटी एकदाचे माझ्यातले आईचे हृदय द्रवते. तिला झोपायला सांगून मीच एकटी प्रकल्प – प्रकल्प खेळत बसते. रात्री उशिरा तो तक्ता पूर्ण होतो! Chart रोल करून बांधून पिशवीत ठेवते. ती पिशवी शाळेच्या दप्तर जवळ ठेवते. कात्री, सुरी, टाचण्या असला अणुकुचीदार आणि टेप, फेविकॉल, डिंक असला चिकट पसारा आवरून मगच झोपायला जाते.
आईने रविवारी रात्री जागरण मांडून प्रकल्प केले नाहीत, तर सोमवार उजाडूच शकत नाही, हा सृष्टीचा नियम आहे! ते जागरण नीट व्हावे यासाठी त्या सृष्टीच्या नियंत्याने ठिकठिकाणी शाळा स्थापन केल्या असून घराघरात आपले निरागस आणि गोंडस हेर नियुक्त केले आहेत. असले विचार करत करत मला झोप लागते.
प्रकल्पांचा अजून एक अत्यंत तापदायक प्रकार म्हणजे ‘Best out of waste’ नामक प्रकल्प. आता घरात काय कोणी ‘कचरा’ ठेवतात का? का असले प्रकल्प देतात?! बरे काही बाही जमवूनही ठेवलं, तरी हवं तेंव्हा हवा तो ‘कचरा’ मिळलेच असे नाही. मग ‘घरातच पडून होता’, असे वाटावं असलं सामान पैसे देऊन विकत आणावे लागते. कधी जाऊन खपटे विकत आण. तर कधी नारळ आणून खावणून मग त्या करवंट्या सुताराकडून छान कापून आण. तर कधी मुद्दाम प्रोजेक्टसाठी २ लिटरची मोठी कोकची बाटली आणून संपव, असले उद्योग करावे लागतात!
अशाच एका ‘कचऱ्यातून कला’ च्या प्रकल्पासाठी, खारवलेले पिस्ते आणले. सोलता सोलता तोडांत टाकण्यातून वाचलेले, पिस्ते एका बरणीत भरून ठेवले. इकडे पिस्त्याच्या कवचांचा ढीग पडला. मग त्या ‘कचऱ्याच्या’ ढिगाऱ्या पासून pen-stand, greeting card व तत्सम ‘best’ वस्तू तयार करण्यात आल्या.
या प्रयोगानंतर ice-cream च्या काड्यांनी एक घर तयार करून आणायाला सांगितले होते. शरुला आता खूप ice-cream खायला मिळतील असे वाटत होते बहुतेक. उड्या मारताच घरी आली, आणि चक्क ज्या दिवशी प्रकल्प दिले त्याच दिवशी घरी बातमी दिली! मी ice-cream च्या काड्यांचे पाकीट विकत आणल्याने तिच्या आनंदाला विरजण लागले! ते पाकीट पाहून, शरूचा त्या project मधला सगळा interest च संपला. शेवटी तिची वाट पाहून पाहून एका रविवारी रात्री जागून मीच ते घर, बाग, कुंपण वगैरे तयार करून दिले. तरी शरूचा रुसवा जाईना! मग दोन – चार वेळा जाऊन आम्ही ice-cream खाऊन आलो, तेंव्हा कुठे तिची गाडी रुळावर आली. या प्रकल्पाने फक्त आईचे वजन तेवढे वाढले!
विज्ञानाचे मॉडेल्स करणे वगैरे प्रकल्प बरे असतात. काहीतरी शिकल्याचे, केल्याचे समाधान तरी मिळते. पण नुसतंच माहिती मिळावा, फोटो जमवा, सुशोभित करा असले प्रकल्प, आई – वडिलांना लहानपणी अभ्यास न केल्याचे पाप फेडण्यासाठी दिले जाणारे प्रायश्चित आहे असे मला वाटते.
अशा प्रकल्पांमधून प्रवास करत करत आमची बढती “ग्रुप प्रोजेक्टस्” मध्ये झाली. ४-५ मैत्रिणी मिळून प्रोजेक्ट करू लागल्या. या मध्ये आई-वडिलांची फारशी मदत लागली नाही. नवीन शाळेने पण भन्नाट प्रकल्प दिले. ४ – ५ वाण्याच्या दुकानात जाऊन वेगवेगळ्या डाळी आणि तांदळाचे भाव काय आहेत याची चौकशी करून त्याचा तक्ता बनवा! आणि एका सकाळी २-२ मुलींचे गट करून त्यांना काही रक्कम दिली. दिवसभर काहीपण business करा आणि संध्याकाळी हिशोब द्या. कोणी फुलं आणून गजरे करून विकले. कोणी लिंबू आणून लिंबू सरबत करून विकले. कोणी होलसेल मध्ये पेन आणून विकले. हा प्रकल्प पालकांना भारी आवडला!
९ वी – १० वी मध्ये या जागरणात प्रकल्पा बरोबरच जर्नल, सबमिशन, असाइंमेंट या खेळांची भर पडली आहे. हे नवीन खेळ गाणी ऐकत, जागून पूर्ण करायचे असतात हे ज्ञान प्राप्त झाले. प्रकल्प तर फारच फोरवर्ड झाले आहेत. आता जर पालकांनी “काही मदत हवी का ग?” असे विचारले तर, “तुम्हाला यातलं काही जमणार आहे का?” अशा आशयाचा एक कटाक्ष पदरात पडतो! सध्या ४ – ५ जणी मिळून project report करत आहेत. प्रत्येकीकडे एक एक laptop. एकच document share करून एकत्र लिहिणे. असलं काही बाही चालू आहे. पण शेवटी एकीच्या घरी जमून, रात्रभर जगल्याशिवाय तो report संपतच नाही. जिच्या घरी जागरण असते, तिची आई रात्रीतून कॉफी करून दे, चहा करून दे, मुली जाग्या आहेत की नाही बघ, आणि अधून मधून “झोपा ग आता!” असं म्हणत स्वत:ही जागते! ते compulsory च असते! कारण प्रकल्पासाठी आईने रविवारी रात्री जागरण केले नाही तर सोमवार उजाडत नाही म्हणजे नाहीच!
 
- दिपाली पाटवदकर 
@@AUTHORINFO_V1@@