शंभर वर्षांपूर्वी दादासाहेब फाळके यांनी खूप मोठी स्वप्नं पाहिली आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत ती प्रत्यक्षातही उतरवली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन चित्रनिर्मितीची पताका अनेकांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यातूनच अशा मंडळींनी मूकपट, बोलपट, रंगीत चित्रपट अशी अनेक स्थित्यंतरं घडवत नेली. या सगळ्या प्रवासात – विशेषतः चित्रपटसृष्टीची पहिली अडखळती पावलं पडत होती त्या काळात – अनेक मराठी माणसांचं योगदान अमूल्य होतं. चित्रपटाचा कलाविभाग समृद्ध करणारे कलामहर्षी बाबुराव पेंटर, ‘प्रभात’च्या संस्थापकांपैकी एक दामले, निर्माता आणि अभिनेता म्हणून अमीट छाप पाडणारे बाबुराव पेंढारकर, अनेकविध प्रयोग करणारे, कला, तंत्र आणि व्यवसाय यांचं अचूक भान असणारे व्ही. शांताराम यांचं फक्त मराठीतच नाही तर संपूर्ण चित्रसृष्टीतच मानाचं स्थान आहे. सुरुवातीला आउटडोअर शूटिंगच्या सोयी फारशा उपलब्ध नव्हत्या त्या काळात यांचं (आणि सर्वच चित्रकर्त्यांचं) कार्यक्षेत्र असायचं ते म्हणजे तंत्रसज्ज स्टुडिओ. एका मर्यादित जागेत हे सगळे आधुनिक विश्वामित्र नवी सृष्टी उभी करायचे आणि ते पडद्यावर पाहताना प्रेक्षकांना भुरळ पडायची.
एकेका स्टुडिओने अक्षरशः एकेक पर्व पाहिले. वीज नसतानाच्या काळात आरश्यांच्या सहाय्याने सूर्यप्रकाश स्टुडिओत परावर्तित करून चित्रीकरण करणे, रात्रीचं शुटिंग स्टुडिओच्या कोपऱ्यात भुईनळे लावून त्याच्या प्रकाशात करणे अशा युक्त्यांमधून तांत्रिक मर्यादांवर मात करणारे चित्रकर्ते आणि तंत्रज्ञ यांच्यामुळे हे स्टुडिओ म्हणजे कलेची प्रयोगशाळा बनली होती. असे अनोखे प्रयोग त्या स्टुडिओंनी डोळे भरून पाहिलेत, शेकडो चित्रपटांच्या निर्मितीच्या वेणा, यशस्वी कलाकारांचे जयघोष, अपयशी व्यक्तींचे सुस्कारे हे त्यांच्या भिंतींनी ऐकले.. किती आठवणी असतील त्यांच्याकडे सांगण्यासारख्या! यातला एखादा स्टुडिओ जिवंत होऊन आठवणी सांगू लागला तर? अशीच कल्पना करून प्रभाकर पेंढारकर यांनी कोल्हापूरच्या अत्यंत महत्वाच्या स्टुडिओच्या आत्मवृत्ताच्या माध्यमातून काळाच्या पडद्याआड जात असणाऱ्या अनेक क्षणांना शब्दबद्ध करून अमर केले आहे.
कोल्हापूर : चित्रसृष्टीचं केंद्रस्थान
हा स्टुडिओ फक्त त्या ठिकाणचाच नाही तर एकूणच कोल्हापूर नगरीत होणाऱ्या चित्रनिर्मितीचा इतिहास सांगतो आहे अशी या पुस्तकामागची संकल्पना आहे. त्याच्या निवेदनातून लक्षात येतं की चित्रनिर्मितीच्या दृष्टीने मुंबईचे सध्या जे स्थान आहे ते एकेकाळी कोल्हापूरचे होते. चित्रनिर्मितीसाठी स्टुडिओज, बाह्यचित्रिकरणासाठी अनेक निसर्गसुंदर ठिकाणं, ऐतिहासिक चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी पन्हाळा आणि कोल्हापूरचा राजवाडा अशा ऐतिहासिक जागा, मंदिरं, तलाव, नदी उपलब्ध असल्याने कोल्हापूरचे मोठे महत्व होते. ‘प्रभात’ आणि ‘शालिनी’ हे कोल्हापुरातले महत्वाचे स्टुडिओ. पुढे प्रभात पुण्याला स्थलांतरित झाला. खुद्द कोल्हापूरचे संस्थानिक राजाराम महाराज यांच्या पाठिंब्याने १९३२ साली ‘कोल्हापूर सिनेटोन’ची स्थापना झाली होती. या कोल्हापूर सिनेटोनचा स्टुडिओ हाच प्रस्तुत पुस्तकाचा निवेदक आहे. पुण्यात सरस्वती सिनेटोनमध्ये काम करत असणारा आणि देशातील पहिला रौप्यमहोत्सवी चित्रपट ‘श्यामसुंदर’ दिग्दर्शित केलेल्या भालजी पेंढारकर याला कोल्हापूर सिनेटोनच्या उभारणीसाठी कोल्हापूर संस्थानातून आमंत्रित करण्यात आलं. तेव्हापासून भालजी आणि हा स्टुडिओ यांचं जन्माचं नातं जुळलं. अतिशय लक्षपूर्वक उभ्या केल्या गेलेल्या या स्टुडिओत पुढे अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती भालजींनी केली. मध्येच काही काळ भालजी स्टुडिओ सोडून पुण्याला निघून गेले तेव्हाही इथली चित्रनिर्मिती थांबली नाही कारण बाबुराव पेंढारकर यांच्या हंस पिक्चर्स या मूळच्या पुण्यातल्या संस्थेच्या अनेक चित्रपटांची निर्मिती कोल्हापूर सिनेटोनच्या वास्तूतच पार पडली. निर्माते-अभिनेते बाबुराव पेंढारकर, पटकथांना साहित्यिक मूल्यं प्राप्त करून देणारे श्रेष्ठ लेखक आचार्य अत्रे आणि वि. स. खांडेकर आणि अतिशय प्रतिभावंत दिग्दर्शक मा. विनायक अशा दिग्गजांनी प्रेमवीर, ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली, देवता, सुखाचा शोध असे चित्रपट हंस पिक्चर्सनी निर्माण केले ते इथेच. पुढे मा. विनायक आणि बाबुराव पेंढारकर यांच्यात मतभेद होऊन त्यांच्याकडून होणारी चित्रनिर्मिती थांबली आणि हा स्टुडिओ पुन्हा एकदा एका सक्षम चित्रकर्त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसला.
भालजींच्या हाती सूत्रं
या स्टुडिओच्या उभारणीपासूनच भालजींचा त्यात जीव गुंतला होता. पुण्याहून १९४१ साली कोल्हापूरला परतल्यानंतर त्यांनी स्टुडिओ विकत घेतल्यावर स्टुडिओने आपलं सर्वस्व त्यांच्या हाती सोपवलं. नव्या बारशाने त्याला ‘जयप्रभा स्टुडिओ’ अशी एक नवी ओळख मिळाली. भालजींच्या आयुष्यातल्या यापुढच्या अखंड कार्यरततेचा त्याने निकट अनुभव घेतला. देशप्रेमाने भारलेल्या भालजींना शिवकालातल्या प्रेरक घटनांवर आधारित चित्रपटांच्या माध्यमातून मुघलांविरुद्ध शिवरायांचा लढा हे इंग्रजांविरुध्दच्या भारतीयांच्या लढ्याचे प्रतीक म्हणून सर्वसामान्य जनतेच्या मनात ठसवताना पाहिलं. त्या ऐतिहासिक चित्रपटांच्या संवादांतून होणारा स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा उद्घोष ऐकून पुनःपुन्हा रोमांचित होणं अनुभवलं. देशाच्या स्वातंत्र्याच्या आनंदावर गांधीहत्येचं सावट येताना आणि त्यानंतरच्या ब्राह्मणविरोधी दंगलीत अक्षरश: आपलं गात्रन् गात्र भस्मसात होणं अनुभवलं.... त्या राखेतून पुन्हा उभे राहणारे भालजी पाहिले. विद्वेषाच्या वणव्यात बेचिराख झालेल्या जमिनीतून ‘मीठभाकर’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘तांबडी माती’, ‘साधी माणसं’ अशा रूपाने मराठी चित्रसृष्टीची नवपालवीच फुटताना पाहिली.... स्टुडिओ समृद्ध होतच राहिला.
हृद्य चित्रण
पुस्तकाचे लेखक हे भालजी पेंढारकर यांचे सुपुत्र. त्यांनी जयप्रभा स्टुडिओत घडलेल्या अनेक गोष्टी जवळून पाहिलेल्या आणि ऐकलेल्या आहेत. साहजिकच पुस्तकात भालजींचे चित्रण प्रामुख्याने येणं अगदी स्वाभाविक आहे. परंतु असं असूनही पुस्तक भालजींपुरते मर्यादित नाही ही गोष्ट उल्लेखनीय आहे. स्टुडिओच्या उभारणीत वाटा असणाऱ्या व्यक्ती तसे स्टुडिओमध्ये कार्यरत असणाऱ्या पडद्यामागच्या तंत्रज्ञांबद्दल पुस्तकात अतिशय जिव्हाळ्याने लिहिले आहे. जयप्रभा हे एक मोठे कुटुंब असल्याची भावनाच त्यातून प्रतीत होते.
निवेदक एक स्टुडिओ असला तरी स्टुडिओची वास्तू हे सर्व सांगते आहे अशी कल्पना न करता स्टुडिओचा आत्मा हे कथन करतो आहे अशा रीतीने मांडणी करण्यात आली आहे. साहजिकच सर्व कथनाला भावनेचं अस्तर लाभलं आहे. दंगलीचे वर्णन विषण्ण करणारे तर त्यानंतरचे चित्रसृष्टीतील अस्थिरतेबद्दल भाष्य करणारं प्रकरण चिंतनात्मक झालं आहे. शिवाय या आत्मीय कथनामुळे स्टुडिओच्या वास्तूबाहेरच्याही काही गोष्टी सांगण्याची लवचिकता साध्य झाली आहे.
स्वा. सावरकरांची स्टुडिओला भेट
स्टुडिओला कामानिमित्त अथवा अन्य कारणाने भेट देणाऱ्या मान्यवर व्यक्तींच्या भेटींचे चित्रण हादेखील पुस्तकाचा संस्मरणीय भाग म्हणायला हवा. व्ही शांताराम, राजा परांजपे, एवढंच नाही तर साक्षात दादासाहेब फाळकेंच्या भेटींचे प्रसंग अगदी त्या त्या व्यक्तिमत्वांची विचारशैली, त्यांच्या विचारांचे वेगळेपण ठसवून जातात. भालजींचे परमदैवत असणाऱ्या स्वा. सावरकरांची स्टुडिओला भेट हा या पुस्तकातला सर्वात अनोखा प्रसंग. कारण त्या दिवशी सावरकरांनी फक्त स्टुडिओला भेट दिली नाही, तर मराठी भाषेलाच अनोखी भेट दिली... नव्या शब्दांची! स्टुडिओभेटीदरम्यान विविध विभागांवर असणाऱ्या इंग्रजी पाट्या सावरकरांना खटकल्या होत्या. “ही कला पाश्चात्य असली तरी ती कला आता इथे आली आहे आणि तुमची चित्रनिर्मितीही याच भाषांमध्ये करता. मग पाट्या आपल्याच भाषेत का नसाव्यात ?” असा सवाल त्यांनी केला. त्यावर मा. विनायकांनी ‘मराठीत योग्य शब्द कसे शोधणार’ अशा अर्थाची अडचण उपस्थित केल्यावर सावरकर एकेक शब्द सांगू लागले -
स्टुडिओ/सिनेटोन – कलामंदिर
शूटिंग – चित्रण
डायरेक्टर – दिग्दर्शक
रेकॉर्डिंग – ध्वनिमुद्रण
फोटोग्राफी – छायाचित्रण
एडिटिंग – संकलन
मेकअप – रंगपट
लॅबोरेटरी – रसायनशाळा
हे सर्व शब्द सांगताना त्यांना थोडेही थांबावे लागले नाही. पाट्या पाहतानाच त्यांच्या डोक्यात हे शब्द तयार झाले असावेत ते त्यांनी झरझर सांगितले. या देशाच्या मातीवर अपार भक्ती असणारा हा महापुरुष इथल्या भाषेवर फक्त प्रेम करून थांबला नाही तर तिलाच शब्दांची देणगी देऊन समृद्ध करत होता हे वाचून भारावून जायला होतं.
भालजी : मूल्यं जगणारा माणूस
चित्रपटांमधून मूल्यं आणि संस्कार दिले पाहिजेत यावर ठाम विश्वास असणारा, स्टुडिओची राखरांगोळी होऊनही पुन्हा उभा राहणारा, कुणापुढेही हात न पसरणारा हा व्रतस्थ माणूस म्हणजे भालजी. पृथ्वीराज कपूर महारथी कर्ण चित्रपटात जयप्रभामध्ये येऊन भालजींच्या दिग्दर्शनाखाली काम करून गेले होते तेव्हा त्यांच्यासोबत आलेला राज कपूर भालजींची ओळख विसरला नाही. नुकसानीच्या काळात तो कोल्हापूरला आला तेव्हा त्याने भालजींना मदत करण्याची इच्छा दाखवली तेव्हाही या ताठ कण्याच्या माणसाने ती स्वीकारली नाही. देव, देश आणि धर्म यांच्यावर त्यांची अविचल निष्ठा होती आणि ती निभावण्यासाठीचा खंबीरपणाही होता. गांधीहत्येच्या आरोपावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातलेली असतानाच्या काळात सरसंघचालक गोळवलकर गुरुजींचा प्रवास कोल्हापुरात होता त्यावेळी पत्रकार परिषद आयोजित होणार होती परंतु काही जणांच्या मनात मोठा रोष असल्याने गुरुजींच्या जीवाला धोका होता. अशावेळी आधीच पोळले गेले असूनही भालजींनी मोठा धोका पत्करून जयप्रभा स्टुडिओच्या आतमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली आणि त्यानंतर गुरुजींना सुरक्षितपणे स्टेशनवर पोचवण्याची व्यवस्था करूनच मोकळा श्वास घेतला.
पुस्तकाचं देखणं रूप
पुस्तकाच्या सजावटीचा विशेष उल्लेख करायला हवा. मुखपृष्ठावर शीर्षकाची अक्षरे सोनेरी चमकीमध्ये उमटवून चित्रसृष्टीच्या इतिहासाची एका अर्थाने सुवर्णाक्षरातच नोंद केली आहे. शिवाय पानोपानी असणाऱ्या संजय शेलार यांच्या अप्रतिम रेखाचित्रांनी पुस्तकाला सुंदर साज चढवला आहे आहेत. एका गौरवशाली इतिहासाचे तपशीलवार दस्तावेजीकरण आणि त्याचे देखणे सादरीकरण यामुळे हे पुस्तक वाचणे हा एक संस्मरणीय अनुभव ठरतो.
पुस्तक : एका स्टुडिओचे आत्मवृत्त
लेखक : प्रभाकर पेंढारकर
प्रकाशक : राजेंद्र प्रकाशन
पृष्ठसंख्या : २००
किंमत : ३६०
आवृत्ती : तिसरी (२६ जानेवारी २०१३)