यवतमाळ. महाराष्ट्रातील एक असा दुर्दैवी जिल्हा जिथे सर्वात जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या १० वर्षांत येथे नऊ हजारांहून अधिक शेतकर्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. अशा जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगा प्रचंड अभ्यास करून इंजिनिअर बनतो. अमेरिकेत स्थिरस्थावर होण्याची संधी असताना ती नाकारून आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी म्हणून व्यवसायास सुरुवात करतो. अगदी शून्यातून सुरुवात करून तो अवघ्या काही वर्षांत ३०० कोटी रुपयांचं औद्योगिक साम्राज्य उभारतो. निव्वळ महाराष्ट्र वा भारत नव्हे, तर अगदी सातासमुद्रापार अमेरिका, कॅनडा, सिंगापूर येथे आपल्या कंपनीच्या शाखा सुरू करतो. हे जिगरबाज उद्योजक आहेत मुकुंद मुळे आणि त्यांच्या कंपनीचं नाव आहे, कॉटमॅक इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड.
मुकुंदचे बाबा शंकरराव मुळे हे यवतमाळ येथील तहसील कार्यालयात महसूल विभागात कार्यरत होते, तर आई जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. अगदी सर्वसाधारण असं हे मध्यमवर्गीय कुटुंब. मुळे दाम्पत्यास सहा मुलं होती. ३ मुलगे आणि ३ मुली. या सहाजणांमध्ये मुकुंद सगळ्यात लहान. लहान असल्यामुळे घरातला लाडका. विवेकानंद विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुकुंदने यवतमाळ पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला. पुढे अभियांत्रिकी शिक्षणासाठी तो पुण्यात आला. हीच पुण्यभूमी पुढे मुकुंदची कर्मभूमी ठरली. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स शाखेतून मुकुंदने अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. इंजिनिअरिंग करत असतानाच टाटा मोटर्स म्हणजे तेव्हाची टेल्कोमध्ये नोकरी करायची हे मुकुंदचं स्वप्नं होतं. मात्र नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळं होतं. मुकुंदसाठी वेगळं नेपथ्य नियती तयार करत होती बहुधा.
टेल्कोमधून काही तांत्रिक कारणास्तव मुकुंदला नकार मिळाला. उराशी बाळगलेलं स्वप्न अचानक भंग पावलं होतं. मात्र, निराश होईल तो मुकुंद कसला? काही दिवसांतच त्याला ’फिलिप्स इंडिया’मध्ये नोकरी मिळाली. सगळं नीट चाललेलं. मात्र, समाजासाठी, या देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती आणि शेवटी १९८८ साली ‘क्षितिज इलेक्ट्रो सिस्टिमप्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी त्याने सुरू केली. स्टेट बँकेकडून १५ हजार रुपये आणि स्कॉलरशिप व इतर माध्यमातून १० हजार रुपये असे एकूण २५ हजार रुपये भांडवल उभारून मुकुंदने अवघ्या बाविशीत कंपनी सुरू केली. तसं तर अनेक लोकांनी त्याला उद्योगात न पडण्याचे सल्ले दिले होते, पण काहीजणांनी त्याला प्रोत्साहनदेखील केलं होतं. घरात सर्वात लाडका असल्याने घरच्यांचा पूर्ण पाठिंबा मुकुंदलाच होता. कदाचित प्रोत्साहित करणार्यांच्या शुभेच्छांमध्ये आणि घरच्यांच्या पाठिंब्यामध्ये जास्त ताकद असावी म्हणून मुकुंदचा उद्योगाच्या क्षितिजावर उदय झाला. हळूहळू अजून एक युपीएस इन्व्हर्टर तयार करणारी कंपनी मुकुंदने सुरु केली. प्रामाणिकपणा आणि मेहनत या दोहोंच्या बळावर मुकुंद उद्योगामध्ये एकेक टप्पे पार करत होता. असाच आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा त्याची वाट पाहत होता. इन्व्हर्टर वितरण करणारा एक वितरक मुकुंदला भेटला. त्याने भागीदारीत कंपनी सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचदरम्यान मुकुंदचा एक वर्गमित्र देखील मुकुंदच्या व्यवसायात भागीदार होऊ इच्छित होत होता. मुकुंदने आपल्या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करून एकाच कंपनीची निर्मिती केली. नाव होतं ‘कॉटमॅक इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड.’ या तिघांनी उभारलेलं पाच लाखांचं भांडवल आणि २० कामगार यांच्या बळावर ‘कॉटमॅक’चा प्रवास सुरू झाला. आज २५ वर्षांनंतरदेखील त्याच कामगारांसोबत आणखी ६०० कामगार ‘कॉटमॅक’मध्ये कार्यरत आहेत. सोबतच कंपनीची उलाढाल अंदाजे ३०० कोटी रुपये इतकी आहे. ऑटोमेशन सिस्टिमइंटिग्रेेशनमध्ये जगातील नामवंत १२ कंपन्यांमध्ये ‘कॉटमॅक’चा समावेश होतो. टाटा, बजाज, जनरल मोटर्स, थरमॅक्स, भारत फोर्ज, महिन्द्रा, नेस्ले, गोदरेज, लार्सन ऍण्ड टुब्रो, कॅडबरीसारख्या अनेक नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्यांना ‘कॉटमॅक’ सेवा देते. भारतात पुणे, रायगड, बंगळुरू, हैदराबाद, औरंगाबाद, दिल्ली अशा १० ठिकाणी, तर परदेशात अमेरिका, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, कॅनडा आदी ठिकाणी ‘कॉटमॅक’ कार्यरत आहे.
२०१६ मध्ये मुकुंद मुळे यांचा केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बाबुल सुप्रीयो यांच्या हस्ते ’इटी नाऊ-लीडर्स ऑफ टुमारो २०१६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ’कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ या उद्योजकीय संस्थेचा प्रतिष्ठित समजला जाणारा २०१५ सालचा ’सीआयआय इंडस्ट्रियल इनोव्हेशन ऍवॉर्ड’ हा पुरस्कार देखील ‘कॉटमॅक’ला मिळाला. २००७ साली ‘कॉटमॅक’ने सिंगापूरची एक कंपनी खरेदी केली. ’’एका मध्यमवर्गीय भारतीयाने सुरू केलेल्या कंपनीने सिंगापूरची कंपनी खरेदी केली, हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण होता,’’ असे मुकुंद मुळे म्हणतात. आपल्या शेतकरी बांधवांसाठी मदत म्हणून मुळे यांनी ‘पानी फाऊंडेशन’साठी अंबेजोगाई येथे मदतकार्य सुरू केले आहे. सोबतच ग्रामीण भागातील तरुणांना ते व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षित करत असतात.
प्रामाणिक, प्रचंड कष्ट घेण्याची तयारी आणि नैतिक मूल्यांची सांगड यामुळेच आपण व्यावसायिक आयुष्यात यशस्वी झाल्याचं ते मान्य करतात. ’’उद्योजक होणार्या तरुणांनी ही त्रिसूत्री अंमलात आणल्यास त्यांना देखील यश मिळू शकते,’’असे मुकुंद मुळे म्हणतात. ’’आपण जर मनात आणलं तर या जगात काहीही अशक्य नाही,’’ हे मुकुंद मुळे यांनी सिद्ध केले आहे.
-प्रमोद सावंत