
मंगळवारी दिवसभर सगळीकडे बाप्पाच्या विसर्जनाची धामधूम सुरू होती आणि अशातच संध्याकाळी बंगळुरु येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त माध्यमातून झळकू लागले. बंगळुरूमधील राजाराजेश्वरी नगर येथील त्यांच्या राहत्या घरी गौरी यांची अत्यंत निर्घृणपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. परखडपणे टीका करणारी एक धाडसी पत्रकार गमावल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त झाली. सोशल मीडियावरही निषेधाचे स्वर गडद झाले. ५५ वर्षीय गौरी लंकेश यांचा जन्म बंगळुरू येथे झाला. गौरी यांचे वडील पी. लंकेश विख्यात चित्रपट निर्माते होते. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. जवळपास गेल्या २० वर्षांहून अधिक काळ त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत होत्या. गौरी लंकेश यांनी ’टाइम्स ऑफ इंडिया’ तून पत्रकारितेचा श्रीगणेशा केला होता. पत्रकारितेच्या क्षेत्रात काही काळ स्थिरावल्यानंतर स्तंभलेखक चिदानंद राजघट्टा यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर हे जोडपे दिल्लीमध्ये स्थायिक झाले. दिल्लीमध्ये ‘संडे मॅगझीन’ साठी नऊ वर्षे गौरी यांनी काम केले. ’इनाडू’ ग्रुपच्या तेलगु चॅनलसाठी त्यांनी दिल्लीत काम केले. गौरी लंकेश यांच्या वडिलांचे सन २००० मध्ये निधन झाल्यानंतर त्या पुन्हा बंगळुरूमध्ये परतल्या. त्यांच्यावर समाजवादी आणि स्वतंत्रतावादी विचारांचा पगडा होता. गौरी लंकेश या साप्ताहिक ‘लंकेश पत्रिका’ च्या संपादिका होत्या. ’लंकेश पत्रिका’ मधून त्यांनी जातीय राजकारणावर सातत्याने टीका केली. तसेच विविध वर्तमानपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करायच्या. वृत्तवाहिन्यांवर ‘प्राईम टाईम’मध्ये होणार्या विविध चर्चेच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असायचा. त्या देशातील असहिष्णुता आणि जातीय राजकारणाच्या प्रखर विरोधक होत्या. विशेष म्हणजे, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम.एम. कलबुर्गी यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली होती, त्याच पद्धतीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. आता नेहमीप्रमाणे गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासाची सूत्रे वेगाने फिरू लागली असली तरी त्या संबंधित आरोपी कधी सापडणार, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसशासित राज्यामध्ये झालेल्या या हत्येमुळे कर्नाटकच्या सुरक्षेयंत्रणेवर आणि सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे एरवी भाजपच्या नावाने गळे काढणार्या कॉंग्रेस सरकारला आता लवकरात लवकर या खुनाचा तपास करुन आरोपींना गजाआड करण्याचे आव्हान असेल. तसे झाल्यास लंकेश यांच्या लेखणीला सर्वार्थाने न्याय मिळेल.
हत्येचे राजकारण करुन काय साधणार?
आज पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात घडणार्या अनिष्ट, अन्यायकारक घटनांवर टीका केली जाते. केवळ आपला समाज सुधारावा, चांगलं आणि वाईट यामधील फरक समाजाला कळावा, हा त्यामागचा नि:स्वार्थी हेतू असतो. आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातही समाजातील काही घटकांवर अंधश्रद्धेचा पगडा आहे. कित्येक प्रथा-परंपरा या अन्यायकारक असल्या तरी त्या अजूनही कवटाळल्या जातात. मग आजच्या या आधुनिक युगात अशा कुप्रथांना संपुष्टात आणायचे असेल तर मग लेखणीच्या साहाय्याने समाजाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. पण नेमकी ही बाब काही मंडळींना खुपते आणि समाजाच्या भल्यासाठी कामकरणारी मंडळी त्यांना धोक्याची घंटा वाटू लागतात आणि येथूनच त्यांना संपवण्याचा डाव आखला जातो. गौरी लंकेश यांच्या बाबतीत असेच काहीसे झाले.
स्वतंत्र पत्रकारितेच्या मार्गे गौरी लंकेश त्यांना सहन न होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत होत्या. निर्भिडपणे मत मांडणार्या महिला पत्रकार म्हणून गौरी लंकेश यांनी बंगळुरूच्या पत्रकारितेच्या वर्तुळात आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले होते. वडिलांकडून पत्रकारितेचे धडे गिरवल्यामुळे त्यांच्यातील पत्रकाराने त्यांना कधीच शांत बसू दिले नाही. विशेष म्हणजे, गौरी लंकेश त्यांच्या साप्ताहिकासाठी कोणतीच जाहिरात घेत नसत. त्याचबरोबर वंचित घटक, दलित समुदायाच्या हितासाठी लंकेश नेहमी अग्रेसर असायच्या.
डाव्या विचारसरणीशी निगडित असल्यामुळे नक्षलवाद्यांना हिंसा सोडून मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही त्या विशेष प्रयत्नशील होत्या. त्यामुळे कर्नाटकने केवळ एक धडाडीची पत्रकारच गमावली नसून एका सामाजिक कार्यकर्त्यालाही गमावले आहे. पण लंकेश यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा पुरोगामी आणि सेक्युलरवाद्यांनी मात्र उजव्या विचारसरणीच्या संघटनांना सवयीप्रमाणे आरोपीच्या पिंजर्यात ढकलायला सुरुवात केली. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि त्यानंतर लंकेश यांच्या हत्येचा संबंधही थेट हिंदुत्ववादी संघटनांशी जोडून अनेकांनी सोशल मीडियावर निराधार माहिती पेरल्याचे उद्योग केले. तेव्हा, लंकेश यांची हत्या ही निषेधार्ह आहेच, पण उगाच त्याचा राजकीय टीपा-टीप्प्णीसाठी मुद्दा म्हणून वापर करुन दिशाभूल करण्याचा पुरोगाम्यांनी चालवलेला प्रयत्न सर्वथा निंदनीयच म्हणावा लागेल. तेव्हा, या घटनेचे केवळ राजकारण न करता कॉंग्रेस आणि केंद्र सरकारनेही लवकरात लवकर आरोपींना गजाआड करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
- सोनाली रासकर