मराठी साहित्यविश्वात त्यांनी ‘लिटील मॅगझिन’ चळवळ आणि आपल्या बिनधास्त लेखणीने वेगळाच वाचकवर्ग तयार केला होता. पठाणी वेशात ते सर्वांमध्ये वावरत असत. कालांतराने त्यांनी आपला बिनधास्त अंदाज सोडत अज्ञातवास ते आध्यात्मिक लेखन असा प्रवास केला. असे एक बिनधास्त आणि बोल्ड लेखणी लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे चंद्रकांत खोत.
चंद्रकांत खोत यांचा जन्म ७ सप्टेंबर १९४० रोजी भीमाशंकर येथे झाला. त्यानंतर ते मुंबईतील लालबाग-परळ या ठिकाणी लहानाचे मोठे झाले. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना केवळ सातवीपर्यंत शिक्षण दिले. मात्र, चंद्रकांत खोत यांनी परिस्थितीसमोर हात न टेकता पुढे शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वकष्टाने एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खोत यांनी पीएच.डी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यासाठी त्यांना गाईड न मिळाल्यामुळे त्यांचे पीएच.डी. करण्याचे स्वप्न भंगले. याच कालावधीत खोत यांनी साहित्यक्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले होते. खोत यांच्याबद्दल सांगण्यासारखी एक विशेष बाब म्हणजे, खोत यांचे पीएच.डी.चे स्वप्न भंगले असले तरी त्यांच्याच मूळ गावातील एका विद्यार्थ्याने त्यांच्या साहित्याचा आधार घेत आपले पीएच.डी. चे शिक्षण पूर्ण केले होते. चंद्रकांत खोत यांना त्यांच्या लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला. १९९५ सालानंतर १५ वर्षं खोत हे अज्ञातवासात गेले होते. अचानक त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वातही बदल झाला होता. पठाणी वेशातले चंद्रकांत खोत वाढलेली दाढी, भगवे कपडे आणि अध्यात्माकडे वळलेले दिसू लागले. पण या पंधरा वर्षांमध्ये ते कुठे होते याची कोणालाही कल्पना नव्हती. त्यापूर्वी खोत यांनी लिहिलेली ’उभयान्वयी अव्यय’, ’बाराखडी’, ’विषयांतर’ अशा बिनधास्त विषयांवरील कादंबर्या खूप गाजल्या. अशा बिधनास्त विषयांवरील त्यांच्या लेखणीने साहित्यविश्वातही मोठी खळबळ उडवली होती. मात्र, कालांतराने त्यांनी आपली लेखणी अध्यात्माकडे वळवली. ‘अबकडई’ या दिवाळी अंकाच्या रूपाने त्यांनी एक वेगळीच वाट चोखाळली. एक कवी म्हणून साहित्यक्षेत्रातला आपला प्रवास त्यांनी सुरू केला आणि १९६९ मध्ये ’मर्तिक’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. याव्यतिरिक्त त्यांनी ’यशोदा’ या चित्रपटासाठी ’घुमला हृदयी नाद हा’, ’धर धर धरा’, ’माळते मी माळते’ ही गीते आपल्या लेखणीतून उतरवली.
खोत यांचे उतारवयातील जीवन हे अतिशय खडतर असेच गेले. त्यांच्याकडे स्वत:च्या हक्काचे असे घरही राहिले नव्हते. अनेक वर्षे त्यांनी आर्थर रोड येथील साईबाबा मंदिरात, तर सात रस्ता येथील पदपथावर घालवली. याच कालावधीत ते आपल्या भावाच्या घरी जात येत असत, पण रात्री मंदिरातच झोपत असत. मराठी साहित्य क्षेत्रात ’लैंगिकता’ या विषयावरील आपल्या बिनधास्त लेखनाने खळबळ उडवून देणार्या चंद्रकांत खोत यांची १० डिसेंबर २०१४ रोजी वयाच्या ७५व्या वर्षी प्राणज्योत मालवली. साहित्यात आपला स्वत:चा ठसा उमटविणार्या आणि स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण करणार्या खोतांचा अखेरचा प्रवास हा अतिशय खडतर असाच होता.
- जयदीप दाभोळकर