दोन वर्षांपूर्वी मी कर्नाटक राज्यातली दोन प्रसिद्ध मंदिरे बघायला गेले होते. बेलुरूचे चेन्नकेशव मंदिर आणि जवळच्याच हळेबिडूचे होयसळेश्वर मंदिर. दहाव्या शतकात कर्नाटकातल्या कावेरी नदीच्या खोऱ्यात उदयाला आलेल्या होयसळ ह्या राजवंशातल्या राजांनी बांधलेली ही मंदिरे. उत्कृष्ट शिल्पकलेसाठी जगभर प्रसिद्ध असलेली. ह्या होयसळ राजवंशाने कर्नाटकावर जवळ जवळ चारशे वर्षे राज्य केलं. कावेरी नदीच्या खोऱ्यातला सुपीक प्रदेश त्यांच्या अंकित असल्यामुळे साहजिकच हे साम्राज्य श्रीमंत होतं. इथले राजेही रसिक आणि नृत्य, संगीत, साहित्य, शिल्पकला आदी कलांना उदार हस्ते आश्रय देणारे होते. त्यांच्या चारशे वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी लहानमोठ्या अश्या दीड हजार मंदिरांचे निर्माण केले होते असे कागदोपत्री पुरावे आहेत. त्यातली आज जेमतेम चारशे मंदिरे कशीबशी तग धरून आहेत.
चौदाव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कफूर एका मोठ्या सैन्यासहित दक्षिणेत उतरला. मुळचा हिंदू राजपूत असलेल्या ह्या तरुणाला बाटवून, त्याचे शारीरिक खच्चीकरण करवून खिलजीने त्याला आपला सेनापती केले. ह्या सगळ्यामुळेच की काय, पण कफूर धार्मिकदृष्ट्या अत्यंत कडवा आणि क्रूर मूर्तिभंजक बनला आणि त्याच्या सैन्याच्या वाटेत आलेल्या प्रत्येक हिंदू मंदिरावर त्याने घणाचे घाव घालून ती मंदिरे तोडून मोडून टाकली, मूर्तींची विटंबना केली. तरीही, इतके सगळे क्रूर घाव सोसून ही मंदिरे आजही उभी आहेत. इस्लामी तोडफोडीच्या तडाख्यातून वाचलेली शिल्पे बघताना आजदेखील आपली नजर ठरत नाही इतकी ती शिल्पे सुंदर आहेत.
बेलुरूच्या चेन्नकेशव मंदिराच्या बाहेर मी एकटीच उभी होते, मंदिराच्या भिंतीवर नरसिंहाचं एक अत्यंत सुंदर शिल्प होतं. दुर्दैवाने मूर्तीच्या चेहेऱ्याची नासधूस झाली होती, त्यामुळे मूर्तीच्या चेहेऱ्यावरचे रौद्र भीषण भाव दिसत नव्हते, पण नरसिंहाच्या देहबोलीतून दिसणारा त्याचा आवेश आणि मृत्यू जवळ आलाय हे स्पष्ट दिसल्यामुळे जाणवणारी मांडीवरच्या हिरण्यकश्यपूची विकलता स्पष्ट जाणवत होती. असं वाटत होतं की कुठल्याही क्षणी हिरण्यकश्यपूचे हातपाय तडफडायला लागतील आणि नरसिंहाची घनगंभीर गर्जना ऐकू येईल. कितीतरी वेळ मी मूर्तीकडे बघतच राहिले होते, मंत्रमुग्ध होऊन. तंद्रीच लागली होती माझी. तेवढ्यात अचानक एक जोडपं येऊन माझ्या शेजारी उभं राहिलं. उत्तर भारतीय असावं. नुकतंच मंदिरात दर्शन घेऊन ते दोघं बाहेरची शिल्पं बघत होते. मी कितीतरी वेळ एकाच शिल्पाकडे बघत आहे हे बघून तेही दोघं थांबले. त्यातल्या स्त्रीने शिल्पाकडे निरखून बघत नवऱ्याला विचारलं, 'ये किसका स्कल्पचर है? हनुमानजी है क्या?'. मूर्तीच्या चेहेऱ्याची तोडफोड झाल्यामुळे साधारण आकारावरून तिला ती हनुमानाची मूर्ती वाटली होती! शिल्पाच्या बाकीच्या भागाकडे तिने नीट पाहिलंही नव्हतं. मुळात ना तिला भारतीय शिल्पकला समजत नव्हती ना तिला आपल्या पुराणकथा ज्ञात होत्या.
'हनुमानजी तो नही लगते' कपाळाला आठ्या घालून ते शिल्प निरखत तिचा नवरा म्हणाला. पण ते नक्की कुणाचं शिल्प आहे हे त्यालाही उमगत नव्हतं, शेवटी त्याने मला विचारलं, 'एक्स्क्यूज मी, लेकिन ये स्कल्पचर किसका है'? 'ये उग्रनरसिंह है', मी म्हटलं. तरीही त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडल्यासारखं वाटलं नाही म्हणून मी त्याला मग नरसिंहाची गोष्ट, उग्रनरसिंह म्हणजे काय, योग नरसिंह म्हणजे काय, लक्ष्मी नरसिंह म्हणजे काय. त्यांची शिल्पे वेगवेगळी कशी कोरली जातात वगैरे सगळं समजावून सांगितलं. त्या दोघा नवरा-बायकोनी ते नीट लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि नंतर मला विचारलं. 'ये सब आपने कहाँसे सिखा? ऐसा कोई कोर्स होता है क्या स्कल्पचर एप्रिसिएशन का?'
त्याचा प्रश्न ऐकून मी विचारात पडले. खरं तर कुठल्याही अभिजात कलेप्रमाणे शिल्पकलेचीही एक परिभाषा असते. अभिजात संगीत समजून घ्यायला जशी त्याची परिभाषा आधी समजून घ्यावी लागते तसेच शिल्पकलेचा आस्वाद घ्यायलाही शिकावं लागतं. पण आपल्या शिक्षणक्रमात मुळातच कलास्वाद ह्या विषयाला स्थान नाही आणि त्यात आपण चुकून माकून 'आर्ट एप्रिसिएशन' च्या नावाखाली चालवलेल्या अभ्यासक्रमांना गेलोच तर तिथे भारतीय शिल्पकला सोडून जगातल्या इतर कलाप्रकारांबद्दलच जास्त शिकवतात. मी भारतीय शिल्पकलेचा आस्वाद घ्यायला शिकले तो एकतर मुळात शिल्पकला, भारतीय तत्वज्ञान आणि आपल्या पुराणकथा आणि इतिहास ह्या विषयांची आवड होती म्हणून आणि नंतर गो. बं. देगलूरकर सरांसारख्या ह्या क्षेत्रातल्या दिग्गज माणसाच्या सहवासात आल्यामुळे. देगलूरकर सरांबरोबर मी वेरूळचे कैलास लेणे बघितले. तिथला दगड अन दगड जिवंत करून दाखवला सरांनी आम्हाला.
आपल्या मंदिरांमधून जेव्हा शिल्पे कोरली गेली तेव्हा त्यांचे प्रयोजन केवळ देव-देवतांपुढे लोकांनी नतमस्तक व्हावे एव्हढेच नव्हते. धार्मिक श्रद्धा जोपासण्याबरोबरच लोकांना रामायण, महाभारत ह्या काव्यांबद्दलची माहिती मिळावी, भोवतालचे जग, प्राणिसृष्टी, झाडेझुडुपे, तत्कालीन लोकसंस्कृती, वेशभूषा, वेशभूषा, साहित्य, पर्यावरण अशा सर्व गोष्टींचे दर्शन लोकांना व्हावे असा मंदिर बनवणाऱ्या लोकांचा हेतू असायचा. मंदिरात येताना माणसाने बाह्य सृष्टीकडे लक्ष द्यावे आणि आत शिरताना मात्र अंतर्मुख व्हावे असा काहीसा भाव शिल्पे कोरणाऱ्यांच्या मनात असावा. म्हणूनच अगदी कामशास्त्रापासून ते प्राणिसृष्टीपर्यंतची शिल्पे आपल्याला जुन्या मंदिरांच्या भिंतीवरून दिसू शकतात.
आपल्या शहरी, शिक्षित भारतीय समाजात आजकाल ही शिल्पे वाचू शकणाऱ्या लोकांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. लोक अत्यंत भाविकपणे मंदिरात जातात, दर्शन घेतात, भर पडतात. पण मंदिराच्या प्राकारामधली शिल्पे त्यांच्याशी बोलत नाहीत, कारण त्या शिल्पांची भाषा आपल्याला समजत नाही. प्रत्येक शिल्पाची म्हणून एक कथा असते. त्या कथेत शिल्पकाराचे कौशल्य तर असतेच, पण आपला इतिहास असतो, आपल्या पुराणकथा असतात, त्या त्या मूर्तीचा, मूर्तिकाराचा भाव असतो. ती कथा समजून घेण्यासाठी माझं हे नवीन सदर, शिल्पकथा.
- शेफाली वैद्य