एडविन हबल : खगोलशास्त्राचे जनक

Total Views |
 

 
 
एडविन हबल हे खगोलशास्त्राचे जनक मानले जातात. आपल्या आकाशगंगेव्यतिरिक्त अन्य आकाशगंगांचा शोध घेऊन त्यांनी मानवजातीच्या ब्रह्मांडाबाबत असलेल्या संकल्पना बदलून टाकल्या. २० नोव्हेंबर १८८९ साली अमेरिकेतील मार्सफिल्ड मोसोरी येथे त्यांचा जन्मझाला. त्यांनी पुढे शिकागो विद्यापीठात गणित आणि खगोलशास्त्राचा अभ्यास केला आणि १९१० साली त्यांना विज्ञान विषयातील पदवी प्रदान करण्यात आली. रोड्‌स स्कॉलरशिप मिळविणारे ते ऑक्सफर्ड विद्यापीठातील पहिले विद्वान होते. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याचेही शिक्षण घेतले.
 
 
पहिल्या महायुद्धात काही काळ सक्रिय सहभाग घेतल्यानंतर ते पुन्हा शिकागो विद्यापीठात परतले. १९१७ साली त्यांनी ‘डॉक्टरेट’ पदवी मिळवली. हबल यांच्या काळात खगोलशास्त्रज्ञांच्या ब्रह्मांडाविषयीच्या संकल्पना काही वेगळ्या प्रकारच्या होत्या. १९२३ साली हबल यांनी ‘अँड्रोमेडा’ नावाच्या अवकाशातील एका धुरकट पट्‌ट्याचे हूकर दुर्बिणीद्वारे परीक्षण केले. त्यावेळी ‘अँड्रोमेडा’देखील आपल्या आकाशगंगेप्रमाणेच तार्‍यांनी बनली असून ती आकाशगंगा मंद प्रकाश असलेल्या तार्‍यांनी तयार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांना ठिकाणी एक ‘सेफेज व्हेरिएबल’ तारा दिसला. त्याचाच उपयोग अंतर मोजण्यासाठीदेखील केला जाऊ शकतो.
 
 
याचाच वापर करून त्यांनी ‘अँड्रोमेडा म्हणजे सर्वात जवळच्या तार्‍यांचा समूह नसून ती एक आकाशगंगा असल्याचे सिद्ध केले. यानंतर त्यांनी अन्य निहारिकांबाबतही (Nebula)संशोधन केले. त्यांनी केलेल्या संशोधनानंतर ब्रह्मांडाबाबत असलेल्या अनेक संकल्पनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत गेले. त्यांनी पुढील काळात आकाशगंगेला लंबवर्तुळ, सर्पिलाकृती आणि अनियमित आकाशगंगेच्या वर्गीकरणासाठी एक प्रणाली विकसित केली. त्याच प्रणालीची विकसित प्रणाली आजही संशोधनासाठी वापरली जाते. तसेच आकाशगंगा एकमेकांपासून जेवढ्या दूर आहेत, तेवढ्याच वेगाने एकमेकांपासून दूर असल्याचेही हबल यांच्या निदर्शनास आले. यावरून ब्रह्मांड समान रूपात विस्तारत असल्याचा निष्कर्षही हबल यांनी काढला. याव्यतिरिक्त संशोधनासाठी वापरण्यात येणार्‍या ‘हबल स्पेस टेलिस्कोप’चेही नाव एडविन हबल यांच्याच नावावरून ठेवण्यात आले आहे. त्यांनी अमेरिकेतील माऊंट विल्सन वेधशाळेत प्रदीर्घ काळासाठी आपली सेवा बजावली. दरम्यान, २८ सप्टेंबर १९५३ रोजी सॅन मॅरिनो, कॅलिफोर्निया येथे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी आजवर खगोलशास्त्रात दिलेले योगदान अमूल्य आणि वाखाणण्याजोगे आहे. एडविन हबल यांनी दुर्बिणीसोबतच आपले नाव सार्थक ठरवले आणि सामान्यांच्या ब्रह्मांडाबाबत असलेल्या अनेक संकल्पनांना बदलण्याचे मोलाचे कार्य केले. हबल स्पेस टेलिस्कोपच्या रूपाने त्यांच्या संशोधनाची भावना आजही सर्वांमध्ये चिरंतर आहे. 
 
 
- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.