शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : चैत्र

    26-Sep-2017   
Total Views |



चैत्र म्हटले की डोळ्यासमोर येतं ते चैत्रातील हळदी कुंकू. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात चैत्रातील हळदी कुंकवाची परंपरा आहे. सुवासिनिंना घरी बोलावून डाळ, पन्ह आदी देवून, वाण लुटून,ओटी भरून हळदी कुंकू लावणे म्हणजे मानाची परंपरा. अशाच एका हळदी कुंकवाची कथा म्हणजे "चैत्र".

एकदा एका गावात सर्व महिलांना चैत्रातील हळदी कुंकवाचे बोलावणे येते. अनेक ठिकाणी बोलावणे आलेले असते. मात्र खास बोलावणे असते ते गावातील नाईक वाड्यावरील. नाईक कुटुंब हे गावातील सगळ्यात श्रीमंत घराणं, तेथील हळदी कुंकू देखील तितकच प्रसिद्ध. एका घरातील चिमुरडा आपल्या आईकडे हट्ट करतो की आपणही नाईक वाड्यावरील हळदी कुंकवाला जावूयात, आई नाही म्हणते मात्र मुलाच्या हट्टापायी तिला जावेच जागते.

तिथे मात्र नाईक वाड्यावरील सुनबाई, "तुम्ही दोन दाणे हरभऱ्यांसाठी दोनदा का म्हणून आलात?" असा प्रश्न विचारुन या महिलेचा अपमान करते. तसेच मानाची ओटी देखील भरत नाही. भर हळदी कुंकवातून एक सुवासिनी ओटी न भरता निघून येते.

काही दिवसांनंतर ही महिला आपल्या घरी हळदी कुंकू ठेवते आणि नाईक वाड्यासह सगळ्यांना आमंत्रण देते. सगळे येतातही. अगदी नाईक वाड्यावरील सासू सून देखील. नाईकवाड्यावरील आज्जींना मात्र जे झाले त्याचे फार वाईट वाटत असते त्या माफी मागतात. मात्र....


पुढल्या वर्षी जेव्हा पुन्हा चैत्राच्या महिन्यात हळदी कुंकवाचे आयोजन होते, तेव्हा मात्र अपमानित झालेली ती महिला पुन्हा त्या समारंभास जावू शकत नाही. कारण काही तरी अनिष्ट घडलेलं असतं. नेमकं काय अनिष्ट घडतं.??? का घडतं?? हे सगळं जाणून घेण्यासआठी हा लघुपट नक्कीच बघा.

खरंतर यामध्ये अंधविश्वासाची, अंधश्रद्धेची एक छटा दाखविण्यात आली आहे. त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्यानी ठरवावे, मात्र केवळ सोनाली कुलकर्णीचा सुंदर अभिनय आणि जुन्या वाड्याचा, गावाचा अनुभव घेण्यासाठी एचदा तरी हा लघुपट नक्कीच बघावा. या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ४ लाख ४३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.

 

- निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड.