तसं म्हणायला गेलं तर आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सगळं काही झटपट, एका क्लिकवर मिळालच पाहिजे, अशी मानसिकता सर्वत्र भिनलेली दिसते. म्हणूनच तर घरातल्या किराणामालाच्या सामानापासून ते अगदी बाहेरगावच्या तिकिटाचे आरक्षण करण्यासाठी इंटरनेटच्या महाजालाचा आधार घेतला जातो. या टेक्नोयुगात मनुष्यप्राणी अगदी सुखावून (आणि सुस्तावूनही बरं का...) गेलाय. रोजच्या दैनंदिन कामांमध्ये तंत्रज्ञान इतकं मिसळलयं की, वेळेची बचत होते, शारीरिक कष्टही कमी होतात. परंतु, ही बाब खरी असली तरी त्यातून अधून-मधून मिळणार्या धोक्याच्या संकेतांकडे दुर्लक्ष करुन अजिबात चालणार नाही. असेच एक वृत्त नुकतेच येऊन धडकले. ते म्हणजे, पुढील पाच वर्षांमध्ये बँकिंग क्षेत्रातील ३० टक्के कर्मचार्यांना नारळ मिळू शकतो, असे संकेत ’सिटी’ बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमपंडित यांनी दिले आहेत. तंत्रज्ञानामध्ये सातत्याने होणार्या क्रांतिकारी बदलांमुळे बँकिंग क्षेत्रामध्ये कर्मचार्यांची गरजच लागणार नाही, अशी भविष्यवाणी वर्तविण्यात आली आहे. ‘येत्या काही वर्षांमध्ये कृत्रिमबुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि रोबोटिक्सचा वापर बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
हल्ली बँकांमध्ये जाण्याऐवजी मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगच्या आधारे सर्व सुविधांचा वापर करणार्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. याशिवाय बँकांकडून स्वयंचलित यंत्रांचा वापर करण्याच्या प्रमाणामध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे आज बँकेचे व्यवहार करताना पूर्वी ज्या कामांसाठी मनुष्यबळाची गरज भासत होती, त्याची जागा तंत्रज्ञानाने घेतल्यामुळे बँकिंग क्षेत्रात मंदीचे सावट पसरले आहे. केवळ बँकिंग क्षेत्रच नव्हे, तर अनेक छोट्या-मोठ्या क्षेत्रांमध्ये स्वयंचलित यंत्रणा, तंत्रज्ञानाने कब्जा केला आहे. एखाद्या क्षेत्रामध्ये मंदी आली की, रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. मग मानसिक दडपणाखाली येऊन आत्महत्येकडेही हताश तरुणांची पावलं वळतात. पण असं हार मानून जीवन संपवणं हा कुठल्याच समस्येवरचा उपाय नाही. अर्थात तरुणांना नवीन तंत्रज्ञान शिकून घेणे अवघडत नाही. पण, पन्नाशी ओलांडलेल्या मंडळींना या सर्व तांत्रिक वातावरणाशी जुळवून घेणे कठीण असते. आज तरुणांना करिअरसाठी अनेक नवीन क्षेत्रांची दालने खुली झाली आहेत. अनेक वेगवेगळे अभ्यासक्रम, कोर्स शिकवले जात आहेत. परंतु, केवळ पुस्तकी स्वरूपाचे अभ्यासक्रमशिकवून, फायदा नाही. वर्तमानकाळातील बदलत चाललेले तंत्रज्ञान आणि भविष्यात त्यामध्ये होणारे बदल याचे अचूक गणित ओळखून त्यादृष्टीने नवनवीन तंत्र आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे.
करा उद्याचा विचार
आर्थिक स्तराचा विचार केल्यास अल्प उत्पन्न गट, मध्यमउत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट असे साधारण मध्यमवर्गीयांचे उत्पन्नावर आधारित तीन प्रकार पडतात. अर्थात, या तिन्ही गटांची जीवनशैली, गरजा, सवयी, शैक्षणिक पात्रता यामध्ये बरीच तफावत आढळून येते. आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये कमी-जास्त प्रमाणात या तिन्ही गटांचा तंत्रज्ञानाशी संबंध येतो. यापैकी मध्यमउत्पन्न आणि उच्च उत्पन्न गटातील मंडळी तंत्रज्ञानाचा तुलनेने जास्त वापर करतात, परंतु अल्प उत्पन्न गटांचा तंत्रज्ञानाशी फारसा संबंध येत नाही. कारण, निरक्षरता किंवा तंत्रज्ञानाचे अज्ञान आणि बहुतांशवेळा काही तरी उलटाच परिणामघडायचा म्हणून तंत्रज्ञानाची मनात घर करुन बसलेली भीती. अर्थात, यातील काही तरुण नवीन तंत्रज्ञान शिकवून घेण्यासाठी उत्सुक असले तरी त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने त्यांना बरेचदा ते शक्य होत नाही.
आज भारतामध्ये अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे चालतात. लघुउद्योग चालतात.कारखान्यांमधून रोजच्या वापरातल्या वस्तू बनविण्याचे कामअल्प उत्पन्न गटातील कर्मचारी वर्ग करताना दिसतो. पण शिक्षणाच्या अभावामुळे व योग्य मार्गदर्शनाच्या अभावी त्यांना अशीच छोटी-मोठी कामे करणे सोयीचे जाते. पण आगामी काळात ते करत असलेल्या छोट्या-मोठ्या कामांची जागा जर तंत्रज्ञानाने घेतली तर खूपच अवघड होऊन जाईल. अर्थात, काही कामे ही मनुष्यबळाशिवाय होऊच शकत नाही, हे जरी खरे असले तरी स्वस्थ बसून अजिबात चालणार नाही. त्यामुळे या अल्प उत्पन्न गटातील लोकांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्यासाठी रोजगाराची साधने उपलब्ध करून द्यायला हवी. आज भारतातल्या लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केल्यास प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेचे लोण हे मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसपासून लहान-सहान व्यवसाय, उद्योगांपर्यंत येऊन ठेपले आहे. त्यामुळे या बदलत्या काळानुसार प्रत्येकानेच काही बदल करून घेतले पाहिजे. आज नवनवीन क्षेत्रे उदयास येत असली, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत असल्या तरी वाढणारी तीव्र स्पर्धा ही तितकीच धोकादायक आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध करून देताना आजच्यापेक्षा उद्या काय होऊ शकते आणि त्यासाठी कोणते नवीन कौशल्य शिकून घेणे गरजेचे आहे, याचा विचार उच्च शिक्षण घेतलेल्यांपासून ते अशिक्षित असलेल्यांपर्यंत सर्वांनी करायला हवा. आज नोकरीची कोणतीच शाश्वती देता येत नाही. त्यामुळे पदवी मिळवली की सगळे काही ठीक झाले, असा भ्रम न ठेवलेलाच बरा !
-सोनाली रासकर