मुंबईच्या उच्चभ्रू लोखंडवाला परिसरात नुकतीच एक दुदैवी घटना उजेडात आली. एका वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तिच्याच घरात आढळून आला. हा दरोड्याच्या प्रयत्नातून झालेला किंवा कौटुंबिक वादातून वगैरे झालेला खून असल्याचे प्रथम दर्शनी तरी सिद्ध झालेले नाही. पण हा मृतदेह सहा महिन्यांपासून घरातच कुजून त्याचा सांगाडा होईपर्यंत शेजार्यांना त्याची साधी दुर्गंधीही येऊ नये, याचेच आश्चर्य व्यक्त केले गेले. त्यामुळे आज आपण आपल्याच आयुष्यात किती गुंतलो गेलो आहोत आणि आसपासच्या जीवनापासून किती दुरावलो आहोत, याचेच हे भयाण प्रातिनिधिक उदाहरण. एक वृद्ध महिला आपल्याच घरात मृतावस्थेत होती आणि आसपासच्या लोकांना ना तिची खबर होती ना तिची कोणी तिची विचारपूस केली. अमेरिकेतून एनआरआय मुलगा घरी आला आणि दार उघडताच त्याला थेट दर्शन झाले ते आईच्या सांगाड्याचे...
२०१३ मध्ये मुलाच्या वडिलांना देवाज्ञा झाली आणि आईचे एकाकी जीवन सुरू झाले. मुलगाच आपल्या आई-वडिलांपासून दूर गेला होता. अनेक महिने फोनवरूनही साधी संपर्काची तसदी त्याने घेतली नाही. यातूनच आपल्या नात्यांमध्ये निर्माण झालेला तुटकपणा प्रतिबिंबित होतो, तर दुसरीकडे सहानी यांच्या शेजार्यांनाही त्या अनेक दिवस दिसल्या नाहीत म्हणून काहीच खटकले नाही... संशयही आला नाही... यापेक्षा मोठे दुर्दैव तरी कोणते ? २० वर्षांपूर्वी मुलाने अमेरिकेत वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला आणि आईवडील उतरत्या वयात एकाकी पडले. एकमेकांशिवाय त्यांना आधारही नव्हता. त्यातही पतीला झालेली देवाज्ञा त्यांना आणखी एकाकी करून गेली. त्यानंतरही आईला आधाराची गरज आहे याची मुलाला जाण नसावी इतके भावनाशून्य आपण झालो आहोत? त्याच आईवडिलांनी लहानाचा मोठा केला आणि त्यांच्याच उतरत्या वयात त्यांचा आधार सातासमुद्रापार स्वतच्या आयुष्याची स्वप्न रंगवण्यात गर्क... पण ज्या आईने स्वप्न बघायला शिकवले तिचा मात्र त्याला एवढा विसर पडला की महिनोन्महिने फोनवरुनही आईची ख्यालीखुशाली त्याला विचारावीशी वाटली नाही. आजच्या महत्त्वाकांक्षी तरुणांना नातेसंबंधांपेक्षा आपले काम, पैसा आणि परदेशी जीवनशैलीचेच मोठे अप्रूप... पण स्वत: उंची जीवन जगताना आपल्या मायदेशी आईवडिलांना रामभरोसे सोडून कसे चालेल? तेव्हा, वृद्धापकाळात पालकांना मुलांची, त्यांच्या आपुलकीची गरज असते, हे समजण्याइतपतही शहाणपण नव्या पिढीपाशी उरलेले नाही का?
...अशा जगण्याला अर्थ काय?
आज पैसा आणि सुविधांच्या मागे धावण्यात आपण इतके गुंतले आहोत की, त्यामुळे आपण समाजापासून अलिप्त होतोय, याची कुठे पुसटशी जाणीवही आपल्या मनाला शिवत नाही आणि अंधेरीच्या या घटनेवरुन त्याचीच प्रचिती येते. आपल्या आसपास काही घडले किंवा घडत असेल, तर हल्ली आपण त्यापासून चार हात दूरच राहणे पसंत करतो. यातच आपण या समाजाचेही काही देणे लागतो, याचा पूर्णत: विसर पडतो. आपण आसपास घडत असलेल्या घटनांबाबत हस्तक्षेपही करणे टाळतो, हे त्यापेक्षा अधिक भयावह आहे.
घरात एखादा उंदीर जरी मेला तरी दोन दिवसांत त्याची दुर्गंधी असह्य होते, पण इमारतीतील रहिवासी अनेक महिने आपल्या शेजारी मृतदेह घेऊन जगत होते आणि त्याची कोणाला किचिंतशी कल्पनाही नसावी. इमारतींच्या व्यस्त जीवनशैलीत आपल्याला हव्या त्या वस्तू अगदी एका फोन कॉलवर लगेच घरपोच मिळतातही. पण एखादा माणूस त्यामुळे घराबाहेरच पडत नाही, असे नाही. लोक घराबाहेर पडतात, भेटतातही; मात्र अनेक दिवस घराबाहेर न पडलेल्या माणसाची खबरही नसावी? गुन्हा घडतानाही आपण तो पाहून त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न करतो किंवा हल्ली त्याचे मोबाईलवर चित्रण करण्यात काही जण धन्यता मानतात. या अशा घटना पाहिल्या की, खरंच आपण माणुसकीचाही अलगद खून करतोय का, हाच प्रश्न निर्माण होतो. या घटनेमध्येही पैशाच्या मागे धावता-धावता आई मात्र मागेच राहिली. कारण, श्रीमंतीचा बुरखा घातलेल्यांच्या आपल्या शेजार्यांविषयीच्या संवेदनाही बधिर झाल्या आहेत. आज किमान शेजार्यांनी आपला शेजारधर्म जरी निभावला असता आणि महिलेची खबरबात घेतली असती, तर कदाचित मृतदेहाची अशी विटंबना तरी टाळता आली असती. पैसा, श्रीमंती ही केव्हाही कमावता येऊ शकते, पण जीव एकदा गेला, तर पुन्हा येत नाही. त्यामुळे केवळ शेजारीच नाही, तर आपल्या आईपासून संवादाने दुरावलेला मुलगाही या घटनेसाठी तितकाच कारणीभूत आहे. आपल्या आईवडिलांनाही आपल्यासोबत नेणे जरी शक्य नसले तरी किमान आईची खुशाली विचारणे तर नक्कीच शक्य होते. जर तसे झाले असते, तर आज कदाचित परिस्थिती वेगळी असती. त्यामुळे या घटनेत तो महिलेचा मृतदेह जणू नव्हताच, माणुसकीचा मृत्यू होता. त्यामुळे आज आपण श्रीमंतीचा आव आणून अशा भावनाशून्य जगण्याचा अर्थ तरी काय? हे समजण्याची गरज आता भासू लागली आहे.
- जयदीप दाभोळकर