
झांसी येथे राहणार्या एका दाम्पत्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला खरा, पण आपल नातं अजूनही टिकून राहावं, यासाठी पत्नीचे मनपरिवर्तन करण्याचा त्याने निर्णय घेतला आणि त्याने थेट न्यायालयाच्या आवारात पत्नीच्या मतपरिवर्तनासाठी चक्क गाणं गायला सुरुवात केली. सध्या यासंदर्भातला एका व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून पती-पत्नीमध्ये सुरू झालेलं भांडण घटस्फोटापर्यंत कधी जाऊन पोहोचतं, हे बरेचदा त्यांचं त्यांनाच कळत नाही आणि एकदा का घटस्फोटाचा निर्णय घेतला की, कमीपणा अजिबात सहन न करता या पवित्र नात्याची गाठ कायद्याच्या एका निर्णयाने एकाएकी तुटून जाते. अर्थात या प्रकरणात पतीने थोडासा समंजसपणा दाखवून नातं टिकविण्यासाठी निदान प्रयत्न तरी केले, परंतु सहसा अन्य प्रकरणांमध्ये बरेचदा तसे होताना दिसत नाही. बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि सोशल नेटवर्किंग साईट्सच्या प्रभावामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, आपल्या जोडीदाराबरोबरच घरातील ज्येष्ठांशी सुसंवाद वाढविणे, एकमेकांना अधिकाधिक समजून घेणे आणि समुपदेशकांचा आधार घेतल्यास कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येणार नाही. त्याहीपूर्वी विवाह म्हणजे काय, नाती कशी टिकवावीत, हे तरुणांनी खोलवर समजून घ्यावे, त्यामुळे घटस्फोटाची प्रकरणे कमी होऊन कुटुंबव्यवस्था अधिक सक्षम होईल.
परस्पर सामंजस्य, तडजोडीचा अभाव यांसारख्या असंख्य कारणांमुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढल्याची सद्यःस्थिती आहे. लग्नानंतर सहा महिने किंवा एखाद्या वर्षाच्या आतच थेट घटस्फोटाचा विचार करणार्यांचे प्रमाण वाढतेय; परंतु पती-पत्नीने सामंजस्याने परिस्थितीवर मात करायची, घटस्फोट घ्यायचा नाही, असे ठरविल्यास घटस्फोटांचे प्रमाण कमी होईल. उच्च शिक्षणाने दोघांच्याही मानसिकतेत बदल झाल्यामुळे एकीकडे अहंकार व संशयी वृत्ती वाढली, तर दुसरीकडे सहनशीलता, सुसंवाद कमी झाला, तसेच लैंगिक प्रश्न, प्रेमसंबंध, फेसबुक, व्हॉट्सऍपमुळे संवाद कमी होऊन नातेसंबंधातली दरी वाढली, परिणामी घटस्फोट वाढले. कौटुंबिक वाद-विवादांमुळे थेट कोर्टात जाण्यापेक्षा वडीलधार्या व्यक्ती व समुपदेशकांचा सल्ला घ्यावा. विवाह, नातेसंबंध समजून घेण्याची गरज आहे. आज क्षुल्लक कारणांमुळे घटस्फोटाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असल्याने ही बाब अधिकच चिंतेची होऊ लागली आहे. त्यामुळे तमाम जोडप्यांनी थोडं सबुरीने घेऊन आपल्या नात्यात गोडवा आणावा.
भोंदूबाबाच्या चाहत्यांनो, शहाणे व्हा!
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली सीमारेषा नीट ओळखता न येणारी अनेक मंडळी आपल्या अवतीभवती वावरत असतात. या अशा मंडळींचा भोंदूगिरी करणार्या साधूसंतांवर भारी विश्वास असतो. ‘महान’, ‘कर्तबगार’ अशी उपमा देऊन अशा भोंदूंचे गुणगान गाणार्यांचा खोटा मुखवटा जगासमोर आला तरी त्यांच्यावरचा विश्वास काही कमी होत नाही. मग अशाच मंडळींच्या जोरावर या भोंदूंचा धंदा तेजीत सुरू असतो. कारस्थान समोर येऊनही त्यांच्या अंध भक्तांचे डोळे उघडत नाहीत. बाबा रामरहिमप्रकरणानंतर हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. देवाधर्माच्या आणि लोकांच्या श्रद्धेआड या बाबांनी केवढे मोठे गुन्हेगारी साम्राज्य उभे केले आहे, हे बाबा रामरहिमयाला शिक्षा सुनावल्यानंतर उसळलेल्या दंगलीवरून दिसून आले आहे. मुख्य म्हणजे, अशा बाबा-बुवांना राजकीय संरक्षण मिळत असल्यानेच त्यांचे फावते. अशा प्रवृत्तींच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती करून लोकांना डोळस बनविणे गरजे आहे. त्यासाठी समाजातील सुधारकांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यासाठी सरकारने साधन-सामग्री उपलब्ध करून दिली पाहिजे. देशात सध्या श्रद्धेच्या नावाने केलेल्या काळ्या कृत्याची माहिती समोर आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, आजही बाबा रामरहिमच्या प्रभावाखाली असलेले लोक हिंसाचार घडवित आहेत. अर्थात, या प्रवृत्ती आताच नव्याने निर्माण झाल्या आहेत, असे म्हणता येणार नाही, तर पूर्वीपासून त्या आहेत. अशा प्रवृत्तींविरोधात महाराष्ट्रामध्ये वारकरी संतांनी मोठे जनजागरण केले. लोकांना जागृत करण्यासाठी संत तुकाराममहाराजांनी तर अक्षरश: जागरण मांडले होते. अंगाला भस्मलावून, भगवे कपडे घालून किंवा माळा घालून कुणी साधू होत नसतात, ही बाब लक्षात येत नाही. उच्च शिक्षण घेतलेले अभ्यासी किडेदेखील या भोंदूबाबांच्या फसवेगिरीला बळी पडतात. आज लोकल, बसमध्ये अशा भोंदूबाबांचे मार्केटिंग करणारी अनेक पोस्टर्स लावलेली असतात. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेली ही पोस्टर्स वाचून छोट्या-मोठ्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी काही मंडळी अशा भोंदूबाबांकडे धाव घेतात. कोणताही सारासार विचार न करता वाटेल तितका पैसा मोजून समस्या सोडविण्याच्या नादात स्वतःची फसवणूक करून घेतात. काही प्रकरणांमध्ये महिला, तरुणींचे शारीरिक शोषण केले जाते, तरीदेखील सगळं काही सहन करून भोंदूबाबांची सेवा करण्यामध्ये त्यांना अधिक रस वाटतो. त्यामुळे हा सर्व प्रकार जास्तच गंभीर बनत चालला आहे.
- सोनाली रासकर