भारतीय फुटबॉलचा बादशाह

Total Views |
 

 
 
५० वर्षांहून अधिक आयुष्य त्यांनी फुटबॉलसाठी वेचले. सुविधांची कमतरता आणि सवलतींचाही ठावठिकाणा नसताना आव्हानात्मक दिवसात त्यांनी फुटबॉलसारख्या खेळात भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केले. असे व्यक्तिमत्त्व म्हणजे अहमद खान. भारताने ऑलिम्पिकमध्ये फुटबॉलसारख्या खेळात स्थान मिळवले होते. तेवढ्यावरच न थांबता भारताने उपांत्य फेरीपर्यंतदेखील मजल मारली होती. ७० वर्षांपूर्वी भारतीय संघ फुटबॉलमध्ये पहिल्या २० संघांमध्ये होता. आजची परिस्थिती पाहिली तर कदाचित ते खरं वाटणार नाही. मात्र, ती सत्य परिस्थिती होती. आज भारतीय संघ पहिल्या शंभर क्रमांकामध्येही नाही. याच अहमद खान यांचे नुकतेच वयाच्या ९०व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. अहमद खान यांना फुटबॉलचे बाळकडू त्यांचे वडील बाबा खान यांच्याकडून मिळाले. बाबा खान हे तत्कालीन बँगलोर क्रीसेंेट फुटबॉल संघाचे नेतृत्व करीत होते. त्यांच्याकडेच पाहत अहमद लहानाचे मोठे झाले आणि त्यांची पावले आपसूकच फुटबॉलकडे वळली. अहमद यांच्याप्रमाणेच त्यांचे तीन बंधू अमजद, शरमत आणि लतिफ हेदेखील फुटबॉलडे वळले. अहमद यांच्याकडे अव्वल दर्जाचा खेळ खेळण्याची शैली होती. आपल्या वडिलांकडूनच प्रशिक्षण घेत असल्यामुळे फुटबॉलमधील अनेक छोट्या- मोठ्या गोष्टी त्यांना अवगत झाल्या होत्या. अहमद हेदेखील आपल्या वडिलांबरोबरच बँगलोर क्रींसेट संघातून या खेळत असत आणि अनवाणी खेळणे ही त्यांची खासियत होती. प्रतिस्पर्धी संघावर आक्रमकरित्या आणि कल्पक चाल करत गोल करण्याची शैलीही त्यांना अवगत होती. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची हातोटीदेखील त्यांच्याकडे होती.
 
१९४८ आणि १९५२ साली झालेल्या स्पर्धेत अहमद यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाने आपली छाप सोडली. त्यावेळी लंडन ऑलिम्पिकमध्येे भारताला पराभव चाखावा लागला होता. मात्र, त्या सामन्यात अनवाणी खेळणार्‍या भारतीय संघाने सर्वांची मने जिंकली होती. विशेषत: अहमद यांनी आपल्या खेळाने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. त्यानंतर १९५१ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले. त्या विजयामध्ये अहमद खान यांचा सिंहाचा वाटा होता.
 
१९५६ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताने उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र, अहमद खान यांना काही कारणास्तव या स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. मात्र, अहमद यांनी भारतीय संघाला मोलाचे मार्गदर्शनदेखील केले होते. याव्यतिरिक्त त्यांनी ईस्ट बंगाल क्लबचे दहा वर्षे प्रतिनिधित्व केले होते. अनेक बड्या स्पर्धांमध्ये अहमद यांच्या प्रभावी खेळाच्या जोरावर ईस्ट बंगाल संघाने यशाचे शिखर गाठले होते. वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाची कामगिरी श्रेष्ठ असे ते कायममानत. निवृत्तीनंतरही त्यांनी आपले फुटबॉलवरील प्रेमआणि निष्ठा कमी होऊ दिली नाही. अनेकांना ते स्वत:हून मदत करीत असत. नवोदित खेळाडूंनीही अहमद यांचा आदर्श ठेवत आपला खेळ नक्कीच उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 
 
- जयदीप दाभोळकर
 
 

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.