मित्रांनो, चौकटीबाहरचे क्षेत्र निवडा!

    23-Aug-2017   
Total Views |


 

खरंतर वयाच्या २१-२२व्या वर्षी मित्र-मैत्रिणींबरोबर मज्जा मस्ती करणे, पिकनिकचे बेत आखणे, अभ्यास, परीक्षा, कॉलेजचे कॅम्पस असं काहीसं जग असतं, परंतु वयाच्या २२ व्या वर्षी जिल्हाधिकारी होण्याची किमया करणारा अन्सार शेख या तरुणाचा ’संघर्षप्रवास’ त्याच्या वयाच्या अनेक तरुणांना किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या मंडळींना प्रेरणादायी ठरेल, असा आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणारा हा अवलिया मूळचा जालना जिल्ह्यातील सेलगांव ता. बदनापूर इथला. राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी देऊन देशातून ३६१ व्या क्रमांकावर पहिल्याच प्रयत्नात तो उत्तीर्ण झाला. मराठवाड्यातून प्रथम येण्याचा विक्रम त्याने केला होता. एका रिक्षाचालकाच्या मुलाने यशाला गवसणी घालत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अवघड अशा मानल्या जाणार्‍या यूपीएससीच्या परीक्षेत ३६१ वा क्रमांक गाठला. अन्सारच्या घरात अठराविश्‍वे दारिद्य्र. तसेच त्याचे बालपण ग्रामीण भागातच गेल्याने स्पर्धा परीक्षांना पूरक असणारे वातावरण, तसेच मार्गदर्शन त्याला मिळाले नाही, परंतु दहावी-बारावीचा पल्ला गाठल्यानंतर देशाची सेवा करण्यासाठी या क्षेत्राकडे वळायचे, असे स्वप्न त्याने रंगवले आणि तिथूनच त्याचा संघर्ष सुरू झाला. अन्सारचा जन्म मुस्लीम कुटुंबात झाला असला तरी ते मूळचे जालन्याचे. त्यामुळे मराठीवर चांगली पकड. अन्सारची आई अजमद बी या दुसर्‍याच्या शेतात मजुरी करतात. अन्सारचा दोन भाऊ व दोन बहिणी असा छोटासा परिवार. अन्सारचे शालेय शिक्षण हे बदनापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले. त्यानंतर जालना येथील बद्रीनाथ महाविद्यालयात त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. भारतीय प्रशासकीय सेवेत जायचेच, असा निश्चय केल्यामुळे पुणे येथे चार वर्षे वसतिगृहात राहून फर्ग्युसन महाविद्यालयात त्याने पदवीचे शिक्षण घेतले. त्याचवेळेस यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याने श्रीगणेशा केला होता. या परीक्षेसाठी करावे  लागणारे  अवांतर वाचन आणि सरावासाठी त्याने विशेष मेहनत घेतली.अन्सारने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी एक वेळापत्रक तयार केले व त्यानुसार अभ्यास सुरू केला. दररोज १० ते १४ तास तो अभ्यास करत होता. तसेच पूर्वीपासून शिक्षणामध्ये त्याला विशेष रूची होती. चांगले गुण मिळवून आयएएस व्हायचे, असा पण त्याने केला होता. त्याने कला शाखेची पदवी प्राप्त केली. त्याचबरोबर त्याने यूपीएससीची तयारी जोरदार सुरू केली. अन्सारचे वडील शेख अहमद रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होते. रिक्षा चालवून त्यातून फारसे काही उत्पन्न मिळत नसल्याने अन्सारने कोणत्याच गोष्टीसाठी वडिलांकडे कधी हट्ट केला नाही. अन्सारच्या छोटा भावाला अभ्यासामध्ये रूची नसल्याने त्याने शिक्षणाकडे पाठ फिरवली आणि नोकरीचा मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे, अन्सारचा छोटा भाऊ नोकरी करून त्यातून मिळणार्‍या उत्पन्नाचा एक भाग अन्सारच्या शिक्षणासाठी देत होता. सध्या अन्सार प्रशिक्षणासाठी मसुरीमध्ये आहे. यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच्यासारखेच इतर अन्सार घडविण्यासाठी त्याने एक पुस्तक लिहिले आहे. ’’कोणतेही यश सहज मिळत नाही, हे नेहमी लक्षात ठेवावे. आपली इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल, तर अपयश कधीच तुमच्या पदरी येणार नाही. दहावी-बारावीनंतर एका विशिष्ट चौकटीमध्ये करिअर करण्याचा नाद पहिल्यांदा सोडला पाहिजे. येणार्‍या विविध क्षेत्रांमध्ये भासणारे मनुष्यबळ आणि कौशल्य लक्षात घेत आपण त्या-त्या क्षेत्रांची निवड करावी,’’ असा कानमंत्र अन्सारने दिला आहे.

 

 

- सोनाली रासकर

सोनाली रासकर

समाजशास्त्र, इतिहास घेऊन बी.ए. पत्रकारिता व मास कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा केला आहे. फिचर स्टोरी, तसेच  सामाजिक विषयावरील लिखाणाची आवड, गुन्हेगारीशी संबंधित मालिका बघण्यामध्ये रस. सध्या दै. ’मुंबई तरूणभारत’मध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत.