दोन हिंदू पक्षांतली हाणामारी

    20-Aug-2017   
Total Views |



काही वर्षांपूर्वी किंवा नेमके सांगायचे, तर २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, एका इंग्रजी वाहिनीवर देशभरातील विविध पक्षांच्या बलाबलाविषयी चर्चा चाललेली होती. त्यात दक्षिणेतला कर्नाटक वगळला, तर भाजपला कुठेही स्थान कसे नाही, याचाच रसभरीत ऊहापोह चाललेला होता. त्यात सहभागी झालेल्या भाजपच्या प्रवक्त्यालाही आपली लंगडी बाजू सावरणे अशक्य होते. कारण दक्षिणेत भाजप अजून झुंजण्याइतका बलशाली झालेला नव्हता, हे सत्यच होते. पण त्या चर्चेत मला खटकलेला विषय अगदी वेगळा होता. कारण, ती गोष्ट यापूर्वी कुठल्याही राजकीय चर्चेत ऐकलेली नव्हती किंवा केरळच्या राजकारणाचे ते अंग कधी कुठे माध्यमातूनही स्पष्टपणे मांडले गेलेले नव्हते. कॉंग्रेसचे वायलर रवी नावाचे केरळी ज्येष्ठ नेता, त्यात सहभागी झाले होते आणि त्यांनी असे म्हटले की, ‘‘मार्क्सवादी वगैरे सेक्युलर पक्ष नाहीत. केरळमध्ये फक्त कॉंग्रेस हाच एकमेव सेक्युलर पक्ष आहे. बाकी सगळे जातीय व धार्मिक पक्ष आहेत.’’ त्यामुळे माझे त्या चर्चेविषयी कुतूहल जागे झाले. रवी यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, ‘‘मुस्लीम लीग हा मुस्लिमांचा, तर मार्क्सवादी हा हिंदूंचा पक्ष आहे. कॉंग्रेस हा कुठल्याही एका धर्माच्या मतदारावर अवलंबून असलेला पक्ष नाही. आम्हाला बिगर हिंदूंचा मोठा आधार आहे आणि मार्क्सवादी बिगर हिंदूंमध्ये लोकप्रिय नाहीत.’’ हे ऐकून मला धक्काच बसलेला होता. पण त्याची खातरजमा करण्याचे माझ्यापाशी कुठलेही साधन नव्हते. साहजिकच तो विषय मागे पडून गेला. कारण, अन्य कुठल्या माध्यमातही त्याचा कधी ऊहापोह झाला नव्हता किंवा त्याविषयी गंभीर चर्चा कुठे ऐकायला मिळालेली नव्हती. पण, गेल्या वर्षभरात मात्र त्याची प्रतिदिन खात्री पटू लागलेली आहे. त्याचे कारण केरळात मार्क्सवादी पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि नित्यनेमाने तिथे संघ-भाजप व मार्क्सवादी यांच्यात खटके उडू लागलेले आहेत.

 

गेल्या वर्षभरात अनेक हत्या झालेल्या असून संघाचे कार्यकर्ते व मार्क्सवादी यांच्यात इतका हाणामारीचा प्रसंग कशाला येतो आहे, असा अनेकांना प्रश्‍न पडलेला आहे. कारण, केरळात ख्रिश्‍चन व मुस्लीम संख्या मोठी असून, तिथे अगदी ‘इसिस’ला भिडलेले काही मुस्लीम अतिरेकी गटही आहेत. साहजिकच संघाचा व्याप केरळात वाढत असेल, तर त्यांचा संघर्ष बिगर हिंदू मानल्या जाणार्‍या ख्रिश्‍चन व मुस्लिमांशी झाला तर समजू शकते. कारण, या दोन्ही धर्माचे मूखंड व धर्ममार्तंड नेहमी संघ व भाजपला हिंदुत्वामुळे विरोध करत असतात. जिथे त्या दोन धर्माचे थेट राजकीय पक्ष आहेत, त्यांच्याकडून संघ व भाजप विस्तारामुळे खटके उडाले, तर नवल वाटण्याचे काही कारण नाही. पण तशी कुठलीही बातमी आपल्या वाचनात अलीकडे आलेली नाही. मुस्लीम लीग वा कुणा मुस्लीम संघटना जमात यांच्याशी संघ कार्यकर्त्यांच्या हाणमार्‍या झाल्या किंवा ख्रिश्‍चनांच्या गट राजकारणात संघाशी हातघाईचा प्रसंग आला, असे आपल्या ऐकीवात नाही. मग धर्माला अफूची गोळी मानणारे मार्क्सवादी व संघ यांच्यात वितुष्ट येण्याचे कारण काय? धर्माचाच आक्षेप असेल, तर त्यांनी कधी ख्रिश्‍चन व मुस्लीम संघटना वा राजकीय पक्षाशी वैर घेतलेले नाही. मग हिंदूंच्याच धर्मवादी संघटनेशी मार्क्सवादी मंडळींनी उभा दावा मांडण्याचे कारण काय? त्याचे उत्तर त्या पक्षाला मिळणार्‍या मतांमध्ये दडलेले आहे. त्यांनी कितीही मुस्लिमांचे लांगुलचालन केलेले असो किंवा ख्रिश्‍चन धर्मियांना चुचकारलेले असो, त्यांना असे अन्य धर्मिय क्वचितच मते देत असतात. डाव्यांचे राजकारण धर्मापासून अलिप्त असलेल्या हिंदू मतांवरच अवलंबून आहे. कारण, सेक्युलर मतदार फक्त हिंदू आहे आणि तो धर्माच्या नावाने मतदान करत नाही. पण त्यांच्या मतांमुळे मोठा झालेला मार्क्सवादी पक्ष मात्र जिंकल्यावर हिंदुत्वाला कायम लाथा मारत राहिलेला आहे.

 

असे असूनही आजवर तिथे मार्क्सवादी पक्षाला हिंदू झुकते माप देत राहिले. कारण त्यांनी सहसा मुस्लीम वा ख्रिश्‍चन धर्मियांचे चोचले पुरवलेले नव्हते. पण, अलीकडल्या काळात देशात भाजपचा उदय झाला आणि मोठ्या संख्येने हिंदू व्होट बँक तयार झाली. तिचा काहीसा परिणाम केरळातही झालेला आहे. त्याचा प्रभाव मग मागल्या दोन निवडणुकीतही दिसला असून, मोठ्या प्रमाणात भाजपला मते मिळू लागली आहेत. ती मते भाजप मिळत असताना मार्क्सवादी पक्षाची मते घटलेली असून, दिवसेंदिवस त्यांना भाजप हे आव्हान भासू लागलेले आहे. कारण, आजघडीला हिंदू मते कॉंग्रेसची कमी होत असून ती भाजपकडे झुकत आहेतच. पण क्रमाक्रमाने मार्क्सवादी भंपक पुरोगामीत्वाचे परिणामही होऊ लागलेले आहेत. साहजिकच पुढल्या काळात संघ व पर्यायाने भाजप अन्य कोणापेक्षाही मार्क्सवादी मतांवर पोसला जाणार, याच्या भयाने त्या पक्षाला पछाडलेले आहे. जितके कुठल्याही पक्षाचे नेते तावातावाने एखादी भूमिका वा तत्वज्ञान मांडत असतात, तितका त्यांचा मतदार त्या पक्षाला बांधील नसतो. तो प्रसंग व सोयीनुसार एखाद्या पक्षाचा पाठीराखा झालेला असतो. पण त्याला हवा तसा पर्याय मिळत गेला, तर असा मतदार बाजू बदलू लागतो. तेच सध्या केरळात होत असून, आपल्या मतपेढीला लागलेल्या गळतीने या पक्षाला भयभीत केलेले आहे. त्यामुळे भाजपा वा संघाच्या विस्तारासाठी कार्यरत असलेल्या तरूण व कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले करण्यापर्यंत मार्क्सवादी पक्षाची मजल गेलेली आहे. गेल्या दोन-चार वर्षातील केरळातील संघ स्वयंसेवक वा भाजप कार्यकर्त्याची हत्या तपासून बघितली, तर त्यातले गुन्हेगार मार्क्सवादीच आढळून येतील. संघ भाजपकडून उमटणार्‍या प्रतिक्रियाही डाव्यांवरच आरोप करणार्‍या दिसतील. याचे एकमेव कारण दोघांचा मतदार एकच आहे आणि तो हिंदू आहे.

 

केरळातील मुस्लीम, ख्रिश्‍चन खरेच या पुरोगाम्यांना वाटतो तसा सेक्युलर असता, तर या लोकांना संघाच्या विस्ताराने वा भाजपच्या प्रसाराने चिंतीत होण्याचे काहीही कारण नव्हते. पण, तसे होताना दिसलेले नाही. बंगालमध्ये अलीकडेच पालिकांच्या निवडणुका संपल्या. त्यात तृणमूलनेच सर्वात मोठे यश मिळवले. पण, दरम्यान त्या मतदानात धुळीस मिळाले आहेत, ते डावे आणि कॉंग्रेस पक्ष. कारण, हळूहळू तिथल्या मुस्लीमधार्जिण्या पुरोगामीत्वाला कंटाळलेला बंगाली हिंदू मतदार भाजपच्या गोटामध्ये येऊ लागला आहे. सात वर्षांपूर्वी बंगालमध्ये डावी आघाडी आणि मार्क्सवादी पक्षाला कोणी हरवू शकत नाही, असे मानले जात होते. पण, ममताचा पर्याय समोर आला आणि साडेसहा वर्षांपूर्वी डाव्यांचा धुव्वा उडाला. दीड वर्षांपूर्वी तर कॉंग्रेसशी हातमिळवणी करूनही डावे आणखीनच रसातळाला गेले. मते हिंदूंची मागायची आणि जिंकल्यावर मुस्लिमांच्या अतिरेकाची पाठराखण करायची, याला कंटाळलेला हिंदू मतदार अशा राज्यात पर्यायाची प्रतिक्षा करत होता. अलीकडल्या काळात भाजप व संघाने तसा पर्याय असल्याचे दाखवल्यानंतर डाव्यांचा हिंदू मतदार झपाट्याने भाजपच्या बाजूने येऊ लागला आहे. मागल्या लोकसभा निवडणुकीतून देशाच्या मोठ्या भागातील मतदाराने तसा साफ संकेत दिलेला आहे. पण जिथे भाजपचे मजबूत संघटन वा स्थानिक नेतृत्व नव्हते, तिथे त्या मतदाराने जुन्या पक्षाला सोडून दिले नाही. आता तीच पोकळी भरली जात असल्याने केरळात डाव्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागलेली आहे. कारण, हिंदूंच्या मतावर चाललेला हिंदूंचा पक्ष असूनही डावा मार्क्सवादी पक्ष, हिंदूंच्याच मुळावर आलेला आहे. ती चूक त्याने सुधारली तरी भाजपला केरळात यश अवघड होऊ शकेल. पण, हिंदूंच्या न्यायाची भाषा बोलली, तर पुरोगामीत्व विटाळते ना? या घडामोडींनी वायलर रवी यांचे शब्द मात्र खरे करून दाखविलेले आहेत. केरळात सध्या चाललेली हाणामारी दोन हिंदू पक्षांतली आहे.

 

- भाऊ तोरसेकर

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.